या लेखात आपण शरिरावरील विशिष्ट बिंदू शोधून काढण्याचे महत्त्व याविषयी माहिती पाहू. नेहमीच्या किरकोळ तक्रारींसाठी महत्त्वाचे असे ९० ते १०० बिंदू आहेत. त्यातीलही २५ ते ३० बिंदू अत्यंत महत्त्वाचे आहेत.
१. निश्चित बिंदू शोधून काढण्यासाठी काही महत्त्वाची लक्षणे
बिंदूदाबन उपायपद्धतीत शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो. हे बिंदू शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करतात. शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या एखाद्या प्रवाहात (रेखावृत्तात) अडथळा निर्माण झाल्यास त्या मार्गावरील बिंदूवर योग्य प्रकारे दाब देऊन त्यांना उत्तेजित केले जाते. त्यामुळे चेतनाशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन प्रवाह सुरळीत होतो. पुढे दिलेल्या काही लक्षणांवरून निश्चित बिंदू शोधून काढणे शक्य असते.
- विशिष्ट बिंदू दुखणे (या लक्षणाला निश्चित बिंदू शोधून काढण्याची ‘गुरुकिल्ली’ म्हणता येईल.)
- आजूबाजूच्या भागापेक्षा बिंदू असलेल्या शरिराच्या भागाचा रंग पालटून तो साधारण पिवळट, पांढरट किंवा लाल होणे
- बिंदूच्या स्थानावरील त्वचेवर सूज येणे
- बिंदूच्या स्थानावरील त्वचा खरचटलेली दिसणे
- बिंदूच्या स्थानी लहानशी पुळी येणे
- बिंदूचे उष्णतामान शरिराच्या आजूबाजूच्या भागापेक्षा थोडे अधिक जाणवणे
आजकाल अनेक बिंदूदाबनतज्ञ बिंदू शोधून काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे विदयुत साधन वापरतात. त्यांच्या मते हे दाबबिंदू विदयुत साधनांच्या तुलनेत अल्प (कमी) प्रभावी असतात. अर्थात्, अल्प विदयुततरंगानेसुद्धा हे बिंदू उत्तेजित करता येतात; परंतु या बिंदूंच्या आजूबाजूच्या भागाची प्रतिक्रिया वेगळ्या प्रकारची असते.
२. योग्य बिंदू शोधून उपाय करण्याचे महत्त्व
बिंदूदाबनाचे उपाय करतांना योग्य बिंदू शोधून त्यांवर उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या शरिरातील व्याधीशी (आजाराशी) संबंधित नसलेल्या बिंदूंवर उपाय केल्याने त्याचा रोगावर काहीच परिणाम होत नाही, उदा. दात दुखत असल्यास त्या वेदना दूर करण्यासाठी विशिष्ट बिंदू आहेत. त्या बिंदूंवर उपाय न करता अन्य बिंदूंवर उपाय करून दात दुखण्याचे बंद होत नाही़ अनेक दिवस या पद्धतीने उपाय करून घेणाऱ्या अनुभवी रुग्णाला त्याच्या व्याधीसाठी योग्य तेच बिंदू दाबले जात आहेत कि नाहीत, याची कल्पना येते.