मुंबई – होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो.
वर्षभर होणार्या वृक्षतोडीने जंगले उजाड होत असतांना, त्याकडे काणाडोळा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि धर्मविरोधी संघटना वर्षातून एकदा येणार्या होळीला कचर्याची होळी करा, पोळी दान करा, अशा चळवळी राबवतात. मोठमोठ्या कार्यक्रमांतून प्रतिदिन सहस्रावधी टन अन्न वाया जात असतांना धर्मविरोधी संघटना होळीच्या दिवशी पोळी दान करा असे म्हणतात. वृक्षतोड थांबवण्यासाठी ही मंडळी वर्षभर काय करतात ?
गणेशोत्सव आला की, मूर्तीदान करा; दिवाळी आली की, फटाके उडवू नका; शिवरात्र आली पिंडीवर दूध वाहू नका आदी हिंदूंच्या सणांच्या वेळीच हे उपक्रम राबवतात. यांना खरेच समाजसुधारणा करायची असेल, तर त्यांनी ईदला बकरी शेतकर्यांना दान करा, गोहत्या करू नका, ख्रिसमसला फटाके उडवू नका, चर्चमध्ये मेणबत्त्या जाळू नका, त्या गरिबांना वाटा अशा मोहिमा घेऊन दाखवाव्यात. धर्म न मानणारे सुधारणा करायच्या वेळी पहिले हिंदु होतात, हा ढोंगीपणा कशाला ? ही धर्मविरोधी मंडळी अपप्रकार दूर करण्यासाठी नव्हे, तर परंपरा नष्ट करण्यासाठीच प्रयत्न करतात, हेच यातून दिसते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरांत कोणी लुडबुड करू नये.
राज्यात पाण्याची भीषण समस्या असतांना पाण्याचा अतिरेक करणे म्हणजे एकप्रकारे पापच होय. त्यामुळे नैसर्गिक रंगांनी आणि पाण्याचा गैरवापर न करता रंगपंचमी साजरी करून उत्सवाचा आनंद घ्या. सामाजिक हानी करून रंगाचा बेरंग करू नका. हिंदूंनो, धर्मविरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करा, असे आवाहन सनातन संस्था करत आहे.