इंडिया नको; हिंदुस्थान म्हणा !

bharat

भारत, हिंदुस्थान आणि इंडिया…एकाच देशाची तीन नावे…! हिंदुस्थान आणि भारत म्हणजे आपल्या दैदीप्यमान, उज्ज्वल पूर्वजांकडून, मिळालेली देणगी आणि इंडिया हे इंग्रज जातांना चिटकवून गेलेले बिरूद. आज या धरणीवर असा एकही देश नसावा, ज्याला तीन वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते, अपवाद फक्त भारत. मनुष्याची असो किंवा देशाची, पहिली ओळख ही त्याच्या नावावरून होते. एक सर्वांगसुंदर, सर्वसंपन्न देश आहे. इथला सजीव-निर्जीव प्रत्येक कण अन् कण संपूर्ण जगाला शतकानुशतके प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक ठरला आहे; पण इंग्रजांनी त्याला इंडिया अशा स्वरूपात आज जगापुढे आणून ठेवले.

इंडिया या शब्दाला संयुक्तिक असला कुठलाच अर्थ नाही, काही जण इंडस या शब्दावरून इंडिया हे नाव इंग्रजांच्या काळात प्रचलित झाले, असे सांगतात. हे नाव म्हणजे इंग्रजांनी जगात जेथे-जेथे राज्य केले, त्या देशाला किंवा स्वत:च्या नकाशात विशिष्ट नावाने संबोधले, त्यात भारताला इंडिया, म्हणजे इंडिपेंडन्स डिक्लेअर्ड इन ऑगस्ट (Independence declared in August), म्हणजे ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिलेला असे संबोधले. इंग्रजांनी भारताला एका वसाहतीच्या स्वरूपात त्यांच्या नकाशात पहिले होते. त्यामुळे त्यांनी दिलेले इंडिया हे नाव अधःपतनाचे, गुलामगिरीचे द्योतक आहे. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी आम्ही अजूनही मी इंडियात रहातो, मी इंडियन आहे, असे म्हणण्यातच धन्यता मानतो, म्हणजे आम्ही अजूनही मानसिक गुलामगिरीतुन मुक्त नाही.

सिंधूच्या तिरावर वसलेली संस्कृती, ती हिंदु संस्कृती. अशा हिंदूंचे हे स्थान. म्हणजे हिंदुस्थान. भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे मग्न; म्हणजे तेजाच्या उपासनेत मग्न असलेला भारत, अशी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज युक्त आपली ओळख असतांना कुठलाही अर्थ किंवा संदर्भ नसलेली इंडियन किंवा इंडिया अशी कपाळकरंटी ओळख आम्ही का सांगावी ? शब्द, रस, स्पर्श, रूप, गंध हे नेहमी एकत्रित असतात. जेव्हा देशाला भारत किंवा हिंदुस्थान म्हणायचे, तेव्हाचा देश आठवून पहा. अभिमानाने उर भरून येईल आणि भारताचा इंडिया झाल्यावरचे अधःपतन पहा. फरक लगेच लक्षात येईल. त्यामुळे पूर्वीचे वैभव प्राप्त करायचे असेल, तर आपल्याला आपल्या देशाला प्रत्येक स्तरावर भारत किंवा हिंदुस्थान असेच संबोधायला हवे !

भारताचे खरे वैभव, खरी ओळख ही त्याची आध्यात्मिक स्तरावर आहे. तो विश्‍वाच्या गुरुपदी आहे; परंतु इंडिया असे उच्चारतांना आपण नेमके आपल्या याच मूलभूत प्रकृतीपासून दूर जातो. हिंदु संस्कृतीनुसार ८४ लक्ष योनीतून गेल्यावर मनुष्यजन्म मिळतो. कित्येक मनुष्यजन्मांतील पुण्यामुळे हिंदु धर्म आणि भारतभूमीत जन्म मिळतो. त्यामुळे न मागता मिळालेला, हा पुण्यभुमी असलेला चैतन्ययुक्त देश, तेथील माती आणि त्याचे चैतन्ययुक्त नाव याची आपल्याला किंमत राहिलेली नाही. लाखो वर्षांपासून संपूर्ण जगाला दीपस्तंभ ठरलेला भारत नेहमीच पाश्‍चात्त्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरलेला आहे. पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांनी गेल्या शतकात शोध लावले, ते सर्व शोध, किंबहुना त्यापेक्षा अधिक शोध आमच्या ऋषीमुनींनी सहस्रो-लाखोवर्षांपूर्वीच लावून ठेवलेले होते. त्यामुळेच भारताचे सर्वच क्षेत्रांतील वैभव हे नेहमी यावनी आक्रमणाला कारणीभूत ठरले. साधनसंपत्ती लुटून नेता नेता, त्यांनी आपली ओळखदेखिल लुटून नेली आणि आपल्याला त्याची जाणीवदेखील नाही. त्यामुळे पूर्वीचे सर्वांगसुंदर वैभव प्राप्त करायचे असेल, तर प्रत्येकाने आजपासून नव्हे आतापासून कटाक्षाने आणि जाणीवपूर्वक प्रत्येक क्षेत्रात देशाचा उल्लेख भारत किंवा हिंदुस्थान असाच करावयाला पाहिजे.

– सौ. श्रद्धा मुकुल जोशी, सांगवी, पुणे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात