विवाहाविषयी शंकानिरसन

१. नोंदणी विवाहापेक्षा (‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा)
धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का ?

Ragistered_Marriage_inner_banner_bk

१ अ. आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी नसलेला ‘नोंदणी विवाह’

‘नोंदणी विवाह’ ही पद्धत १८७२ मध्ये इंग्रजांच्या राजवटीत निर्माण झाली. या माध्यमातून मिळणार्‍या करातून शासकीय उत्पन्न वाढवणे, हा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश होता. हिंदुस्थानात आजही ही पद्धत पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाच्या सवयीतून किंवा काटकसर म्हणून पाळली जाते. या विवाहात कोणताही विधी न करता, तसेच मुहूर्त इत्यादी न पहाता कागदोपत्री विवाह केला जातो.

हिंदु धर्मानुसार मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीकरिता आहे. गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी केलेल्या धार्मिक संस्कारांमुळे मनुष्य ईश्वराच्या अधिक जवळ जातो, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. धार्मिक पद्धतीने विवाह केलेल्या अनेकांना याविषयी अनुभूतीही आल्या आहेत. नोंदणी विवाहात कोणतेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे वधूवरांवर धर्मसंस्कार होत नाहीत. त्यामुळे अशा विवाहाला नैर्बंधिक (कायदेशीर) मान्यता जरी मिळाली, तरी हा विवाह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरत नाही. यास्तव अल्प व्ययासाठी (खर्चासाठी) नोंदणी विवाहाचा धर्मविरोधी पर्याय न निवडता अत्यंत साध्या पद्धतीने; मात्र सर्व धार्मिक विधींसह विवाह करणे अधिक श्रेयस्कर आहे.

१ आ. धार्मिक पद्धतीने विवाह करण्याचे महत्त्व आणि लाभ

१ आ १. महत्त्व

विवाहामुळे वधू-वरांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होणे आणि वासनेपेक्षा मानसिक स्तरावर अन् आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास आध्यात्मिक स्तरावर मीलन होण्यास साहाय्य होणे : `धार्मिक पद्धतीने विवाह करतांना त्यात अनेक विधी केले जातात. प्रत्येक विधीमुळे वधू-वरांचे स्थूलदेह (शरीर) आणि सूक्ष्म-देह (मन, बुद्धी अन् अहं) यांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे वधू-वरांचे वासनेपेक्षा मनाच्या स्तरावर आणि आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास आध्यात्मिक स्तरावर मीलन होण्यास साहाय्य होते. इतर पंथांत अशा प्रकारे सात्त्विकता वाढण्यासाठी कोणतेही विधी केले जात नाहीत. त्यामुळे तशा प्रकारे विवाह झालेल्या जिवांचे मीलन बहुतांश वेळा केवळ शारीरिक स्तरावरच होते. विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे

१ आ २. लाभ

१ आ २ अ. पतीला ‘धर्मपत्नी’ मिळणे : धर्माने पत्नी स्वीकारण्याची अनुमती दिलेली असल्याने धार्मिक पद्धतीने विवाह केल्यावर पत्नीला ‘धर्मपत्नी’ म्हणतात.

१ आ २ आ. अधिकारापेक्षाही दायित्वाची जाणीव अधिक प्रमाणात होणे : सात्त्विकतेचा संस्कार करून विवाह संपन्न झाल्याने पती आणि पत्नी यांची अंतर्मुखता वाढते. त्यामुळे ते एकमेकांकडे केवळ शारीरिक स्तरावर न पहाता मानसिक स्तरावर पहातात, एकमेकांचा विचार करतात अन् समजूतदारपणाने आणि प्रेमाने वागतात. त्यांना अधिकारापेक्षाही दायित्वाची जाणीव अधिक प्रमाणात असते.

१ आ २ इ. होणारे मूल जन्मतःच सात्त्विक असणे : सात्त्विकतेचा संस्कार करून विवाह संपन्न झाल्याने अशा दांपत्याच्या पोटी जन्माला येणारे मूल जन्मतःच सात्त्विक असते.

१ आ २ ई. कौटुंबिक स्वास्थ्य टिकून रहाणे आणि मुलांना धर्माधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा मिळणे : आयुष्यभर आई-वडिलांनी व्यतीत केलेले आदर्श जीवन अन् सण, व्रते आणि कुलाचार यांचे केलेले पालन (धर्माचरण) यांमुळे कुटुंबाचे स्वास्थ्य चांगल्या प्रकारे टिकून रहाण्यास साहाय्य होते. मुलांनाही धर्माधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १८.११.२००५, दुपारी ३.३०)

 

२. लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य का आहे ?

`लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे यांवर देवतांची चित्रे छापण्याची पद्धत आहे. चित्रासमवेत देवतेचे नावही बहुधा छापलेले असते. उपयोग झाल्यानंतर अशा लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे कचरापेटीत टाकून दिल्या जातात किंवा कशाही अवस्थेत पडलेल्या असतात. त्यामुळे त्या देवतेची विटंबना होते; कारण ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील तत्त्वानुसार जेथे देवतेचे रूप किंवा नाव असते, तेथे तिचे तत्त्व असते. त्यामुळे ‘लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे यांवर देवतांची चित्रे छापू नयेत’, असा विचार मनात येणे साहजिकच आहे; पण देवतांच्या चित्रांची विटंबना झाल्याने होणार्‍या आध्यात्मिक तोट्यापेक्षा देवतांच्या चित्रांच्या अस्तित्वाने होणारा देवतेच्या तत्त्वाचा लाभ जास्त असतो. पुढील विवेचनावरून हे लक्षात येईल.

marriage

देवतांची चित्रे असलेल्या लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे बनवणे आणि त्यांचा वापर होणे, म्हणजे अनुक्रमे उत्पत्ती आणि स्थिती. त्यांचे प्रमाण अनुक्रमे २० आणि ५० टक्के, म्हणजे एकूण ७० टक्के असते (म्हणजे तेवढा देवतेच्या तत्त्वाचा लाभ होतो). या तुलनेत देवतांची चित्रे असलेल्या लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे टाकून देणे किंवा ती निरुपयोगी (खराब) होणे, म्हणजेच लय होणे (तोटा होणे), याचे प्रमाण ३० टक्के आहे. याचा अर्थ आपल्याला देवतांच्या चित्रांचा निवळ लाभ (७० वजा ३०) ४० टक्के होतो. तसेच नेहमी उत्पत्ती आणि स्थिती यांचा काळ लयापेक्षा जास्त असतो, म्हणजेच लय लवकर होतो (तोटा होण्याचा कालावधी अल्प असतो), उदा. जेव्हा देवतेची विटंबना चालू होते, तेव्हा तिचे अस्तित्व तेथून लगेचच लोप पावते. ही सर्व सूत्रे विचारात घेता ‘देवतांची चित्रे लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे यांवर छापणे योग्य आहे’, असे म्हणता येईल. लग्नपत्रिका किंवा शुभेच्छापत्रे निरुपयोगी झाल्यावर मात्र त्यावरील देवतांची चित्रे विसर्जित करणे योग्य आहे.’ – प.पू. डॉ. जयंत आठवले (२५.१०.२००६)

 

३. विवाहातील विधींच्या वेळी, तसेच
पूजाविधीच्या वेळी पत्नीने पतीच्या उजवीकडे का बसावे ?

पत्नीला पतीचे अर्धे अंग समजले जाते. शिवाची शक्ति म्हणून पत्नीने पतीला प्रत्येक कर्मात साथ द्यायची असते. विवाहातील विधींच्या वेळी, तसेच पूजाविधीच्या वेळी पत्नी, पतीच्या उजव्या हाताच्या मनगटाला आपल्या उजव्या हाताच्या चार बोटांचा (अंगठा सोडून) स्पर्श करून त्याला शक्ति पुरवते. यजमान पती-पत्नी यांनी केलेले कर्म शिव-शक्तीची जोड मिळाल्याने फलद्रूप होते. केवळ यज्ञकर्म करतांना  पत्नीने पतीच्या डाव्या हाताला बसावे.

 

४. विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?

‘विवाह म्हणजे शिवरूपी पती आणि शक्तिरूपी पत्नी या तत्त्वांचा संगम होय. प्रत्येक कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्ति (प्रत्यक्ष कार्य करणे) अन् त्या कर्माला गती प्राप्त करून देणारी, तसेच जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुणाशी संबंधित असणारी शक्ति यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारसागरातील कर्मे करणे आणि त्यासाठी थोरामोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी एकत्रितपणे नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्तिरूपी लहरी कार्यरत होऊन जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडून त्याची योग्य फलप्राप्ती झाल्याने न्यूनतम देवाणघेवाण संबंध (हिशोब) निर्माण होणे शक्य होते. म्हणून विवाहानंतर दोघांनी प्रत्येक कर्माला पूरक बनून नमस्कारासारख्या कृतीतूनही एकमेकांना अनुमोदन देणे, असा या कृतीमागील उद्देश आहे.

(पती-पत्नीपैकी नमस्कार करायला एक जणच उपस्थित असेल, तर एकट्यानेच नमस्कार करावा. – संकलक)

४ अ. पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार करतांना
पत्नीने पतीच्या कोणत्या अंगाला (बाजूला) राहून नमस्कार करावा ?

पत्नी ही शिवाची शक्ति तसेच नवर्‍याची उजवी नाडी म्हणजेच कार्याला ऊर्जा पुरवणारी असल्यामुळे जोडीने नमस्कार करतांना तिने पतीच्या उजव्या अंगाला रहावे.

४ आ. सौभाग्यवतीने ज्येष्ठांना नमस्कार कसा करावा ?

सौभाग्यवतीने ज्येष्ठांना नमस्कार करतांना तीन वेळा हात खाली-वर करावा. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींतील देवत्व प्रकट होऊन सौभाग्यवतीला शक्ती मिळते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.५.२००५, सायं. ६.४६)

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘विवाहसंस्कार : शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’