झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले
या भुतांवर आधारीत मालिकेला अंनिसचा विरोध
मुंबई – अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, तरी त्याचे समर्थन करणारी मंडळी आपण अलीकडेच पाहिली. याचा निषेध करायला अंनिसवाले पुढे आले नाहीत; (कदाचित् त्यांनाही ते मान्य असावे) मात्र भुतांच्या काल्पनिक कथांवर आधारित मालिकेला विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे भूत झी मराठी वाहिनीला सध्या पछाडत आहे. जगभरात भुतांवर संशोधन करणार्या शेकडो संस्था अस्तित्वात असतांना स्वतः भुतांचे अस्तित्व आहे कि नाही याचा काडीचाही अभ्यास न करता, असे काही नसतेच असे म्हणणारी अंनिसची मंडळी खरेच पुरोगामी म्हणावीत का ?, असा प्रश्न सनातन संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. भुतांच्या शोधासाठी अमावास्येच्या रात्री १२ वाजता स्मशानात जाऊन कार्यक्रम करण्याचा स्टंट करणार्यांनी किमान आपल्याला लावून घेतलेली तथाकथित पुरोगामीत्वाची झापडे बाजूला करून जगात काय चालू आहे, याचा थोडा जरी अभ्यास केला असता, तरी त्यांचे भूत उतरले असते.
२. अंनिसच्या पुरोगामीत्वाचे भूत कोणाला पछाडेल, याचा काही नेम नसतो; कारण भुतांच्या मालिकेला विरोध करणारे अंनिसवाले वसईतील भोंदू फादरच्या चमत्कारांविषयी गप्प होते, तसेच गोव्यातील फ्रान्सिस झेवियरच्या उदात्तीकरणाला, मदर तेरेसाच्या चमत्कारिक संतपदाला मात्र ही अंनिसची भूतबाधा लागू झाली नाही. भुतांवर आज काही पहिल्यांदाच अशी मालिका चालू झाली नसून, यापूर्वीही झी हॉरर शो, आहट, हवाये, होनी अनहोनी आदी मालिका, तसेच राज, कृष्णा कॉटेज, भूतनाथ आदी शेकडो चित्रपट भुतांवर आधारित येऊन गेले आहेत.
३. हॉरर चित्रपटांचा एक प्रेक्षकवर्गही आहे. अशा चित्रपटांना अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी (हयात असतांना) कधी विरोध केला नाही; मग आताच अंनिसवाल्यांना विरोध करण्याचे भूत कसे काय आठवले ? देवावर विश्वास नसणारी मंडळी भुतांवर विश्वास कशी ठेवणार ?
४. काही भोंदूबाबांकडून भूत उतरवण्याच्या नावाखाली चालणार्या शोषणाला आमचा मुळीच पाठिंबा नाही; मात्र भूत नसते आणि त्याचा प्रसार करणार्यांवर कारवाई करा, असे म्हणणे हास्यास्पद आहे.
५. प. बंगालमधील कोलकाता या महानगरातील ब्रिटिशांच्या काळातील इमारतींमधील भुतांवर संशोधन करण्यासाठी विदेशातून एक गट येऊन तेथे कार्यरत असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटनाची हानी होईल, ही अंनिसची अंधश्रद्धा आहे.
६. रामायण, महाभारतातही राक्षस होते; म्हणून ते खोटे आहे. असे काही नसते, ते मानू नका, असेही उद्या अंनिसची ही मंडळी म्हणतील. विदेशात भुतांचा शोध चालू आहे, तर भारतात लोक देवाची अनुभूती घेत आहेत. अशा वेळी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या परीक्षानळीतूनच सिद्ध करण्याचा अट्टाहास न धरता प्रत्येकाला त्याची श्रद्धा जोपासण्याचे संविधानाने दिलेले स्वातंत्र्य तरी किमान उपभोगू द्यावे.