स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

स्वर (श्‍वास) पालटल्यावर मागील ७ दिवसांपासून असणारी डोकेदुखी थांबणे,
तसेच डोकेदुखीमुळे मनाची होणारी अस्वस्थता आणि चिडचिडही दूर होणे

       मागील ७ दिवसांपासून माझी डोकेदुखी पुष्कळ वाढली होती. त्यावर औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. ११.२.२०१६ या दिवशी पू. गाडगीळकाकांनी मला उजव्या कानात कापूस घालून स्वरोदयशास्त्रानुसार स्वर (श्‍वास) पालटण्याचा उपाय करायला सांगितले. दुपारी १.३० वाजता मी हा उपाय करायला आरंभ केला. कानात कापूस ठेवल्यावर त्याक्षणीच माझी २० टक्के डोकेदुखी न्यून (कमी) झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७० टक्के डोकेदुखी आणि मानसिक त्रास न्यून झाला. डोकेदुखीमुळे मनाची होणारी अस्वस्थता आणि चिडचिड उपाय सुरू केल्यावर न्यून होत गेली. रात्री १० वाजता माझ्या मनातील सर्व अनावश्यक विचार न्यून झाले होते, तसेच डोकेदुखीही थांबली होती. या उपायांच्या वेळी मी काही विशेष प्रार्थनाही केली नव्हती; केवळ कानात कापूस ठेवला, तरी एवढा परिणाम झाला.
– श्री. सुदर्शन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

शिव-स्वरोदयशास्त्रानुसार उपाय करण्यासंदर्भात सूचना

        शिव-स्वरोदयशास्त्रानुसार शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असतांना आपला ज्या नाकपुडीतून श्‍वास चालू आहे, तो पालटून दुसर्‍या नाकपुडीने श्‍वास चालू करण्यास सांगितले आहे. चालू असलेली उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी चालू करण्यासाठी उजव्या कानात कापसाचा बोळा घालावा किंवा उजव्या कुशीवर झोपावे (किंवा हे दोन्ही करावे). तसेच उजवी नाकपुडी चालू करण्यासाठी याच्या उलट करावे. हा उपाय आरंभ केल्यानंतर जेव्हा आपला त्रास दूर होईल, तेव्हा हा उपाय करणे थांबवावे, उदा. कानात घातलेला कापसाचा बोळा काढून टाकावा. त्यामुळे पुन्हा आपला नैसर्गिक स्थितीत श्‍वासोच्छ्वास चालू होईल. त्या वेळी साधारण १ घंटा उजव्या नाकपुडीतून श्‍वास चालू असतो. त्यानंतर तो पालटून डाव्या नाकपुडीतून श्‍वास चालू होतो. तो साधारण १ घंटा चालू रहातो. मग पुन्हा उजव्या नाकपुडीतून श्‍वास चालू होतो. असे चक्र २४ घंटे चालू असते.

साधकाचा रक्तदाब वाढलेला असतांना
स्वरोदयशास्त्रानुसार उजव्या कुशीवर झोपणे आणि उजव्या
कानात कापसाचा बोळा घालणे, हे उपाय केल्यावर रक्तदाब न्यून होणे

      १३.२.२०१६ या दिवशी माझा रक्तदाब वाढला होता. (सर्वसाधारण रक्तदाब १२०/८० असतो. माझा १५०/११० होता.) त्यामुळे मला सतत चक्कर येत होती. मी चिकित्सालयातून येत असतांना पू. गाडगीळकाकांची भेट झाली. त्यांनी माझी अवस्था पाहून तुला त्रास होत आहे का ?, असे विचारले. तेव्हा मी त्यांना वरील कारण सांगितले. त्यावर पू. गाडगीळकाकांनी मला स्वरोदयशास्त्रानुसार उजव्या कुशीवर झोपण्यास आणि उजव्या कानात कापसाचा बोळा घातल्यास चंद्रनाडी चालू होऊन रक्तदाब न्यून होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे केल्यावर साधारण २ घंट्यांनी मला चांगले वाटले. त्या वेळी पुन्हा रक्तदाब तपासल्यावर तो न्यून म्हणजे १३०/९२ झाल्याचे आधुनिक वैद्यांना आढळले.
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०१६)

 

असह्य थकवा, अस्वस्थता आदी त्रासांचे
कारण आधुनिक वैद्यांना शोधता न येणे आणि
शिव-स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यानंतर ते त्रास टप्प्याटप्प्याने न्यून होणे

१. अचानक सर्वाधिक थकवा, अस्वस्थता आदी त्रास होणे
आणि आधुनिक वैद्यांनी तपासल्यानंतर शारीरिक स्थिती सामान्य असल्याचे सांगणे

१९.२.२०१६ या दिवशी अचानक सायंकाळी ५ वाजल्यापासून माझ्या शरिराला घाम फुटून अस्वस्थ वाटू लागले. हात-पाय गळून जाणे, शरिरातून उष्ण वाफा येणे, मन अस्वस्थ होणे आणि असह्य थकवा जाणवणे, असे त्रास होऊ लागले. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता मी विभागातील सेवा थांबवून खोलीमध्ये १ घंटा विश्रांती घेतली. तरीही त्रास न्यून न झाल्याने मी चिकित्सालयात जाऊन आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे यांना भेटलो. त्यांनी रक्तदाब आदी तपासून मला सांगितले, सर्व शारीरिक स्थिती सामान्य आहे.

२. दुसर्‍या दिवशी वरील त्रास वाढणे आणि त्यावर पू. डॉ. मुकुल गाडगीळ
(पू. गाडगीळकाका) यांनी शिव-स्वरोदयशास्त्रानुसार उपाय सांगणे

२०.२.२०१६ या दिवशी सकाळी मला उठता येत नव्हते. माझी स्थिती प्राणशक्तीहीन झाल्यासारखी होती. सकाळी ११ वाजता उठल्यानंतर मी कसेबसे आवरून महाप्रसाद घेऊन विभागात पोचलो. तेव्हा मला श्री. भानु पुराणिक यांनी पू. गाडगीळकाकांना भेटून उपाय विचारण्यास सांगितले. त्यानुसार मी पू. गाडगीळकाकांना माझी स्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला एकेक नाकपुडीद्वारे श्‍वासोच्छ्वास करून सूर्यस्वर (सूर्यनाडी) चालू आहे कि चंद्रस्वर (चंद्रनाडी) चालू आहे ?, ते पहाण्यास सांगितले. तेव्हा डाव्या नाकपुडीद्वारे श्‍वासोच्छ्वास करणे मला अवघड जात असल्याने चंद्रस्वर चालू नसल्याचे लक्षात आले. त्यावर पू. गाडगीळकाकांनी सांगितले, शिव-स्वरोदयशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही उजव्या कानात कापूस घालून ठेवा. त्यामुळे चंद्रस्वर चालू होईल.

 

३. शिव-स्वरोदयशास्त्रानुसार केलेल्या उपायांमुळे टप्प्याटप्प्याने त्रास न्यून झाल्याने
रात्री ११.३० वाजेपर्यंत सेवा करता येणे आणि दुसर्‍या दिवशी प्रकृती पूर्ववत् होणे

मी उजव्या कानात कापूस घातल्यावर दीड घंट्यात डोक्यापासून कमरेपर्यंतचा सर्व त्रास ५० टक्क्यांपर्यंत अल्प झाला. तीन घंट्यांनंतर गुडघ्यापर्यंतचा थकव्याचा त्रास अल्प झाला. पाच घंट्यांनंतर केवळ पायाच्या घोट्याखाली थोडा-फार अशक्तपणा जाणवत होता. नंतर रात्री ११.३० वाजेपर्यंत मी व्यवस्थित सेवा करू शकलो. अशा प्रकारे कोणत्याही औषधाविना मी दुसर्‍या दिवसापासून पूर्वीप्रमाणे सेवा करू लागलो.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले आगामी आपत्काळासाठी
उपयुक्त शिव-स्वरोदयशास्त्रातील उपचारपद्धतीविषयी
ग्रंथनिर्मिती करत असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

ही सोपी उपायपद्धती आपत्कालात किती परिणामकारक ठरू शकते ?, याचा अनुभव घेण्याची संधी श्रीकृष्णाने मला दिली, तसेच शिव-स्वरोदयशास्त्रातील उपचार आगामी आपत्काळात समाजाला उपयुक्त ठरावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आताच ग्रंथनिर्मिती करत आहेत, ही गोष्ट समजल्यावर मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०१६)

संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ स्वरोदयशास्त्रानुसार उपाय

     (आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)