संत मीराबाई यांचे निवासस्थान आणि उपासनास्थान
यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने यू.टी.एस्. (Universal
Thermo Scanner) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !
भाविकांना संतांमधील सात्त्विक स्पंदनांचा लाभ व्हावा, यासाठी संतांशी संबंधित वस्तू जतन करून ठेवण्याची हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. आजही त्यांंचे निवासस्थान असलेला महाल, तसेच त्यांनी जेथे श्रीकृष्णाची उपासना केली, ते मंदिर राजस्थानातील सुप्रसिद्ध चितौडगडावर आहे. या दोन्ही वास्तू ४०० वर्षांहूनही अधिक पुरातन आहेत. त्यांमधील स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीमध्ये संत मीराबाई जेथे रहात होत्या, तो महाल (निवासस्थान) आणि त्यांनी जेथे श्रीकृष्णाची उपासना केली ते मंदिर (उपासनास्थान) यांचे यू.टी.एस्. उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. या दोन्ही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
३. वैज्ञानिक चाचणीतील वास्तूंविषयी माहिती
पुढील दोन्ही वास्तू राजस्थान येथील सुप्रसिद्ध चितौडगडावर आहेत.
३ अ. संत मीराबाई यांचा महाल (निवासस्थान)
मेवाडचे राजपुत्र भोज राज यांच्याशी विवाह झाल्यानंतर संत मीराबाई यांचे वास्तव्य या महालात होते. सध्या या तीन मजली महालाची केवळ इमारत उरली आहे. चाचणीसाठी या महालाच्या तळमजल्याचे परीक्षण केले.
३ आ. श्रीकृष्ण मंदिर (उपासनास्थान)
या मंदिरात संत मीराबाई यांनी श्रीकृष्णाची उपासना केली होती. या मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोरील सभामंडपातून त्या श्रीकृष्णाला आळवत असत. मीराबाईंना मारण्यासाठी विष देण्यात आले; पण त्यांच्या भक्तीमुळे त्याचे अमृत झाले, तसेच पेटार्यातून नाग पाठवला; पण त्याचा पुष्पहार झाला. मीराबाईंच्या जीवनातील या अद्भुत घटना या मंदिरातच घडल्याचे सांगितले जाते. चाचणीसाठी या मंदिरातील सभामंडपाचे परीक्षण केले आहे.
४. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)
उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे
४ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख
या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगण येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले.
४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण
४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. या अंतर्गत पुढील २ प्रकार येतात.
अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.
४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.
४ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.
५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता
अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.
६. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन
६ अ. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)
उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे (दिनांक : ८.९.२०१४)
टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.
६ आ. निरीक्षणांचे विवेचन
६ आ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे : सर्वसाधारण वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण वरील चाचणीतील दोन्ही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.
६ आ २. सकारात्मक ऊर्जा असणे : सर्वच व्यक्ती, वस्तू अथवा वास्तू यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येतेच, असे नाही; परंतु संत मीराबाई यांचे निवासस्थान आणि उपासनास्थान या दोन्ही ठिकाणी स्कॅनरच्या भुजा अनुक्रमे १३५ आणि १५० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजेच त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आढळली.
६ आ ३. निवासस्थानापेक्षा उपासनास्थानाची प्रभावळ पुष्कळ अधिक असणे : सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. संत मीराबाई यांचे निवासस्थान असलेल्या महालाची प्रभावळ ४.६२ मीटर, तर उपासनास्थान असलेल्या मंदिराची प्रभावळ १०.८१ मीटर म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे, तसेच निवासस्थानाच्या तुलनेत उपासनास्थानाची प्रभावळ अधिक आहे. याचे कारण भाविकांनी नियमित उपासनेद्वारे मंदिरातील पावित्र्य टिकवून ठेवले आहे. त्यामुळे महालाच्या तुलनेत मंदिरामध्ये संत मीराबाईंच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेली विशिष्ट स्पंदने अधिक प्रमाणात टिकून राहिली आहेत.
७. निष्कर्ष
संत मीराबाई यांचे निवासस्थान असलेला महाल आणि उपासनास्थान असलेले श्रीकृष्णाचे मंदिर या दोन्ही ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आहे अन् त्यांची प्रभावळही पुष्कळ अधिक आहे, हेच या चाचणीतून लक्षात येते.
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.२.२०१६)
ई-मेल : [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात