१. व्याख्या आणि समानार्थी शब्द
अ. उपनयन यात ‘उप’ आणि ‘नयन’ असे दोन शब्द आहेत. ‘उप’ शब्दाचा अर्थ ‘जवळ’ आणि ‘नयन’ शब्दाचा अर्थ ‘नेणे’, असा आहे. म्हणूनच उपनयन शब्दाचा अर्थ आहे, ‘गायत्रीमंत्र शिकविण्यासाठी गुरूंजवळ (शिक्षकाजवळ) नेणे’. नयन शब्दाचा अर्थ डोळा असाही आहे. उपनयन म्हणजे अंतःचक्षू. ज्या विधीने अंतःचक्षू उघडायला आरंभ होतो, साहाय्य होते, त्याला ‘उपनयन’ असे म्हणतात.
आ. व्रतबंध म्हणजे व्रताने, धर्मनियमाने, ब्रह्मचर्याने वागण्याचे जेथे बंधन येते, तो विधी. त्याआधी बालक कसाही वागला, तरी त्याला बंधने नसतात. ब्रह्मचर्य म्हणजे ज्ञानस्वरूप स्वसंवेद्य आत्मा, म्हणजेच ब्रह्म, यात लीन होणे, आत्मस्वरूप होणे.
इ. उपनयनविधीत ‘मुंज’ नावाचे गवत कटिला (कमरेला) बांधतात; म्हणून या विधीला ‘मुंज’ असेही म्हणतात. ज्याची मुंज केली जाते, त्याला बटू, ब्रह्मचारी इत्यादी नावे आहेत. मुंज झालेल्याला ‘उपनीत’ म्हणतात.
२. उद्देश
प्रत्येक मनुष्य हा जन्मतः शूद्र असतो, म्हणजे शरिराची स्वच्छताच (साफसफाईच) करायला शिकतो. पुढे कर्म करून तो ‘दि्वज’ होतो. ‘दि्व’ म्हणजे ‘दोन’ आणि ‘ज’ म्हणजे ‘जन्माला येणे’. मुंजीतील संस्कारांमुळे मुलाचा एकाप्रकारे जन्मच होत असल्याने ‘तो दि्वज झाला’, असे म्हटले जाते. ब्रह्मचार्याचा
दुसरा जन्म (ब्रह्मजन्म) हा मौजी-बंधनाने चिन्हित असतो. त्याचे प्रतीक ‘मुंजमेखला धारण करणे’, हे असते. या जन्मात सावित्री ही त्याची माता आणि आचार्य हा पिता, असे सांगितले जाते (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १७०). दि्वज झाला की, तो गायत्रीमंत्राचा अधिकारी होतो, म्हणजे साधना करण्यास लायक होतो. म्हणून मुंज केलीच पाहिजे; लग्न केलेच पाहिजे, असे नाही.
याज्ञवल्क्याचा टीकाकार अपरार्क लिहितो, ‘उपनयन शब्दाने छात्र आणि गायत्रीमंत्र यांच्यामधला संपर्क अभिप्रेत असून, आचार्यांच्या द्वारे तो संपर्क प्रस्थापित होतो.’ (याज्ञवल्क्यस्मृति, अध्याय १, श्लोक १४ वरील अपरार्क टीका)
३. महत्त्व
‘कुमाराने व्रतस्थ वृत्तीने राहून जीवनाला आवश्यक असे ज्ञान ग्रहण करावे’, यासाठी ‘उपनयन’ हा विधी आहे. त्याला १२ वर्षे ऋषीकुलात रहावे लागत असे. तेथे त्याला ४ वेद, ६४ कला, उपनिषद, धनुर्विद्या आणि आयुर्वेद असे सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असे. ज्ञानार्जन करून आलेला असा परिपूर्ण साधक पुढील जीवन जगण्यास समर्थ होत असे.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४. शिखा (शेंडी) आणि सूत्र (यज्ञोपवीत) यांचे महत्त्व
`शिखासूत्र हे हिंदूंचे लक्षण आहे. ते गौण आहे. तेवढ्यावरून धर्म ठरत नाही. सनातन हिंदु धर्म सर्वव्यापी आहे. शिखा-सूत्र ही लहानसहान बाह्य लक्षणे आहेत. त्यांना धर्म समजणे हा भ्रम आहे. मात्र शिखा-सूत्र हे हिंदु संस्कृतीचे प्राण आहेत. शिखासूत्राविना कोणतेच धर्मकार्य होत नाही. वेदांत ८० सहस्र कर्मकांडबोधक वचने आहेत आणि १६ सहस्र उपासनाबोधक मंत्र आहेत. संन्याशालाही ज्ञानमयी शिखा
आहे. दंडगतमुद्रा हेच त्याचे सूत्र (यज्ञोपवीत) आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
५. अधिकार
१. वर्णानुसार कितव्या वर्षी ?
हा संस्कार ब्राह्मणांत जन्मापासून आठव्या वर्षी, क्षत्रियांत अकराव्या वर्षी, वैश्यांत बाराव्या वर्षी करावा, असे आश्वलायन-गृह्यसूत्रात (खंड १९, सूत्र १ ते ४) म्हटले आहे. याचे कारण हे की, व्रतबंधासाठी आवश्यक सत्त्वप्रधानता ३० टक्के असते. त्या त्या वर्णाचे बालक त्या त्या वर्षी पुढील सारणीत दिल्याप्रमाणे साध्य करू शकते. ‘वर्ण जन्मतः साति्त्वकता (टक्के) ३० टक्के सात्त्विकता कितव्या वर्षी येते ?
पूर्वीच्या काळी १७व्या वर्षाच्या आधीच लग्न होत असे. म्हणून शूद्रांना उपनयनाचा अधिकार नव्हता, म्हणजे उपयोग नव्हता; कारण उपनयनानंतर गुरुगृही अध्ययनासाठी जावे लागे.
मनूने (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ३७) पुढीलप्रमाणे विकल्प सांगितला आहे : ब्रह्मवर्चसाच्या प्राप्तीसाठी ब्राह्मणकुमाराचे उपनयन पाचव्या वर्षी, बलप्राप्तीसाठी क्षत्रियाचे उपनयन सहाव्या वर्षी आणि ऐश्वर्यप्राप्तीसाठी वैश्याचे उपनयन आठव्या वर्षी करावे.
२. मुलींनाही उपनयनाचा अधिकार असणे
‘प्राचीन काळी मुलींचेही उपनयन करण्याची चाल होती. कूर्मपुराणात तसा उल्लेख आहे –
पुराकल्पे हि नारीणां मौजीबन्धनमीरितम् ।
अर्थ : पूर्वीच्या कल्पात स्त्रियांचे मौंजीबंधन सांगितले आहे. वडील, चुलता वा भाऊ मुलींना विद्यादान करी. अन्य पुरुषाला मात्र त्या कामी मनाई असे. ब्रह्मचारिणी मुलगी स्वगृहातच भिक्षा मागे. ‘स्त्रियांचे उपनयन अमंत्रक करीत’, असे मनु सांगतो (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ६६). यावरून मनूच्या काळीच ही प्रथा हळूहळू लोपत चालली असावी, असे वाटते. पुढच्या काळात कन्येचे वराकडून होणारे पाणिग्रहण हाच कन्येचा मुख्य संस्कार मानला गेला. संस्कार-रत्नमालेच्या उपनयनप्रकरणात हारीतस्मृतीतल्या वचनाला धरून स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले आहेत –
अ. ब्रह्मवादिनी : ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ती ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करून तिला वेदाध्ययन करू द्यावे.
आ. सद्योवधू : संसाराची इच्छा बाळगणारी असेल, ती सद्योवधू. तिचे उपनयन करून लगेच तिचा विवाह करावा, असे सांगितले आहे. आर्यसमाजी लोक आजही मुलींचे उपनयन करतात.’
६. पूर्वसिद्धता
उपनयन करण्याचा जो शुभमुहूर्ताचा दिवस ठरला असेल, त्याच्या पूर्वदिवशी किंवा आदले तीन दिवस कुमाराने केवळ दूध पिऊन असावे. यामुळे सात्त्विकता वाढते.
७. बटूचा संकल्प
‘मला इच्छेस येईल त्याप्रमाणे आचरण करणे, इच्छेनुसार हवे त्याप्रमाणे भाषण करणे आणि मनास वाटेल त्याप्रमाणे खाणे, पिणे इत्यादींपासून उत्पन्न झालेल्या दोषांचे निरसन मी तीन कृच्छ्र प्रायश्चित्ते करून अथवा पैशांच्या दानाने करीन.’
८. उपनयनकर्त्याचा संकल्प
‘या कुमाराच्या उपनयनाचा अधिकार येण्याकरिता गायत्रीमंत्राचा १२ सहस्र जप करीन. कुमाराच्या उपनयनामध्ये ग्रहानुकूलतेची सिद्धी आणि श्री परमेश्वरप्रीती होण्याकरिता ग्रहयज्ञ करीन.’ मुलाचे उपनयन करण्याचा पहिला अधिकार त्याच्या वडिलांचा असतो. मुंज करायची ठरल्यानंतर १२ सहस्र वेळा गायत्रीमंत्राचा जप करतात.
९. मंडपदेवताप्रतिष्ठा (देवक बसविणे)
`बृहस्पति ही उपनयनाची प्रमुख देवता आहे. विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, या उद्देशाने मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे.
१०. केशवपन, स्नान आणि कुंकुमतिलक
‘या बालकाचे उपनयन करण्याकरिता या कर्माचे पूर्वांगभूत केशवपन (हजामत) करीन’, असा संकल्प करावा आणि त्याप्रमाणे नंतर कुमाराचे वपन करावे आणि त्याला स्नान घालून शेंडी बांधावी. (उपनयनाबरोबर चौलसंस्कार केल्यास केसांचे वपन केलेले असल्याने वरील संकल्प करण्याची आवश्यकता नाही.) (शेंडीचे महत्त्व ‘चौलकर्म’ या लेखात दिले आहे.) शेंडीला ‘शिखा’, शेंडीच्या गाठीला ‘शिखाग्रंथी’ आणि शेंडी बांधण्याच्या कृतीला ‘शिखाबंधन’ असे म्हणतात. शेंडी बांधल्यानंतर कपाळाला कुंकुमतिलक लावावा.
११. घरचा अहेर आणि त्याचे महत्त्व
मंगलवाद्यांच्या नादात घरात जाऊन, ईशान्य दिशेला तांदळाची रास करून राशीवर भगवती, मातृका आणि अविघ्नकलश असलेले सूप यांची ‘तदस्तु मित्रावरुणा०’ आणि ‘गृहा वै प्रतिष्ठासूक्तं०’ हे दोन मंत्र म्हणून स्थापना करून, गंधाक्षता, पुष्पे आदींनी पूजा करावी. नंतर यजमानास आणि त्याच्या स्त्रीस सुवासिनीने ओवाळल्यावर आप्तेष्ट, सगेसोयरे इत्यादी मंडळींनी त्यांना अहेर करावे. शाब्दिक शुभेच्छांचा परिणाम थोडा वेळ टिकतो, तर वस्तूरूप शुभेच्छांचा परिणाम जास्त काळ टिकतो; म्हणून अहेर देतात. अहेराच्या वेळी मंत्र म्हणत असल्याने शुभेच्छा जास्त प्रभावशाली होतात.
१२. मुहूर्तघटिकास्थापना
तांदळादी कोणत्याही धान्याच्या राशीवर तांब्याचे पात्र (घंगाळ किंवा कोणतेतरी एखादे भांडे) ठेवावे. नंतर ‘इमं मे०’ हा मंत्र म्हणून त्यात उदक घालावे आणि नंतर त्यात घटिका यंत्र टाकावे. त्या वेळी पुढील अर्थाचा मंत्र म्हणतात.
‘यंत्रांमध्ये प्रमुख अशा हे यंत्रा, आरंभी तुजला प्रजापतीने उत्पन्न केले आहे. एतदर्थ सौभाग्यादी आणि आयुष्य, आरोग्य, चांगली संतती आणि धन यांच्या प्राप्तीसाठी तुझी स्थापना करीत आहे. त्यायोगे आम्हास इष्ट अशी कार्यसिद्धी प्राप्त होवो.’
टीप – सध्याच्या काळात घड्याळाचा उपयोग करत असल्यामुळे घटिका यंत्र स्थापन करीत नाहीत.
१३. मातृभोजन (आईसह शेवटचे जेवण)
हे कुमाराचे आईसह तिच्या ताटात जेवायचे शेवटचे जेवण असते; कारण त्यानंतर त्याचा पुनर्जन्म होणार असतो आणि तो गुरुगृही जाणार असतो. या वेळी आठ बटूंना जेवण दिले जाते. याला ‘अष्टवर्ग’ असे म्हणतात.
१४. मुंज लावणे
मुंज करणारा पिता आणि कुमार यांच्यामध्ये अंतर्पाट धरून मंगलाष्टके म्हणतात. पिता हा गायत्रीमंत्र शिकविणारा पहिला गुरु (आचार्य) समजतात. पिता आणि कुमार यांच्यात धरलेला अंतर्पाट दूर करून त्यांच्यातील अंतर नाहीसे करतात.
पूर्वीच्या काळी उपनयनविधीनंतर मुले गुरूंकडे शिकायला जात असत. त्यामुळे मंगलाष्टके संपून ‘सावधान’ म्हटले की, आई-वडिलांना मुलाच्या विरहाची जाणीव होऊन ते व्याकुळ होत असत. आईला मुलाच्या विरहाचे जास्त दुःख होई; म्हणूनच मंगलाष्टके चालू असतांना मुंजमुलाच्या आईने दूर रहाण्याची प्रथा पडली आहे. यात शास्त्रार्थ नाही.
१५. लंगोटी आणि वस्त्रधारण
नंतर कौपिनासाठी (लंगोटीकरिता) त्रिगुणित (तिहेरी) केलेले कापडाचे सूत (दोरा) कुमाराच्या कमरेस बांधून त्यास कौपीन (लंगोटी) नेसवावी. त्रिगुणित दोरा त्रिगुणांचे प्रतीक आहे, तर लंगोटी हे त्रिगुणांना बंधनात ठेवण्याचे आणि ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. मंत्र म्हणून कुमारास शुभ्र (पांढर्या) रंगाचे अहत (नवे) वस्त्र परिधान करवावे (नेसवावे). नंतर तोच मंत्र पुन्हा म्हणून त्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र पांघरण्यास द्यावे. पांढरा रंग पावित्र्याचे प्रतीक आहे, तर पिवळे वस्त्र ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. नवे वस्त्र अशासाठी देतात की, त्यावर दुसर्या कोणी वापरल्यामुळे संस्कार झालेले नसतात.
१६. अजिनधारण
मंत्र म्हणून कुमारास अजिन (चामडे) धारण करवावे. साधारणतः मृगाजिन (हरिणाच्या चामड्याचा तुकडा) देतात; कारण पुढे साधनेसाठी अजिनावर बसायचे असते.
१७. यज्ञोपवीतधारण
नंतर यज्ञोपवीत (ब्रह्मसूत्र, जानवे) हाती घेऊन, दहा वेळा गायत्रीमंत्र म्हणून, अभिमंत्रित उदकाने त्याचे प्रोक्षण करावे. त्यामुळे त्याच्यात तेजतत्त्व येते. नंतर ते कुमारास धारण करण्यास द्यावे. ‘यज्ञोपवीत’ हा शब्द ‘यज्ञ’ + ‘उपवीत’ असा बनला आहे. वीत म्हणजे विणलेले, म्हणजेच वस्त्र. उपवीत म्हणजे उपवस्त्र.
‘यज्ञोपवीत डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात. ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे सव्य असावे.
पितृकार्यात ते उजव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी, म्हणजे मानुषकर्माच्या वेळी ते निवीत, म्हणजे माळेसारखे ठेवावे. (ऋषीतर्पण करतांना, तसेच वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यावर जानवे माळेसारखे घालतात.) यज्ञोपवीतावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे. एकाने दुसर्याचे यज्ञोपवीत घालू नये.
‘यज्ञोपवीत तुटले, तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे’, असे मनु सांगतो.
‘ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे, क्षत्रियाने तागाच्या दोर्याचे आणि वैश्याने बकर्याच्या लोकरीच्या धाग्याचे यज्ञोपवीत वापरावे’, असे मनूने सांगितले आहे (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ४४).’
अ. मलमूत्राचा त्याग करतांना जानवे उजव्या कानावर का ठेवावे ?
अ १. ‘निवीती दक्षिणे कर्णे यज्ञोपवीतं कृत्वा उत्कटकमासीनः अहनि उदङ् मुखः रात्रौ
दक्षिणामुखः तृणैरन्तरिते मूत्रपुरीषे विसृजेत् । – वैखानसधर्मसूत्र, खंड १६, सूत्र १०
अर्थ : जानवे माळेसारखे करून उजव्या कर्णाचे ठिकाणी ठेवून, उकीडवे बसून, दिवसा उत्तरेकडे आणि रात्री दक्षिणेकडे तोंड करून गवताने झाकलेल्या भूमीवर मलमूत्रविसर्जन करावे.
जानवे हे पवित्र असते. मलमूत्रोत्सर्गाचे वेळी आपण अशुची अवस्थेत असतो. ब्राह्मणाच्या उजव्या कानाच्या ठिकाणी अग्नि, आप, वरुण, सूर्य, वायु, इंद्र आणि चंद्र या सात देवतांचा वास नित्य असतो. त्यामुळे त्या ठिकाणी जानवे ठेवावे. ते विसरले गेल्यास जानवे दुसरे घालावे. जानवे माळेसारखे करून उजव्या कर्णाचे ठिकाणी ठेवून मलमूत्रविसर्जन करावे.
अ २. ऊर्ध्वं नाभेर्मेध्यतरः पुरुषः परिकीर्तितः । – मनुस्मृति, अध्याय १, श्लोक ९२
अर्थ : पुरुषाच्या नाभीप्रदेशावरील देहाचा भाग अधिक पवित्र असतो.
नाभीखालील भाग अपवित्र हा मानलेला असल्यामुळे मूत्र आणि पुरीष (शौच) यांचा त्याग करतांना यज्ञोपवीत निवीत (दोन्ही खांद्यांवरून गळ्यात माळेप्रमाणे) करून उजव्या कानावर ठेवावे. उजव्या कानाचे महत्त्व शास्त्रात ठिकठिकाणी सांगितलेले असून आदित्य, वसू, रुद्र, वायु, अगि्न, धर्म, वेद, आप, सोम, सूर्य, अनिल इत्यादी सर्व देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला नुसता स्पर्श केला, तरी आचमनाचे फळ मिळते. अशा पवित्र उजव्या कानावर यज्ञोपवीत ठेवल्यास त्यास अशुचित्व बाधत नाही. ‘उजव्या कानाला इतके महत्त्व येण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे उजव्या कानातील नस आणि गुप्तेंद्रिय आणि अंडकोष यांचा अन्योन्य संबंध आहे.
मूत्रोत्सर्गाचे वेळी सूक्ष्म वीर्यस्राव होण्याची शक्यता असते. उजव्या कानाला सूत्राने लपेटल्यावर शुक्रनाशापासून बचाव होतो, हे आयुर्वेदशास्त्रदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. एरव्ही स्वप्नदोष वारंवार होत असेल, तर उजवा कान बांधून झोपल्यास तो दोष निवारण होतो, हे दिसून येते. कोणत्याही जनावराच्या कानाचा नियंत्रण मिळवल्यास त्याचा माद (मस्ती) तात्काळ जिरतो, हे दिसून येते. अंडवृद्धीची सात कारणे असून मूत्रज अंडवृद्धी हे त्यांपैकी एक कारण आहे. कानाला सूत्रवेष्टन झाल्यास मूत्रज अंडवृद्धी होत नाही.’
१८. अवक्षारण संकल्प (शिष्यत्व सिद्ध करणे)
‘कुमाराच्या पवित्रतेकरिता आणि सवितृदेवतेच्या (सूर्याच्या) तृप्तीकरिता अञ्जलिक्षारण करतो’, असा संकल्प पुरोहित करतात. या विधीत कुमाराचे नक्षत्राच्या चरणअक्षरावरून लिहिलेले नाव त्याच्या उजव्या कानात सांगितले जाते.
१९. विभूतीग्रहण
‘मानस्तोके०’ हा मंत्र म्हणत विभूती घ्यावी आणि पुढील मंत्र म्हणत त्या त्या ठिकाणी विभूती लावावी – त्र्यायुषं जमदग्नेः (कपाळ), कश्यपस्य त्र्यायुषं (कंठ), अगस्त्यस्य त्र्यायुषं (बेंबी), यद्देवानां त्र्यायुषं (उजवा
खांदा), तन्मे अस्तु त्र्यायुषं (डावा खांदा) आणि सर्वमस्तु शतायुषम् (टाळू). विभूती वैराग्यकारक आहे.
२०. उपस्थान (गायत्री) मंत्रग्रहण
उपस्थान मंत्रग्रहण म्हणजे ‘गायत्रीमंत्र शिकवा’ अशी प्रार्थना. नंतर पुढील गायत्रीमंत्र शिकवितात.
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।
२१. मेखलाबंधन
बटूच्या कटिला (कमरेला) मेखलेचे तीन वेढे देऊन नाभी (बेंबी) जवळ दोन्ही टोकांच्या तीन गाठी घ्याव्या. त्या वेळी ‘आरण्यके (वेदांचा एक भाग), उपनिषदे यांचे प्रतीकात्मक शिक्षण घेऊन षडंगयुक्त तीनही वेदांनी मी वेष्टित झालो आहे’, असे कुमाराने समजावे. ‘ब्राह्मणकुमाराला मुंजतृणाची, क्षत्रियाला धनुष्याच्या दोरीची आणि वैश्याला ‘शण’ नावाच्या वनस्पतीची मेखला करावी’, असे मनु सांगतो (अध्याय २, श्लोक ४२).
२२. दंडधारणविधी
मंत्र म्हणून दंड बटूच्या हाती द्यावा. त्या वेळी बटूने म्हणावे, ‘उद्धट (कोणासही न जुमानणारा, दांडगा) असलेल्या मला दमन करून सन्मार्गाने वागविणारा हा दंड मी हाती धरिला आहे. तो ज्यापासून मला भय प्राप्त होण्यासारखे असेल, त्यापासून माझे रक्षण करो.’ हा दंड म्हणजे पळसाच्या (पलाशाच्या) झाडाची शेंड्याकडील ताठ आणि सरळ अशी फांदी.
२३. आचारबोध आणि बटूव्रत
अ. आचारबोध
‘तू ब्रह्मचारी आहेस तेव्हा,
अ १. मूत्र, पुरीषोत्सर्ग (शौचाला जाणे), भोजन, मार्ग चालणे, झोप घेणे, ही कृत्ये केल्यावर शुद्धीकरिता आचमन करीत जा.
अ २. संध्योपासना, होम इत्यादी नित्यकर्मे प्रतिदिन करीत जा.
अ ३. दिवसा झोप घेत जाऊ नकोस.
अ ४. आचार्यांच्या स्वाधीन राहून वेद म्हणत जा.
अ ५. सकाळी आणि संध्याकाळी भिक्षा मागत जा.
अ ६. सकाळी आणि संध्याकाळी अग्नीवर समिधा देत जा.
अ ७. बारा वर्षे अथवा वेदाध्ययन आटोपेपर्यंत ब्रह्मचर्य पाळ.
अ ८. जो पुरुष अथवा जी स्त्री तुला काहीतरी भिक्षा दिल्याविना परत जाऊ देणार नाही, त्यांच्याकडे भिक्षा मागावयास जात जा.’
असा आचारबोध केल्यावर ‘यदस्यकर्मणो०’ (होमाचा उत्तर भाग) येथून राहिलेला होम समाप्त करावा.
आ. बटूव्रत
आचारबोध पाळणे, लवण (मीठ) आणि क्षार वर्ज्य, खाली (पलंगावर नव्हे) झोपणे इत्यादी. या व्यतिरिक्त बटूने पाळावयाच्या विविध यमनियमांचे विवेचन स्मृतीग्रंथांत दिलेले असते.
२४. भिक्षाग्रहण
बटूने अनुप्रवचनीय होम आणि पुरोहितभोजनास लागेल एवढी तांदळाची भिक्षा मागावी. त्या वेळी अगोदर आईजवळ जाऊन ‘ॐ भवति भिक्षां देहि ।’ (‘आपण भिक्षा द्या’), असे म्हणावे. नंतर वडिलांपाशी जाऊन तसेच म्हणावे. याप्रमाणे मावशी, वडील, बहीण आणि आप्त यांच्याजवळ भिक्षा मागून ते भिक्षान्न आचार्यांजवळ द्यावे. (आई-वडील, मावशी, बहीण यांच्या अभावी इतर कोणाहीजवळ भिक्षा मागावी.) यानंतर लाडाने आई-वडील किंवा नातेवाइक यांच्याकडे काही मागण्याचा त्याला हक्क उरत नाही.
२५. मंडपदेवकोत्थापन
देवक ठेवल्या दिवसापासून २-४-५-७-८ किंवा १० या दिवशी त्याचे उत्थापन करावे.
२६. धर्ममुंज
धर्ममुंज म्हणजे एखाद्या गरीब मुलाची स्वव्ययाने (खर्चाने) मुंज लावणे.