या लेखात आपण शरिरातील चेतनाशक्ती आणि चेतनाशक्तीचे प्रवाह म्हणजे रेखावृत्ते यांविषयी जाणून घेऊ.
१. चेतनाशक्ती
चेतना (प्राण) शक्ती (‘ची’) या शक्तीला प्राणशक्ती, जीवनशक्ती, चैतन्यशक्ती असेही म्हणतात. ब्रह्मांडातील चेतनाशक्ती मानवाच्या शरिरातही त्याच्या जन्मापासून विद्यमान असते. ही शक्ती आपल्या जीवनाचे नियमन करते. या शक्तीमुळेच मानवाच्या सर्व क्रिया आणि हालचाली होतात, उदा. श्वास घेणे, खाल्लेले अन्न पचवणे, विचार करणे इत्यादी. या शक्तीलाच आपण ‘प्राण’ किंवा ‘चेतना’ म्हणतो. चिनी भाषेत प्राणाला ‘ची’ म्हणतात. शरिरातील चेतनाशक्ती घटल्यास थकवा जाणवतो आणि अन्य त्रास चालू होतात. व्यक्तीच्या शरिरातच ही शक्ती प्राप्त करण्याची काही स्थाने आहेत. त्यांना ‘शक्तीकेंद्र’ म्हणतात.
२. चेतनाशक्ती मिळण्याच्या मार्गानुसार
तिचे प्रकार – ‘धन’ (यांग) शक्ती आणि ‘ऋण’ (यिन) शक्ती
ब्रह्मांडातील चेतनाशक्ती मानवाला कशी अन् कोठून प्राप्त होते, त्यानुसार तिचे दोन प्रकार आहेत.
‘धन’ (यांग) शक्ती
सूर्याकडून मानवाला प्राप्त होणारी चेतनाशक्ती ‘धन’ (यांग) शक्ती या नावाने ओळखली जाते. ही शक्ती हाताच्या बोटांच्या टोकांमधून तोंडवळ्याकडे (चेहऱ्याकडे) आणि तोंडवळ्याकडून पायांकडे वहाते.
‘ऋण’ (यिन) शक्ती
पृथ्वीकडून मानवाला प्राप्त होणारी चेतनाशक्ती ‘ऋण’ (यिन) शक्ती या नावाने ओळखली जाते. ही शक्ती पायांच्या तळव्यांच्या माध्यमातून शरिराच्या वरच्या भागाकडे आणि शरिराच्या वरच्या भागाकडून हाताच्या आतील भागातून हातांच्या तळव्यांकडे वहाते.
३. रेखावृत्ते (जिंग) – शरिरातील चेतनाशक्तीचे प्रवाह वहाण्याचे विशिष्ट मार्ग
शरिरातील चेतनाशक्तीचे प्रवाह विशिष्ट मार्गांतून संपूर्ण शरिरात वहात असतात. या मार्गांना ‘रेखावृत्ते’ (meridians) असे म्हणतात. चिनी भाषेत यांना ‘जिंग’ म्हणतात. एकूण १४ मुख्य रेखावृत्ते आहेत. त्यांपैकी १२ रेखावृत्ते शरिराच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही अंगांना (बाजूंना) सारख्याच रीतीने असतात, म्हणजेच चेतनाशक्तीचे दोन्ही प्रवाह संपूर्ण शरिरात सारख्याच रीतीने वहातात. बाकीच्या दोन रेखावृत्तांपैकी एक शरिराच्या पाठच्या भागातील उभ्या मध्यरेषेवर, तर दुसरे शरिराच्या पुढच्या भागातील उभ्या मध्यरेषेवर असते. या रेखावृत्तांचा शरिरातील मुख्य अवयवांशी आणि त्यांच्या कार्याशी संबंध असतो. ज्या रेखावृत्ताचा ज्या प्रमुख अवयवाशी संबंध असतो, ते रेखावृत्त त्या अवयवाच्या नावाने ओळखले जाते. कोणत्याही रेखावृत्ताचे एक टोक हात, पाय किंवा तोंडवळा (चेहरा) या ठिकाणी आणि दुसरे टोक एखाद्या मुख्य अवयवात असते.
अ. ‘धन’ (यांग) आणि ‘ऋण’ (यिन) रेखावृत्ते
चेतनाशक्ती मानवाला कोठून प्राप्त होते आणि तिचे प्रवाह कोणत्या दिशेने वहातात, यावरून त्यांचे ‘धन’ अन् ‘ऋण’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. चिनी भाषेत यांना अनुक्रमे ‘यांग’ आणि ‘यिन’ म्हणतात.
आ. नियंत्रक रेखावृत्ते
मुख्य १४ रेखावृत्तांपैकी ६ रेखावृत्तांमधून शरिरात चेतनाशक्तीचा धन प्रवाह वहातो, ६ रेखावृत्तांमधून चेतनाशक्तीचा ऋण प्रवाह वहातो आणि उरलेली दोन रेखावृत्ते इतर रेखावृत्तांवर नियंत्रण करतात. ‘नियंत्रण करणारे रेखावृत्त’ (गव्हर्निंग व्हेसल) आणि ‘ग्रहण करणारे रेखावृत्त’ (कन्सेप्शन व्हेसल) अशी या दोन नियंत्रक रेखावृत्तांची नावे आहेत. या रेखावृत्तांवरील बिंदूंवर दाब देऊन स्थानिक परिणाम साध्य करता येतो. (योगशास्त्रानुसार चेतनाशक्तीचे हे प्रवाह सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्नानाडी यांच्याशी संबंधित आहेत.) मुख्य रेखावृत्तांच्या अनेक उपशाखा सर्व शरीरभर पसरल्यामुळे शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या कार्याचे प्रभावक्षेत्र विस्तृत झाले आहे. (शरिरात ७२,००० नाड्या असतात.)
इ. रेखावृत्तांची दिशा आणि क्रम
रेखावृत्तांतून वहाणाऱ्या चेतनाशक्तीचा हा प्रवाह एका विशिष्ट मार्गाने आणि अखंडपणे वहातो. चेतनाशक्तीच्या प्रवाहाचे एक आवृत्तच असते. अखंड आणि गतीमान अशा चेतनाशक्तीच्या प्रवाहाला आरंभ अन् शेवट नसतो. रेखावृत्तांतून वहाणाऱ्या या चेतनाशक्तीच्या प्रवाहाची दिशा आणि शरिरातील तिचा क्रम पुढीलप्रमाणे असतो.
- शरिराच्या वरच्या भागातून हाताच्या आतील बाजूकडून हाताच्या बोटांच्या टोकांपर्यंत (ऋण)
- हाताच्या बोटांच्या टोकांकडून हाताच्या पाठीमागील भागातून तोंडवळ्यापर्यंत (धन)
- तोंडवळ्याकडून पायांच्या बाहेरील भागातून पायांच्या बोटांच्या टोकांपर्यंत (धन)
- पायांच्या बोटांच्या टोकांकडून पायांच्या आतील भागातून शरिराच्या वरच्या भागापर्यंत (ऋण)
- वरील चार टप्प्यांतून चेतनाशक्तीच्या प्रवाहाची ३ आवृत्ते पूर्ण होतात, यातच १२ रेखावृत्तांचा अंतर्भाव होतो.
र्इ. मुख्य १४ रेखावृत्ते
धन रेखावृत्ते (यांग मेरिडिअन्स)
- मोठ्या आतड्याचे रेखावृत्त (मोआ) (Large intestine meridian ) LI
- पोटाचे रेखावृत्त (पो) (Stomach meridian ) St
- लहान आतड्याचे रेखावृत्त (लआ) (Small Intestine meridian) SI
- मूत्राशयाचे रेखावृत्त (मूश) (Bladder meridian) B
- तिप्पट उष्णता निर्माण करणारे रेखावृत्त (Triple Warmer meridian) TW
- पित्ताशयाचे रेखावृत्त (पि) (Gall Bladder meridian) GB
ऋण रेखावृत्ते (यिन मेरिडिअन्स)
- फुफ्फुसाचे रेखावृत्त (फु) (Lung meridian) Lu
- प्लिहेचे रेखावृत्त (प्लि) (Spleen meridian) Sp
- मूत्रपिंडाचे रेखावृत्त (मूपिं) (Kidney meridian) K
- हृदयाचे रेखावृत्त (हृ) (Heart meridian ) H
- रक्ताभिसरण कार्यान्वित ठेवणारे (हृदयाचे आकुंचन करणारे) रेखावृत्त (रभि) (Pericardium or Heart Constrictor meridian ) P
- यकृताचे रेखावृत्त (य) (Liver meridian ) Liv
नियंत्रक रेखावृत्ते
- नियंत्रण करणारे रेखावृत्त (नि) (Governing Vessel meridian ) GV
- ग्रहण करणारे रेखावृत्त (ग्र) (Conception Vessel meridian) CV
४. चेतनाशक्तीचा प्रवाह शरिरातील अवयवांतून वहाण्याचे वेळापत्रक
दिवसभरातील सर्वच वेळी शरिरातील सर्व अवयवांमध्ये चेतनाशक्ती वहात नाही. चेतनाशक्तीने कोणत्या अवयवात कोणत्या वेळी वहायचे, याचे गणित ठरलेले आहे. त्यानुसारच प्रत्येक अवयवाला या चेतनाशक्तीचा पुरवठा होतो. त्यानंतरच्या १२ तासांत या शक्तीच्या प्रवाहाचा वेग घटत जातो. यासंदर्भातील ज्ञान प्राचीन ऋषीमुनींना होते. कालांतराने संशोधकांनी या विषयावर संशोधन केले, तेव्हा याची सत्यता त्यांच्या लक्षात आली.
शरिराचे अवयव / क्रिया / रेखावृत्त
यांतून चेतनाशक्ती सर्वांत जास्त प्रमाणात वहाण्याची वेळ
शरिराचे अवयव / क्रिया / रेखावृत्त | चेतनाशक्ती सर्वांत जास्त प्रमाणात वहाण्याची वेळ |
१. फुफ्फुस | पहाटे ३ ते ५ |
२. मोठे आतडे | पहाटे ५ ते सकाळी ७ |
३. पोट | सकाळी ७ ते ९ |
४. प्लिहा | सकाळी ९ ते ११ |
५. हृदय | सकाळी ११ ते दुपारी १ |
६. लहान आतडे | दुपारी १ ते ३ |
७. मूत्राशय | दुपारी ३ ते ५ |
८. मूत्रपिंड | दुपारी ५ ते सायंकाळी ७ |
९. हृदयाचे आकुंचन (टीप १) | सायंकाळी ७ ते रात्री ९ |
१०. तिप्पट उष्णता (टीप २) | रात्री ९ ते ११ |
११. पित्ताशय | रात्री ११ ते १ |
१२. यकृत | रात्री १ ते पहाटे ३ |
टीप १ – ‘हृदयाचे आकुंचन’ ही क्रिया आहे.
टीप २ – ‘तिप्पट उष्णता’ हे रेखावृत्त आहे.
५. शरिरातून वहाणाऱ्या धन
आणि ऋण प्रवाहांचे संतुलन अन् झोप यांचा संबंध
शरिरातील रेखावृत्तांच्या धन (यांग) प्रवाहांतून वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रमाणात वाढ झाल्यास निद्रानाशाचा विकार बळावण्याची शक्यता असते, तर शरिरातील रेखावृत्तांच्या ऋण (यिन) प्रवाहांतून वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रमाणात वाढ झाल्यास पुष्कळ झोप येते आणि गुंगी आल्यासारखे होते. धन आणि ऋण रेखावृत्तांतून वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे संतुलन झाल्यास ३ – ४ घंटे (तास) झोप झाल्यावरही उत्साही अन् प्रसन्न वाटते.
६. चेतना (प्राण) शक्ती घटल्यास किंवा थकवा आल्यास करावयाचे उपाय
- उजव्या हाताचे कोपर आणि मनगट यांच्या मधोमध १ इंच व्यासाच्या वर्तुळात असलेल्या बिंदूवर २ मिनिटे थांबून थांबून दाब द्यावा. असे केल्याने चैतन्यशक्ती मिळून थकवा घटतो आणि उत्साह वाढतो.
- हाताच्या करंगळीच्या दुसऱ्या पेरावर आणि पायाच्या करंगळीच्या मुळाशी २-३ मिनिटे दाब द्यावा.
- कंगवा हातात आडवा घेऊन त्याचे दात बोटांच्या बाजूला येतील आणि कंगव्याच्या दातांचा दाब बोटांवर येईल, अशा पद्धतीने मूठ बंद करावी.
- कंगव्याचे दात बोटांच्या विरुद्ध दिशेला येतील आणि कंगव्याच्या दातांचा दाब तळहातावर पडेल, अशा पद्धतीने कंगवा हातात धरून मूठ बंद करावी.
- सायटिक चेतारज्जूवर दाब द्यावा. त्यामुळे उत्साह वाढतो.