८ मार्च १९१० या दिवशी अमेरिकेतील कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत वस्त्रोद्योगातील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्याचे त्या वेळी ठरले. याच वेळी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्याची मागणी करण्यात आली. भारतात वर्ष १९४३ पासून हा दिवस साजरा करायला आरंभ झाला. सध्या तो आता अधिकोष, शासकीय आणि खाजगी कार्यालये, सामाजिक संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये, सर्व प्रसारमाध्यमे, सामाजिक संकेतस्थळे अशा विविध स्तरांवर साजरा होतो. सध्या हे दिन साजरे करण्याचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, खरोखरच असे दिन साजरे करणार्या कार्यक्रमांतून काही साध्य होते का, हे पडताळून पहायला हवे. त्याची फलनिष्पत्ती काही विशेष नसतेच; कारण मुळातच त्याचा वैचारिक गाभा हा पोकळ आहे. एखाद्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या स्त्रियांचे कौतुक करणे, येथपर्यंतच त्याचे साजरीकरण मर्यादित रहात आहे. त्यामुळे पत्रकारदिन, महिलादिन यांसारखे दिवस एक करायचे म्हणून साजरे करायचे असेच बहुतेक ठिकाणी होत आहे. सामाजिक स्तरावरचे दिन साजरे करण्याची पाश्चात्त्यांची टूम अलीकडच्या काळीतील आहे. भारतीय संस्कृतीत पूर्वापार आध्यात्मिक स्तरावर तिथीनुसार सण साजरे केले जातात आणि त्याचा चैतन्याच्या स्तरावर सर्वांना लाभ होतो.
भारतीय संस्कृती ही स्त्रियांच्या शीलरक्षणाची संस्कृती आहे. त्यावरून रामायण आणि महाभारत ही युद्धे घडली आहेत, इतके ते महत्त्वाचे आहे. आज भारतीय स्त्रियांच्या शीलाचे अक्षरशः वाभाडे निघालेले आहेत आणि याला जितके पुरुष उत्तरदायी आहेत, तितकीच ती स्वतःही उत्तरदायी आहे. असे असतांना या महिलादिनांतून या समस्येवर काही ठोस उपाययोजना निघतांना मात्र दिसत नाही; उलट यंदा तर सुडौल बांध्यासाठी औषधे देणार्या आस्थापनांनीही महिलादिनाच्या निमित्ताने विज्ञापने दिली आहेत, याच्याएवढा महिलादिनाच्या निमित्ताने झालेला महिलांचा अवमान दुसरा कोणता नसेल ! ही विज्ञापने म्हणजे परत एकदा स्त्रीच्या शरिराकडे उपभोग्य वस्तू म्हणून पहाणेच नव्हे का ? ज्या उद्देशाने स्त्रीवाद्यांचा संघर्ष आहे, त्यालाच इथे हारताळ फासला जात नाही का ?
नैतिक अवमूल्यन थांबवण्यासाठी प्रयत्न आवश्यक !
पाश्चात्त्य देशात पूर्णतः विफल ठरलेल्या समाजवादावर आधारित असलेले स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र वारंवार उपस्थित केले जाते, तसेच मंदिरप्रवेशांसारखी सूत्रे घेऊन स्त्रियांवर किती मोठा अन्याय होत आहे, याचे गळे काढले जातात. समाजात सर्व जण जसे समान पातळीवर असू शकत नाहीत, तसेच स्त्री आणि पुरुष हे निसर्गतः भिन्न असल्याने ते समान असण्याचा प्रश्नच येत नाही. ते दोघेही त्यांच्या स्तरावर श्रेष्ठ आहेत, त्या दोघांच्याही त्यांच्या स्तरावर क्षमता आणि मर्यादा आहेत; परंतु ते समान कसे असू शकतील ? त्यांच्या समानतेसाठी अट्टाहास करणे, म्हणजे त्यांनी लिंगपालट करण्यासारखे हास्यास्पद आहे. भारतीय संस्कृतीने नारीचे सबलत्व जाणलेले नाही किंवा त्यानुसार तिला संधी दिलेली नाही, असे कधीच आढळणार नाही. कुटुंबात मुलींना किंवा स्त्रियांना दिल्या जाणार्या दुय्यम वागणुकीची काही अपवादात्मक उदाहरणे सांगितली जातात, ती काही सरसकट असतात, असे नव्हे; शिवाय त्यामागील कारणमीमांसाही वेगळ्या असतात. मद्य पिऊन मारहाण करणार्या नवर्याला वठणीवर कसे आणायचे, हे महिलांना ठाऊक नसते असे नव्हे. स्त्रियांच्या जीवनात येणारी दुःखे पहाता स्त्री म्हणून ती भोगावी लागत आहेत, असे वरवर पहाता वाटते, त्यामागेही पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव आहे. प्रत्यक्षात भारतीय आध्यात्मिक विचारसरणीनुसार ती दुःखे तिच्या प्रारब्धाचा भाग असतात. हे सत्य समजून घेण्याची क्षमता नसल्यामुळे पुरोगाम्यांचे पित्त लगेच खवळेल आणि ते चवताळून म्हणतील, बघा प्रतिगाम्यांची स्त्रियांवर अन्याय करणारी विचारसरणी. याचा अर्थ स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, असे नव्हे; परंतु सध्या महिलांसाठी कार्य करणार्या सामाजिक संघटनांकडून त्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे मानसिक आणि सामाजिक स्तरावरचे असल्याने ते अपूर्ण आहेत, तसेच ते बहुतांश वेळा पूर्णतः चुकीच्या दिशेने होत आहेत. भारतात बलात्कारांचे प्रमाण भयावह वाढले असतांना जागोजागी शासनाने आणि स्वयंसेवी संस्थांनी स्त्रियांना स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करणे आवश्यक होते. बलात्कार्यांना तत्परतेने कठोरात कठोर शासन कसे होईल, हे पहाणे आवश्यक होते. आज स्त्री घरात आणि घराबाहेरही सुरक्षित नाही. आज अशी युवतीच नसेल की, जिला पुरुषांच्या वाईट दृष्टीला, छेडछाडीला किंवा कुठल्या ना कुठल्या लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले नसेल. प्रसारमाध्यमे, शासन आणि स्त्रियांसाठी काम करणार्या संघटना यांनी समाजाचे झालेले हे नैतिक अवमूल्यन थांबवण्यासाठी महिलादिनाच्या निमित्ताने प्रयत्न केले पाहिजेत; तर उलट हे तीनही घटक सौंदर्यप्रसाधने, तोकडे कपडे, फॅशन, सौंदर्यस्पर्धा, मॉडेलिंग आदींसाठी स्त्रियांना प्रोत्साहन देत आहेत. स्त्रीभ्रूण हत्या, तसेच स्त्रियांवरील अन्याय हे केवळ धर्माचरण आणि साधना यांनीच थांबू शकतात. भारतीय संस्कृती साधना आणि उपासना करणार्या सहिष्णु समाजाची संस्कृती आहे. साधना करणारा समाज हा स्त्रियांवर कधीही अन्याय करत नाही; उलट तिचा योग्य तो सन्मानच करतो आणि त्यामुळेच तिथे कधी स्त्री-पुरुष समानतेसारखे हास्यास्पद विषयही निर्माण होत नाहीत. त्यामुळे त्याला समाजवादी आणि साम्यवादी यांच्यासारखी बेगड्या समानतेची ओरडही करावी लागत नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्रात असे महिलादिन नसतील !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात