स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि
पवित्र अन् तेजस्वी जीवन यांना कोटी कोटी प्रणाम !
फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन (आत्मार्पण) ! त्यांच्या आत्मार्पणाला १४ मार्च २०१६ या दिवशी ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या मनात आत्मार्पणाचे विचार कसे आले, त्यासंबंधी त्यांनी निकटवर्तियांशी केलेली चर्चा, आत्मार्पणास खर्या अर्थाने झालेला प्रारंभ याविषयीचे लेखस्वरूपातील वर्णन श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारक चळवळीचे धुरीण असलेल्या सावरकरांच्या आत्मार्पणदिनानिमित्त ही माहिती आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. युगप्रवर्तक क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर !
वीर सावरकरांनी कुमारवयातच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सशस्त्रक्रांती करण्याची शपथ घेतली आणि ती शेवटपर्यंत पाळली. तारुण्य, संसार, घरदार, आयुष्य यांची देशासाठी राखरांगोळी करणारा हा द्रष्टा युगपुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांना हौतात्म्याची ओढ होती. त्यामुळे त्यांना कधी मृत्यूचे भय वाटलेच नाही. इंग्रज शासनाने काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावली; पण त्यांनी तेथील काळकोठडीतही आपली प्रतिभा जिवंत ठेवली. असा हा सहस्रावधी पानांचे वाङ्मय लिहिणारा युगप्रवर्तक क्रांतीकारक अन्य कोणीही त्या काळात नव्हता. अशा या महायोद्ध्याला भेटायला असंख्य माणसे सावरकर सदनात येत होती. त्यात सरसेनापती करीअप्पा, न.वि. गाडगीळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक पू. गोळवलकरगुरुजी असे विविध क्षेत्रांतील नामवंतही होते.
२. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरीर
साथ देत नसतांनाही सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य चालूच !
२८ मे १९६३ या दिवशी त्यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच्या दुसर्या दिवशी ते घरात पाय घसरून पडले. त्यांच्या मांडीच्या हाडाला चीर पडली. संध्याकाळी त्यांना रुग्णालयात नेले. तेव्हा त्यांनी सहजतेने त्यांच्या स्वीय सचिवांकडे उद्गार काढले, तुम्ही काल साजरी केलीत माझी जन्मतिथी आणि आता जातो आहे पुण्यतिथीकडे ! त्यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हते. प्रकृतीही क्षीण झाली होती. ती सुधारणार नसल्याने त्यांच्यासारख्या ज्ञानी, विरक्त योग्याला आपल्या हातून आता कोणतेही कार्य घडणार नाही, तर जिवंत रहाणे योग्य नाही, असे वाटू लागले. त्यातच त्यांच्या पत्नी सौ. माई यांनी ८ नोव्हेंबर १९६३ या दिवशी अखेरचा श्वास घेऊन इहलोकीची यात्रा पूर्ण केली. तरीही त्यांचे सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य संथ गतीने चालूच होते. सावरकरांना भेटायला येणार्या अनेक व्यक्ती असत. ते त्यांची भेटही घ्यायचे.
३. सावरकरांच्या मनात जलसमाधी घेण्याचा विचार येणे
एक दिवस सावरकरांनी त्यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना समुद्राच्या भरतीच्या वेळी फिरायला जायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. भरती कोठे चांगली येते, याची विचारणा केली. २ आठवड्यांनी सावरकरांनी टॅक्सी मागवली. वरळीला टॅक्सीने अशी सूचनाही केली. तेथे तटाजवळ फारसे पाणी नव्हते. ते पाहून तात्या काही वेळातच घरी परतले. नंतर त्यांनी नरीमन टोकाशी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तो भाग त्यांना आवडला. तिथे फारशी गर्दी नव्हती. बाळाराव सावरकरांना आपल्या जवळ बोलावून ते म्हणाले, वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरात हे कृष्ण हे शाम असा नामघोष करत प्रवेश करून जलसमाधी घेतली. हे ऐकून बाळारावांना सावरकरांच्या मनात कोणते विचार आहेत याचा अंदाज आला. त्यांनी तात्यांना घरी आणले.
४. आत्मार्पणासाठी हक्काने साहाय्य मागणारे सावरकर
आणि समाजाचा भविष्यातील रोष पत्करूनही आत्मार्पणास
साहाय्य करण्याचे आश्वासन देणारे स्वीय सचिव बाळाराव सावरकर !
काही दिवसांनंतर तात्या बाळारावांना म्हणाले, बाळ ! ज्ञानेश्वरांना समाधी घेण्यास त्यांच्या बंधूंनी साहाय्य केले. जैन लोकांमध्ये उपोषण करून जीवनसमाधीची पद्धत आहे. पूर्वी आपल्यातही जिला सती जायचे, तिला सुखाने जाऊ देत. मला आता आत्मार्पण करायचे आहे. तू साहाय्य देशील कि नाही, ते सांग. तू नाही म्हटलेस, तरी मला राग नाही; कारण ते अगदी स्वाभाविक आहे. साहाय्य दिलेस, तर तुझ्यावर काही आळ येणार नाही, इतकी व्यवस्था मी करीन. सर्व काही व्यवस्थित लिहून ठेवीन. आत्महत्या आणि आत्मार्पण या माझ्या लेखामुळे मी आत्मार्पण करणार, हेही लोकांना ठाऊक आहे. तेव्हा तू मला ८ दिवसांनी विचारपूर्वक सांग. आठ दिवसांनी बाळारावांना तात्यांनी विचारले, बाळ ! तुझे काय ठरले ? बाळाराव म्हणाले, होय. मी तुम्हाला साहाय्य देईन; पण तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे माझ्यावर तुमच्या हत्येचा आरोप येणार नाही, हे मला पटत नाही. आपल्या भेटीसाठी आलेल्या लोकांना अडवणारा मीच आहे. त्यामुळे ज्यांना आपल्याला भेटता आले नाही, अशा अनेकांचा माझ्यावर राग आहे. माझे काही मित्रही त्यामुळे तुटले. अनेक मला त्यांचा शत्रू मानतात. ते सगळे मला तुमचा हत्यारा म्हणून पहातील आणि बोट दाखवतील. हा धोका गृहित धरूनही मी आपणास तुम्ही म्हणाल, तेव्हा जलसमाधीला किंवा आत्मार्पणाला साहाय्य करीन.
५. सावरकरांनी जलसमाधीचा मार्ग सोडून
आत्मार्पणाच्या मार्गाविषयी अनेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे
बाळारावांची ही बाजू सावरकरांना पटली. जलसमाधीचा मार्ग यशस्वी होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो मार्ग अनुसरण्याचा विचार सोडून दिला. सावरकरांनी त्यांचे वैद्यकीय समादेशक आधुनिक वैद्य रा.वा. साठे यांच्या मनावर आपण आत्मार्पण करणे कसे योग्य आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न केला. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे आत्मार्पण करणे अधिक श्रेयस्कर आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांनी रामबाण औषध द्यावे, हे अधिक चांगले ! आधुनिक वैद्य साठे यांच्याप्रमाणे आत्मार्पणाचा विचार कसा योग्य आहे, ते तात्यांनी आधुनिक वैद्य सुभाष पुरंदरे यांना पटवून देण्याचा प्रयत्न चालू ठेवला. तात्यांशी प्रतिवाद करण्याचा दोन्ही आधुनिक वैद्यांनी प्रयत्न केला; पण सावरकरांनी आपल्या तर्ककठोर विचाराने त्यांना निरुत्तर केले. हे आधुनिक वैद्य आपले म्हणणे मान्य करणार नाहीत, अशी तात्यांची निश्चिती झाल्यावर पूर्वी ठरलेलाच मार्ग अनुसरायचा, असा त्यांनी निश्चय केला. तो मार्ग म्हणजे आता आपण फार जगायचे नाही, तर परलोकी जायचे.
६. सावरकरांनी आत्महत्या आणि आत्मार्पण
या लेखातून आत्मसमर्पणाचा मार्ग अप्रत्यक्षरित्या सुचवणे,
स्वीय सचिवांना वाङ्मयाचे अधिकार देणे अन् भेटायला आलेल्यांशीही चर्चा करणे
तात्यांनी आत्महत्या आणि आत्मार्पण हा लेख लिहिला. या लेखात वैदिक कर्मकांडाचे पुरस्कर्ते कुमारील भट्ट, जगद्गुरु आद्य शंकराचार्य, गौरांगप्रभू, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी या सर्व महान संतांनी आपले नियोजित कार्य पूर्ण होताच जीवन यशस्वी झाल्यावर समाजाला भारभूत होऊ नये; म्हणून स्वत:ची जीवनयात्रा जलसमाधी वा प्रायोपवेशन करून पूर्ण केली. त्या सर्वांनी ज्या मार्गाने आणि अत्यंत समाधानी, आनंदी चित्ताने देहत्याग केला. त्याला इतिहासाने त्यांचे आत्मसमर्पण म्हणून गौरवले. तात्यांनी हा लेख लिहून मी आत्मसमर्पणाच्या मार्गाने जाणार आहे, असे अप्रत्यक्षरित्या सुचवले. त्याविषयी विचारताच त्यांनी या लेखात मी माझ्यासंबंधी काहीही लिहिलेले नाही, असे उत्तर दिले; पण सावरकरांनी आपणही त्याच मार्गाने जाणार आहोत, हे मनाशी निश्चित केले होते. त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले. त्यांच्या सर्व वाङ्मयाचे अधिकार स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना दिले. त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी बाळारावांना उपयुक्त पडणारी सर्व सामग्री दिली. वृत्तपत्र वाचन आणि कात्रणे काढण्याचे काम चालूच ठेवले.
लोकही त्यांच्या भेटीला येत असत; पण त्यांच्या बोलण्यात निराशेचा सूर कोठेच नव्हता. त्यांच्याकडे असलेली अद्ययावत माहिती ते भेटीला आलेल्यांनाही सांगायचे. याच काळात मरीचीचे म्हणजे मॉरीशसचे मंत्री विष्णूदयाळ आणि वीर अर्जुनचे संपादक कुमार नरेंद्र भेटीला आले होते. मरिचीचे मंत्री विष्णूदयाळ यांच्याशी चर्चा करतांना तात्यांनी तेथील हिंदूंची स्थिती आणि मुसलमानी उठाव यांच्याशी संबंधित माहिती दिली. तेव्हा ते मंत्री थक्क झाले. ही भेट ५ फेब्रुवारी १९६५ या दिवशी झाली.
७. पंचज्ञानेंद्रिये तीक्ष्ण असल्याने सावरकर
सलग १७-१८ दिवस उपवास करू शकणे आणि
शेवटच्या काही दिवसांत त्यांनी स्वीय सचिवांना
आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा । असे म्हणणे
जानेवारी १९६६ च्या शेवटी तात्यांनी जेवणखाण बंद केले. आधुनिक वैद्यांनी तात्यांच्या नकळत त्यांना होमिओपॅथिक औषध दिले. तात्यांना तेही जाणवले. तात्यांची आतडी क्षीण झाली होती. पचनक्रिया बिघडली होती; पण पंचज्ञानेंद्रिये पूर्वीइतकीच तीक्ष्ण होती. अन्नत्याग करून ५-६ दिवस झाले. त्यामुळे आधुनिक वैद्य चिंतातूर झाले. याच काळात आधुनिक वैद्य वासुदेवराव पुरंदरे यांना घाम फुटला; कारण अचानक तात्यांचा रक्तदाब अल्प झाला होता. २-४ वेळा तो पडताळला, तरी तेच मापन. त्यांनी तात्यांसाठी औषध दिले आणि रात्रीची वेळ म्हणून घरी गेले. सकाळी लवकर परत येऊन रक्तदाब तपासला. तो प्रमाणात होता. हे कसे काय, असा प्रश्न आधुनिक वैद्यांना पडला. त्यावर त्यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर म्हणतात, तात्यांना योगाभ्यासाची आवड होती, सवयही होती, काही सिद्धी अवगत होत्या. याचा दाखला देतांना सावरकरांनी हिंदु महासभेच्या ध्वजावर अभ्युदयनिदर्शक कृपाण आणि नि:श्रेयस निदर्शक कुंडलिनी अंकीत केली आहे. त्यांची पंचज्ञानेद्रिंये शेवटपर्यंत उत्तमप्रकारे कार्यरत होती. त्यांचे केसही काळे होते. त्यांच्या उपवासाला १७-१८ दिवस झाले. त्यांनी आपल्या स्वीय सचिवांना बोलावून घेतले आणि हात जोडून नमस्कार करत म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा ।
८. जीवनात विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र
यांचा सुरेख संगम झालेल्या सावरकरांनी
२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी जीवनयात्रा संपवली !
आता कैचे देणे घेणे, आता संपले बोलणे, हेच तात्यांचे शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी बाळारावांनाही कधी बोलावले नाही. कोणाशीही त्यांचा संवाद झाला नाही किंवा भेटही झाली नाही. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांनी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या त्या आत्मार्पणास प्रा. शिवाजीराव भोसले यांनी वैज्ञानिक समाधी असे संबोधले. वीर सावरकरांची विज्ञाननिष्ठा जेवढी होती, तेवढीच अध्यात्मावरची निष्ठाही अढळ, अटळ आणि अपराजित होती. विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांचा सुरेख संगम त्यांच्या जीवनात झाला होता. त्याचा नेमका निर्देश वैज्ञानिक समाधी या दोन शब्दामधून होतो. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी वीर सावरकरांवर लेख लिहितांना म्हटले, सावरकरांच्या मृत्यूंजय जीवनावर त्यांच्या आत्मार्पणाने जो सुवर्णकळस चढवला, त्याला जगात तोड नाही. जो मृत्यू जन्मभर त्यांच्या मागे हात धुवून लागला होता आणि ज्याला त्यांनी आपल्या अंगाला एकदाही स्पर्श करू दिला नव्हता, त्या मृत्यूला त्यांनी अखेर मारले अन् मग ते मरण पावले.
९. खरा इतिहास लिहितांना
स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती प्रथम रंगवणे आवश्यक !
काँग्रेसच्या राजवटीत भारतीय स्वातंत्र्याचा खरा इतिहास लिहिला जाणे मुळीच शक्य नाही; पण ही राजवट काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा खरा इतिहास लिहिण्यासाठी उद्याचे इतिहासकार बसतील, तेव्हा २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभी असलेली आणि ब्रिटीश साम्राज्याच्या छाताडावर पाय ठेवून भारतीय स्वातंत्र्यासाठी सार्या जगात टाहो फोडणारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती प्रथम रंगवावी लागेल. सावरकरांनी आता आपल्या आयुष्यात काही करण्याचे उरले नाही; म्हणून अत्यंत समाधानाने स्वत:ला मृत्यूच्या स्वाधीन करतांना म्हटले,
धन्योऽहम ! धन्योऽहम !
कर्तव्य मे न विद्यते किंची ।
धन्योऽहम ! धन्योऽहम !
प्राप्तत्यम सर्वमहा संपन्नम !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात