साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे पू. जयराम जोशी (आबा) (वय ७७ वर्षे) !

१. आबांची गुणवैशिष्ट्ये

१ अ. स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे

Pu_Jayram_Joshi_col
पू. जयराम जोशी

अ. आबा मला बरे नसतांना स्वतःचे कपडे स्वतःच धुण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी स्वतःला बरे नाही, असा विचार ते करत नाहीत. तेव्हा त्यांना तसे करू नका, असे सांगावे लागते.

आ. त्रास होत असतांना माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, या विचारामुळे ते काहीच सांगत नाहीत. त्यांना विचारल्यावर लक्षात येते. त्रास होत असतांना ते प.पू. डॉक्टरांचा चरित्रग्रंथ छातीला लावून जप करत आणि धावा करत बसून रहातात; परंतु पुष्कळ त्रास होईपर्यंत कुणालाही उठवत नाहीत. आपला त्रास प.पू. डॉक्टरांनाच कळतो, असे ते म्हणतात.

१ आ. प्रेमभाव

आबांना घर, आश्रम, प्रसार आणि समाज येथील व्यक्ती येऊन मनातील सर्व सांगतात. कुणीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते. आबाही त्यांना घरातील जवळचे समजून प्रेम देतात. उपाय सांगून पाठपुरावाही घेतात. त्यामुळे त्यांचे सर्वांशी घरातल्यासारखे नाते सिद्ध झाले आहे. रामनाथी आश्रमातून येतांना किंवा जातांना साधक मिरज आश्रमात थोड्या कालावधीसाठी येत. त्या वेळीही आबा त्यांच्याशी जवळीक साधत. आधी मला प्रश्‍न पडायचा, रामनाथी आश्रमात तर इतके उन्नत साधक आणि संत आहेत, तरीही साधनेत अडचणी आल्यावर साधकांचे आबांना कसे दूरभाष येतात ? नंतर लक्षात आले की, हे केवळ त्यांच्यातील प्रेमामुळेच आहे. त्यांच्याशी बोलल्यावर हलके वाटून मनाला पुढील प्रयत्नांसाठी उभारी येते. त्यांचा सर्वांना आधार वाटतो.

१ इ. रुग्णालयातही जवळीकता होणे

आबांना मार्च २०१३ मध्ये रुग्णालयात भरती केले असता आधुनिक वैद्य, त्यांच्या घरातले, परिचारिका यांच्याशी घरातल्यांसारखे नाते निर्माण केले. त्यांना रुग्णालयातून सोडतांना आधुनिक वैद्य, त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी त्यांना नमस्कार करून खाऊ दिला, तसेच रुग्णालयाचे पैसेही घेतले नाहीत.

१ ई. स्वीकारण्याची वृत्ती

आबांना कोणतीही चूक सांगितल्यावर ते ती लगेच स्वीकारतात आणि पुढे ती न होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे त्यांना चुका सांगतांना ताण येत नाही, तसेच ते मलाही चुका सांगतात. त्यांनी चुका सांगितल्यावर वाईट न वाटता त्या सुधारण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होतात.

१ ए. शिकण्याची वृत्ती

त्यांनी अल्प कालावधीत स्वागतकक्षाची सेवा शिकून घेतली. त्यानंतर त्रास वाढल्यावर बसून करू शकणारी साप्ताहिक सनातन प्रभातची पोस्टाची सेवा त्यांनी शिकून घेतली.

१ ऐ. दायित्व घेऊन सेवा करणे

त्यांनी एखादी सेवा घेतल्यावर त्यातील कुठल्याही भागाकडे उत्तरदायी साधकांना लक्ष घालावे लागत नाही. सेवेतील अडचणी पुढे सांगणे, पाठपुरावा करणे, तसेच सेवा परिपूर्ण करणे, असा त्यांचा भाग असतो. आश्रमातीलही लक्षात आलेली सूत्रे ते लगेच उत्तरदायी साधकांना सांगून स्वतः पाठपुरावा घेऊन ती पूर्ण करतात.

१ ओ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकून त्यासाठी प्रयत्न करणे

आबा आधी घरी राहिल्यामुळे त्यांना स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे लिखाण जमत नव्हते. तेव्हा त्यांनी कु. स्नेहाताई (कु. स्नेहा झरकर), पू. पिंगळेकाका आणि इतर संत यांना विचारून घेऊन चुकांवर लक्ष ठेवायला प्रारंभ केला. आश्रमातील शुद्धीकरण प्रक्रियेत त्यांनी स्नेहाताईला विचारून दोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न केले.

१ औ. चुकांसाठी प.पू. डॉक्टरांकडे क्षमायाचना करणे

आबांकडून झालेल्या चुकांसाठी ते लगेच ध्यानमंदिरात जाऊन प.पू. डॉक्टरांकडे नाक-तोंड घासून क्षमायाचना करतात. त्यांचे जरी स्वभावदोष लिखाण होत नसले, तरी त्यांना मनातून खंत वाटून चूक पुनश्‍च होऊ नये, यासाठी ते प्रयत्न करतात; म्हणून ते देवाला आवडतात, असे मला वाटले.

१ अं. आबांनी तळमळीने आणि भावपूर्ण केलेली
साप्ताहिक सनातन प्रभातची सेवा पाहून भावजागृती होणे

आबा करत असलेली साप्ताहिक सनातन प्रभातची सेवा पूर्ण झाल्यावर ती पाहून भावजागृती होते. त्यांची ती सेवा पूर्ण होईपर्यंत ते विश्रांती घेणे, जेवणासाठी लागणारा वेळ हे सर्व अल्प करतात. या सेवेत त्यांचे देहभान हरपलेले असते. त्यांचा पूर्ण आत्माच त्यात उतरलेला असतो. ती सेवा पूर्ण होऊन अंक पोस्टात जाईपर्यंत त्यांना चैन पडत नाही. त्यांच्या तळमळीमुळे ही सेवा आता अल्प कालावधीत पूर्ण होऊ लागली आहे. जरी सेवा लवकर होत असेल, तरी उर्वरित सेवा नंतर करूया, असा त्यांचा भाग नसतो. देव ही सेवा लवकर पूर्ण करवून घेतो, यामागे देवाचा काहीतरी उद्देश आहे, असे ते म्हणतात. खरेच त्यानंतर काहीतरी अडचणी येतात, तेव्हा लक्षात येते, देवानेच ही सेवा लवकर करवून घेतली. आपण सेवा करतांना किती अल्प पडतो, हे देवाने यातून शिकवले. साप्ताहिक सनातन प्रभातची सेवा त्यांनी इतरांना शिकवली. त्यामुळे प्रसारातील साधकांनाही सेवा मिळून त्यांचीही तळमळ वाढली.

१ क. साधकांना साधनेत साहाय्य करणारे आबा !

१ क १. साधकांना निराशेतून बाहेर काढणे

सर्व साधकांना निराशेतून बाहेर काढणे आणि त्यांना प.पू. गुरुदेवांशी जोडून ठेवणे, यासाठी ते प्रयत्नरत असतात. देव त्यांच्याकडून ही समष्टी सेवाच करवून घेत आहे. त्यामुळेच त्यांची जलद प्रगती होत आहे, असे मला जाणवले.

१ क २. साधकांना प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करण्याचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून तशी कृती करवून घेतल्यावर अडलेले काम लगेच पूर्ण होणे

एकदा आश्रमात बांधकाम काढले असतांना कामगार मिळत नसल्यामुळे काम पूर्ण होत नव्हते. तेव्हा त्यांनी उत्तरदायी साधकांना सांगितले, अरे, काम आरंभ करण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांना सांगितले का ? हे तुम्हीच निर्विघ्नपणे करवून घ्या. त्यांना प्रार्थना केली नाही, तर कसे अडथळे निवारण होणार. आधी ध्यानमंदिरात जाऊन नाक-तोंड घासून क्षमा मागा. त्यानंतर तसे केल्यावर लगेच कामगार मिळून काम पूर्ण झाले. तेव्हा आबांनी सांगितले, हे माझ्यामुळे झाले नाही. पुन्हा जाऊन त्यांच्या चरणीच कृतज्ञता व्यक्त करा. कोणत्याही सेवेसाठी, निवेदन, सभा यांसाठी त्यांची प्रार्थना आणि कृतज्ञता यांत कधीच खंड पडत नाही. त्यामुळे त्यांनी प्रार्थना केली की, तिचे फळ मिळतेच; पण ते त्याचे कर्तेपण कधीच घेत नाहीत.

१ ख. उपाय करण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर आसंदीत प.पू. डॉक्टर बसलेले सूक्ष्मातून दिसून तेच उपाय करत आहेत, असे जाणवणे

आबांना आधी उपाय कसे करायचे ?, ते समजत नव्हते; पण त्यांनी प्रार्थना केली, हे गुरुदेवा, उपाय कसे करायचे ?, ते मला समजत नाही. तुम्हीच या आणि हे माझ्या माध्यमातून करवून घ्या. त्यानंतर त्यांना पांढरा शुभ्र पायजमा आणि बंडी घालून समोर प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून आसंदीत बसलेले दिसतात आणि तेच उपाय करत आहेत, असे जाणवते.

१ ग. प.पू. डॉक्टर किंवा योगतज्ञ दादाजी उपाय करत असल्याचे दिसून त्रास उणावणे

त्यांनी कोणतीही प्रार्थना केल्यावर किंवा गुरुपौर्णिमा, सभा या वेळी प.पू. डॉक्टर समोर बसले आहेत आणि तेच सर्व करत आहेत, असे त्यांना दिसते. त्यांना रात्री त्रास होत असतांना प.पू. डॉक्टर आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन आले आहेत आणि तेच उपाय करत आहेत, असे दिसते. मग त्यांचा त्रास उणावतो.

 

२. आबांच्या प्रगतीविषयी संतांनी दिलेल्या पूर्वसूचना

२ अ. आबांशी दूरभाषवर बोलतांना आनंद मिळाल्याचे संतांनी सांगणे

आबांना संतांचे दूरभाष आल्यावर तुमच्याशी बोलून आनंद मिळाला, असे सर्व संत सांगायचे. त्याचे कारण मला आता उलगडले.

२ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आबांना स्वतः बोलावून घेऊन
त्यांना समवेत बसवून यज्ञ करणे आणि त्यात आहुती देण्यास सांगणे

योगतज्ञ दादाजी जानेवारी २०१५ मध्ये मिरज आश्रमात अनुष्ठानाला आले असतांना आबांना त्यांना भेटावेसे वाटले; परंतु आपण त्यांचा वेळ कसा घेणार ? आपली पात्रता नाही, असे आबांना वाटले; परंतु त्याच दिवशी सायंकाळी योगतज्ञ दादाजी यांनी त्यांना भेटायला बोलावले, तसेच त्यांना अनुष्ठानाच्या वेळी समवेत बसवून यज्ञ केला आणि त्यांना आहुती द्यायला सांगितली. तेव्हाही आबांना वाटत होते, आपली तर त्यांच्या चरणांजवळ बसण्याचीही पात्रता नाही, तरी देव आपल्याला ही संधी देत आहे. योगतज्ञ दादाजी यांनी आबांमधील भाव आणि त्यांची प्रगती ओळखून त्यांना ही संधी दिली, असे मला जाणवले.

 

३. पू. आबांमध्ये जाणवलेले पालट

३ अ. शारीरिक पालट

१. त्वचा : त्वचेला चकाकी आली आहे. त्वचा पुष्कळ मऊ आणि नितळ झाली आहे.

२. तोंडवळा : सुरकत्या न्यून होऊन ते तरुणांप्रमाणे सुंदर दिसतात. तोंडवळ्यावर गुलाबी छटा वाढली आहे.

३. डोळे : डोळे पाणीदार होऊन भाव जाणवतो.

४. केस : केस काळे होऊ लागले आहेत.

३ आ. मानसिक पालट

३ आ १. मायेतील आसक्ती न्यून होणे

या वेळी सुटीत मी आणि ऐश्‍वर्या रामनाथी आश्रमात अन् पुण्याला घरी जाणार होतो. तेव्हा आश्रमात अल्प साधक आहेत; म्हणून मी येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी एकटा राहिल्यावर इतरांना माझे करावे लागेल आणि इतरांना सांगावे लागेल, असे वाटून ते आश्रमात थांबण्यास सिद्ध नसत. या २ मासांत (महिन्यांत) ते एकटे थांबून त्यावर मात करू शकले. पूर्वी त्यांचा आमच्यामध्ये अडकण्याचा भाग होत होता; पण देवाने त्यांना यातूनही बाहेर काढले.

३ आ २. प.पू. डॉक्टरांना स्थुलातून भेटण्याची इच्छा न्यून होणे

पूर्वी त्यांना रामनाथी आश्रमात जायला मिळावे, प.पू. डॉक्टरांची भेट व्हावी, असे वाटायचे; परंतु या वेळी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, तिकडे साधकसंख्या अधिक आहे. माझ्यामुळे कुणाला अडचण व्हायला नको. इथे माझ्याकडील सेवा करायला कुणी नाही. मी येथेच रहातो. त्यांच्यातील हा पालट पाहून मला आश्‍चर्य वाटले.

३ आ ३. भावनाशीलता न्यून होणे

आबांचा नातू, मुलगी, जावई आणि मुलगा यांना साधारण दीड वर्षाच्या कालावधीत व्यष्टी साधनेसाठी घरी गेले होतेे. तेव्हा त्यांना आधी वाईट वाटायचे; परंतु नंतर त्यांनी सर्वांना सांगितले, तुम्ही कुठेही असलात, तरी प.पू. गुरुदेवांचे चरण घट्ट पकडून ठेवा. त्यांना शरण जा आणि जे काही आहे, ते त्यांना सांगा. ते तुमच्यासमवेतच आहेत. ज्या काही चुका झाल्या, त्यासाठी नाक-तोंड घासून प्रतिदिन क्षमा मागा. त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. देव दयाळू आहे. तो नक्की जवळ घेईल.

३ इ. कपडे

कपड्यांना सुगंध येतो.

३ ई. दैवी कण आणि ॐ

त्यांच्या तोंडवळ्यावर, कपड्यांवर आणि खोलीत दैवी कण मिळण्याचे प्रमाण अधिक असायचे. त्यांच्या पायांच्या शिरांमध्ये प.पू. डॉक्टरांप्रमाणे ॐ उमटले आहेत.

३ उ. खोलीतील पालट

खोलीतील लादीला चकाकी आली आहे आणि त्यावर प्रतिबिंब उमटते. त्रासाचे प्रमाण न्यून झाले आहे.

 

४. अनुभूती

४ अ. कपडे धुतांना चंदनाचा सुगंध येणे

Bhagyashri_Joshi
सौ. भाग्यश्री जोशी

पू. आबांचे कपडे धुतांना उटणे आणि चंदन यांसारखा सुगंध येतो. खरेतर ते अंगाला काहीच लावत नाहीत. प.पू. पांडे महाराज यांचे कपडे धुतांना तसाच सुगंध येतो. कपडे धुतांना संत, प.पू. पांडे महाराज, प.पू. डॉक्टर यांचे कपडे धूत आहे, असाच भाव रहातो. त्यामुळे कपडे धुतांना उपाय होतात आणि चक्कर येणे, थकवा येणे हे त्रास उणावतात. त्यांची सेवा करतांना संतसेवा करत आहे, असे वाटून सेवा भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होतात.

 

४ आ. उपाय होणे

पू. आबांसमवेत घरी गेल्यावर आईचे संत येणार हा भाव ठेवून प्रयत्न होतात. पूर्वी तिचे आध्यात्मिक त्रास वाढून आम्ही येऊ नये, असे तिला वाटायचे आणि आबांनी उपाय केल्यावर त्रास न्यून व्हायचे.

४ इ. आबांच्या साधनेमुळे सासूबाईंना गती मिळाल्याचे जाणवणे

सासूबाई गेल्यावर आबांच्या साधनेमुळे आणि प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे कोणताही त्रास झाला नाही आणि त्यांना आता गती मिळाल्याचे जाणवले.

 

५. प.पू. डॉक्टर आणि प.पू. पांडे महाराज
यांनी आबांकडून शिकण्यास सांगणे

आम्ही रामनाथीहून मिरज आश्रमात येत असतांना प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, तू आबांकडून शिक. प.पू. पांडे महाराज यांनीही त्यांच्याकडून आत्मीयता शिकायला सांगितली. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे देव मला अखंड शिकवत आहे. प.पू. डॉक्टर, मीच शिकायला अल्प पडते. पू. आबांच्या माध्यमातून देवाने संतांचे अस्तित्व सतत समवेत देऊन शिकण्याची आणि संतसेवेचा लाभ करवून घेण्याची संधी दिली आहे.

 

६. कृतज्ञता !

आध्यात्मिक त्रासामुळे मला थकवा येणे, चक्कर येणे, ताप येणे, हे त्रास सतत चालू असतात; पण त्यातही ते माझी पुष्कळ काळजी घेतात. माझ्यासाठी तर देवाने आध्यात्मिक गुरुच दिले आहेत. ते मला माझे सासरे कधीच वाटले नाहीत. त्यांनी मला मुलीपेक्षा अधिक प्रेम दिले. मलाही त्यांना मनातले सर्व सांगता येते. यजमान घरी गेल्यावर आपणही घरी जायला पाहिजे का ?, असे विचार माझ्या मनात यायचे किंवा सेवेत अधिक चुका व्हायला लागल्यावर वाटायचे, आपल्याला जमत नाही. आपण घरी जाऊया. त्या कालावधीत आबांनी मला पुष्कळ आधार दिला. त्यांनी सांगितले, चुका न होण्यासाठी प्रयत्न करायचे. चुकांना घाबरायचे नाही. देवाजवळ नाक-तोंड घासून क्षमा माग. आपण आश्रम सोडून बाहेर राहूच शकत नाही. त्याचे देवाण-घेवाण संपवून प.पू. डॉक्टर त्यालाही लवकर जवळ घेतील. माझी प.पू. डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा आहे. त्यानंतर माझ्या मनातील विचार न्यून व्हायचे. केवळ आबांचा आधार आणि प.पू. डॉक्टरांची कृपा यामुळेच देवाने यातून बाहेर काढले.

प.पू. डॉक्टर, आपणच आबांना संत करून आम्हा पामरांचा आणि संपूर्ण घराण्याचाच उद्धार केला आहे. पू. आबांचा लाभ कसा करून घ्यायचा ?, हे तुम्हीच आम्हाला शिकवा. पू. आबांचे गुण आमच्या अंगी येऊन आम्हाला सर्वांना जलद आपल्या चरणी घ्यावे, ही आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना.

– सौ. भाग्यश्री जोशी (पू. आबांची स्नुषा), सनातन आश्रम, मिरज. (९.८.२०१५)

 

पू. जयराम जोशी यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. लहानपणापासून प्रेमळ आणि देवभक्त असणे

लहानपणापासून आबांचा स्वभाव पुष्कळ प्रेमळ आहे. ते इतरांना साहाय्य करतात, असे त्यांच्या भावंडांकडून कळायचे. ते आम्हीही प्रत्यक्ष अनुभवले. ते मारुतीच्या आणि शंकराच्या देवळात गेल्याविना दुकानात जात नसत. हा त्यांचा नित्यक्रम कित्येक वर्षे चालू होता. आबा त्यांच्या भावंडांना सततच आधारस्तंभ वाटतात. आम्हा भावंडांना बरे नसल्यास ते पू. गजानन महाराज यांच्या छायाचित्राजवळ पाण्याचे भांडे ठेवून ते पाणी तीर्थ म्हणून देत असत. लहानपणापासूनच देवाची भक्ती आणि भाव त्यांच्यामध्ये पहावयास मिळाला.

२. खानावळ चालवणे हे व्रत म्हणून पत्करणे

आई-बाबा घरी घरगुती खानावळ (मेस) चालवत असत. जवळजवळ ४० वर्षे आई-बाबांनी हे व्रत म्हणून पत्करले आणि ईश्‍वराच्या कृपेने ते यशस्वी पार पाडले. अजूनही त्या खानावळीमधील मुले आबांना दूरभाष करून त्यांची विचारपूस करतात. आबांनी त्यांनाही मुलांसारखेच प्रेम दिले.

३. पत्नीची सेवा करतांना
प.पू. गुरुदेवांची सेवा करत असल्याचे भाव असणे

आईच्या आजारपणात त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रागा न करता आणि आम्हाला कळू न देता ही प.पू. गुरुदेवांचीच सेवा करत आहे, असा भाव ठेवून तिची सेवा केली. आई गेल्यानंतरही ते स्थिर होते. त्या कालावधीत त्यांच्या साधनेत कुठलाही खंड पडला नाही आणि त्यांनी आम्हालाही अस्थिर होऊ दिले नाही.

४. प्रोत्साहनाचा केंद्रबिंदू म्हणजे आबा !

आम्ही आबांना प्रोत्साहनाचा केंद्रबिंदू असे म्हणतो. आबा येऊन प्रोत्साहन देण्याची सेवा करतात. मला प्रत्येक प्रसंगातून धीर देऊन आबांनी बाहेर काढले आहे. आबांकडे पाहिल्यावर किंवा त्यांच्याशी बोलल्यावर पुष्कळ आधार वाटला आहे.

जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या पंक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे आबा ! असे संत वडील मला लाभले, त्यासाठी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता !

– श्री. योगेश जोशी (पू. आबांचे सुपुत्र), पुणे (९.८.२०१५)

 

अल्प कालावधीत जलद आध्यात्मिक प्रगती केल्याचे
आगळेवेगळे उदाहरण असलेले पू. जयराम जोशी (आबा) !

सासूबाईंच्या निधनानंतर आबा आमच्यासमवेत रामनाथीला जुलै २०१० मध्ये आले. त्यानंतर मार्च २०११ मध्ये त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली. त्या वेळी पू. गाडगीळकाकू म्हणाल्या, आबा आल्यावर त्यांची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के होती. केवळ ९ मासांत (महिन्यांत) त्यांनी ३ टक्के प्रगती केली. त्यानंतर ३ वर्षांत ४ टक्के प्रगती होऊन जुलै २०१४ मध्ये त्यांची ६५ टक्के पातळी झाली. जुलै २०१५ मध्ये १ वर्षात ६ टक्के प्रगती होऊन त्यांची पातळी ७१ टक्के झाली. यावरून जुलै २०१० ते २०१५ या ५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी ५८ ते ७१ टक्के अशी १३ टक्के प्रगती केली. त्यांच्यातील प्रेमाने आपलेसे करणे आणि तीव्र तळमळ या गुणांमुळेच त्यांनी इतकी जलद प्रगती केली. त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या शिकवणीचा आणि आश्रमाचा लाभ करून घेऊन अल्प कालावधीत प.पू. डॉक्टरांचे मन जिंकले. यातून आपण गुणांसाठी प्रयत्न केले आणि पू. संदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे प्रेमभाव आणि तळमळ वाढवली, तर प.पू. डॉक्टरांचे मन लवकर जिंकू शकतो, याची जाणीव होऊन त्यासाठी प्रेरणा मिळाली. सर्व आश्रमांत संत आहेत. मिरज आश्रमात एकही संत नाही, असे सर्वांना वाटायचे. आबा संत झाल्यामुळे मिरज आश्रमाला संत मिळाले.

      (भाव तेथे देव या उक्तीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)