बिंदूदाबनाचे उपाय करतांना बिंदूवर दाब देण्याची पद्धत

या लेखात बिंदूदाबनाचे उपाय करतांना बिंदूवर दाब देण्याच्या पद्धतींविषयी जाणून घेऊ.

१. बिंदूवर दाब देण्याची सर्वसामान्य पद्धत

सर्वसामान्यपणे बिंदूवर वरून सरळ शरिराच्या आतल्या बाजूला दाब द्यायचा असतो, तर काही विशिष्ट रोगांमध्ये बिंदूवर तिरक्या दिशेत दाब दिला जातो.

 

२. केंद्रत्यागी (केंद्रापासून दूर जाणारी) किंवा उपशामक (sedative) दाब

acupressure_1

केंद्रत्यागी पद्धतीने बिंदूवर दाब देतांना बिंदूच्या नेमके मध्यभागी खोल किंवा बळाने (जोराने) दाब देण्यास आरंभ करावा. हा दाब सतत चालू ठेवून बिंदूवर ठेवलेले बोट न उचलता बोटाने अधिकाधिक मोठी होत जाणारी वर्तुळे बनवावीत. एका सेकंदात एक ते दीड वर्तुळ होईल, या गतीने बोट अगदी सावकाशपणे फिरवावे.

अ. केंद्रत्यागी दाब केव्हा द्यावा ?

acupressure_2

  • शरिरातील चेतनाशक्तीचा अतिरेक झाल्यास
  • ग्रंथीमधून अतीस्राव होत असल्यास
  • अवयवांमध्ये त्रासदायक शक्ती साठून रहात असल्यास
  • अवयव उत्तेजित झालेले असल्यास
  • शरिराला किंवा एखाद्या अवयवाला सूज येत असल्यास
  • वेदना होत असल्यास

आ. केंद्रत्यागी दाब दिल्याने होणारे परिणाम

  • शरिरातील चेतनाशक्तीच्या अतिरेकाचे नियमन केले जाते.
  • ग्रंथींचे कार्य सुधारते. त्यामुळे ग्रंथींमधून होणाऱ्या स्रावाचे नियमन होते.
  • उत्तेजित अवयवांना शांत (स्थिर) केले जाते.
  • अवयवांची वेगवान (जलद) बनलेली कार्याची गती प्रमाणबद्ध केली जाते.
  • सूज घटते.

 

३. केंद्रगामी (केंद्राकडे जाणारी) किंवा उत्तेजक (stimulative) दाब

केंद्रगामी पद्धतीने दाब देतांना हलका दाब द्यावा. बिंदूच्या जवळच्या स्थानापासून दाब देण्यास आरंभ करावा आणि लहान होत जाणारी वर्तुळे बनवावीत. त्यानंतर एका सेकंदात दोन-तीन वर्तुळे बनतील, अशा शीघ्रगतीने मुख्य बिंदूवर यावे. या वर्तुळांची दिशा केंद्रत्यागी दाबाच्या विरुद्ध दिशेने असावी.

अ. केंद्रगामी दाब कधी द्यावा ?

acupressure_3

  • शरिरात चेतनाशक्तीची कमतरता असल्यास
  • अवयव किंवा ग्रंथी यांचे कार्य मंदावल्यास
  • अशक्तपणा आल्यास
  • अर्धांगवायूचा झटका आल्यास

आ. केंद्रगामी दाब दिल्याने होणारे परिणाम

  • शरिरातील चेतनाशक्तीचे प्रमाण संतुलित होते.
  • अवयव किंवा ग्रंथी यांचे कार्य वाढते.
  • थकवा किंवा अशक्तपणा घटून उत्साह वाटतो.

 

४. उपाय करतांना लक्षात घ्यावयाची काही व्यावहारिक सूत्रे

अ. अनेकदा रोग कशा प्रकारचा आहे, हे समजत नाही. त्या वेळी ‘केंद्रगामी कि केंद्रत्यागी दाब द्यावा’, अशी मनाची द्विधा अवस्था होते. अशा वेळी बिंदूवर वरच्या दिशेने सरळ शरिराच्या आतल्या बाजूस आणि स्थिर दाब दिल्याने अपेक्षित परिणाम मिळतो.

आ. बहुतांश व्याधींमध्ये बिंदूवर मध्यम प्रमाणात स्थिर आणि सतत दाब दिल्याने उपायांचा चांगला परिणाम मिळतोे.

इ. दुखणाऱ्या बिंदूंवर योग्य प्रकारे दाब दिल्याने तो रोग दूर होतो.

ई. रोग नाहीसा होताच बिंदूंमध्ये होणाऱ्या वेदना थांबतात.

उ. बिंदूदाबनाचे उपाय करून घेणाऱ्या व्यक्तीची त्वचा अत्यंत पातळ आणि संवेदनशील असेल, तर दाब देतांना त्वचेवर पावडर किंवा तेल लावावे.

 

५. रुग्णाशी मित्रत्वाचे नाते आणि प्रेमळ स्पर्श आवश्यक असणे

विज्ञानाच्या प्रगतीने मानव निसर्गापासून तर दूर गेलाच आहे; पण त्याचबरोबर त्याचे आपसातील मित्रत्वाचे नाते आणि प्रेमळ स्पर्श यांनाही तो पारखा होत चालला आहे. अशा वेळी उपाय करणारे तज्ञ स्पर्शाद्वारे रोगाच्या भौतिक स्थितीपेक्षाही त्याच्या संदर्भात पुष्कळ गोष्टी जाणून घेऊ शकतात आणि रोगनिवारणाची क्रियाही शीघ्रगतीने होऊ शकते. यामुळे स्पर्शाद्वारे रोगनिवारण करण्याच्या (touch communication or touch healing) आपल्या पूर्वापार परंपरेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देणेही शक्य होईल.

 

६. अयोग्य पद्धतीने बिंदूदाबन
केल्यास शारीरिक आणि मानसिक त्रास होणे

१. बिंदूदाबनाचे उपाय करतांना अयोग्य पद्धतीने बिंदू दाबले गेल्यास ते बिंदू ज्या रेखावृत्तावर आहेत, त्या रेखावृत्तांमधून वहाणार्‍या चेतनाशक्तीचा प्रवाह अल्प किंवा प्रमाणापेक्षा अधिक होतो. त्यामुळे त्याच्याशी संबंधित अवयवांना चेतनाशक्तीचा पुरवठा अल्प होतो किंवा प्रमाणापेक्षा जास्त होतो. या कारणाने रुग्णाचा आजार अल्प न होता तो बळावण्याची किंवा अन्य आजार होण्याची शक्यताच अधिक असते. तसेच अयोग्य पद्धतीने बिंदू दाबल्याने रुग्णाला शारीरिक स्तरावर त्रास होतो आणि मानसिक स्तरावरही त्रास होण्याची शक्यता असते.

२. ‘पायातील विविध बिंदू आवश्यकता नसतांना आणि अयोग्य पद्धतीने दाबले गेल्यामुळे या बिंदूंवर ताण येऊन व्यक्तीला विविध प्रकारचे शारीरिक त्रास आणि व्याधी होऊ शकतात. शारीरिक त्रासांमुळे आणि मनाशी संबंधित बिंदू  आवश्यकता नसतांना अयोग्य पद्धतीने दाबल्यामुळे मानसिक ताण निर्माण होऊन त्रास होऊ शकतो.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १३.११.२००७)

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’