अखंड शरणागत भावात रहाणार्या वरळी (मुंबई) येथील
श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) संतपदी विराजमान !
मुंबई – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अखंड शरणागत भाव असणार्या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून १४ फेब्रुवारी या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी श्रीमती आनंदी पाटीलआजी संतपदी आरूढ झाल्याचे घोषित केले.
अखंड शरणागत भावात रहाणार्या पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी संतपदी विराजमान ! प.पू. डॉक्टरांच्याप्रती अखंड शरणागत भाव असणार्या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून १४ फेब्रुवारी या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी श्रीमती आनंदी पाटीलआजी संतपदी आरूढ झाल्याचे घोषित केले. या वेळी सभागृहात आनंदाचे वातावरण होऊन सर्वांची भावजागृती झाली.
या वेळी पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी पू. पाटीलआजी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन पू. अनुराधा वाडेकर यांनी पू. (श्रीमती) पाटीलआजी यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या आनंद सोहळ्यामध्ये पू. (श्रीमती) पाटीलआजी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
या वेळी पू. पाटीलआजी यांनी रामनाथी आश्रमातील प.पू. डॉक्टरांच्या भेटीची आठवण सांगितली. या वेळी प.पू. डॉक्टरांच्या आठवणीने पू. आजींचे भावाश्रू वाहू लागले. या वेळी सभागृहातील सर्वांचा भाव जागृत झाला. या वेळी पू. पाटीलआजींचे पुत्र श्री. नारायण पाटील, स्नुषा सौ. नयना नारायण पाटील, मोठी नात सौ. राखी म्हात्रे, मधली नात सौ. दीपा म्हात्रे आणि जावई श्री. मच्छिंद्र म्हात्रे, छोटी नात सौ. कपिला घाणेकर आणि जावई श्री. महेश घाणेकर, नातू कु. अमोल नारायण पाटील, पणती कु. ऋतिका रवींद्र म्हात्रे, पणतू कु. शाहिल अन् कु. मंत्र मच्छिंद्र म्हात्रे, पणती कु. आराध्या महेश घाणेकर हे उपस्थित होते.
स्वतः आनंदी असणार्या
पू. आनंदी पाटीलआजी आता सर्वांना आनंदी आनंद देणार !
आतापर्यंत सनातनचे ५६ साधक संत झाले. पू. आनंदी पाटीलआजी या सनातनच्या ५७ व्या संत आहेत. त्या सनातनच्या ५७ व्या संत असल्या, तरी त्यांनी अनेक घटकांच्या संदर्भात उच्चांक गाठला आहे, उदा. त्या नावाप्रमाणे सतत आनंदी असतात. त्यांच्याइतके स्वतः आनंदात राहून इतरांना सतत आनंद देणार्या त्या एकमेव संत आहेत. उतारवयात साधना करणे कठीण असते. तेव्हा त्यांनी साधनेला आरंभ करून संतपद गाठले. हे त्यांचे दुसरे वैशिष्ट्य आहे. त्यांनी नातू, पणतू या पुढच्या पिढ्यांपर्यंत साधनेचे संस्कार केले आहेत. हे त्यांचे तिसरे वैशिष्ट्य आहे. अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्यात आहेत. आता सनातनचे सर्व साधक आजींचे मुलगे, सुना, मुली, जावई नातू, पणतू असे झाले आहेत. त्या सर्वांना त्यांनी जमेल तेवढे फिरून आनंद द्यावा आणि देवद आश्रमात, तसेच दादर सेवाकेंद्रात आणि ठाणे सेवाकेंद्रात काही दिवस राहून तेथील साधकांनाही आनंद द्यावा, अशी त्यांच्या चरणी विनंती !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे ।
याची प्रचीती देणार्या पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी !
वयाच्या ९५ व्या वर्षीही मुंबईच्या श्रीमती आनंदी पाटीलआजी यांनी संतपदी विराजमान होऊन सनातन कुटुंबावर एकप्रकारे आनंदाची उधळणच केली आहे. आजींचा आनंद सर्वांनाच अनुभवता यावा, यासाठी त्यांची रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत झालेली भावस्पर्शी भेट, पू. आजींच्या निवडक भावमुद्रा, कुटुंबियांसमवेत पू. आजी यांचा भावछायाचित्रात्मक वृत्तांत येथे देत आहोत.
गुरुदेवांनी (प.पू. डॉक्टरांनी)
सर्व इच्छा पूर्ण केल्या ! – पू. श्रीमती पाटीलआजी
मी प.पू. डॉक्टरांना भेटण्यासाठी उभी राहिले. मी कशातरी अडकले होते, त्यातून माझी सुटका झाली, असे मला त्यांचे दर्शन झाल्यानंतर वाटले. मला जास्त काही आठवत नाही. मी सगळे विसरले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, आता काही करू नका. केवळ नामजप करा आणि साधकांकडे लक्ष द्या. मला विमानातून रामनाथीला जाण्याची इच्छा होती. गुरुदेवांनी मला विमानातून प्रवास घडवला. त्यांनीच माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत !
नावाप्रमाणे स्वत: आनंद घेऊन
इतरांना आनंद देणार्या पू. आजी ! – पू. (कु.) अनुराधा वाडेकर
पू. आजी नावाप्रमाणे स्वत: आनंद घेऊन इतरांना आनंद देणार्या आहेत. वाईट शक्तींचा त्रास सहन करूनही पू. आजींनी आध्यात्मिक प्रगती केली. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा, नाती, नातवंडे आणि पणती यांच्यावर साधनेचे संस्कार केले. ५ फेब्रुवारी या दिवशी पू. आजींनी रामनाथी आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांचे अस्तित्व, स्पर्श, डोळे यांतून भाव प्रतीत होत होता. त्या संत झाल्याचे तेथील साधकांनी तेव्हाच ओळखले. प.पू. डॉक्टरांनी मुंबईसाठी हे संतरत्न दिले आहे, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
… असा झाला पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी यांचा भावसोहळा
पू. आजींना संत म्हणून घोषित केल्यावर सभागृहात आनंदाचे वातावरण होऊन सर्वांची भावजागृती झाली.
या वेळी पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी पू. पाटीलआजी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन पू. अनुराधा वाडेकर यांनी पू. (श्रीमती) पाटीलआजी यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या आनंद सोहळ्यामध्ये पू. (श्रीमती) पाटीलआजी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
या वेळी पू. पाटीलआजी यांनी रामनाथी आश्रमातील प.पू. डॉक्टरांच्या भेटीची आठवण सांगितली. या वेळी प.पू. डॉक्टरांच्या आठवणीने पू. आजींचे भावाश्रू वाहू लागले. या वेळी सभागृहातील सर्वांचा भाव जागृत झाला. या वेळी पू. पाटीलआजींचे पुत्र श्री. नारायण पाटील, स्नुषा सौ. नयना नारायण पाटील, मोठी नात सौ. राखी म्हात्रे, मधली नात सौ. दीपा म्हात्रे आणि जावई श्री. मच्छिंद्र म्हात्रे, छोटी नात सौ. कपिला घाणेकर आणि जावई श्री. महेश घाणेकर, नातू कु. अमोल नारायण पाटील, पणती कु. ऋतिका रवींद्र म्हात्रे, पणतू कु. साईल अन् कु. मंत्र मच्छिंद्र म्हात्रे, पणती कु. आराध्या महेश घाणेकर हे उपस्थित होते.
संपूर्ण कुटुंबावर प्रेमवर्षाव करून साधनेचा संस्कार करणार्या
पू. पाटीलआजींविषयी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
सौ. दीपा मच्छिंद्र म्हात्रे (पू. आजींची मधली नात)
पू. आजी आम्हाला आईसारखीच आहे. तिने आम्हाला व्यावहारिक ज्ञान दिले, तसेच आमच्यावर साधनेचे संस्कारही केले.
श्री. मच्छिंद्र म्हात्रे (पू. आजींचे नातजावई)
आई पुष्कळ प्रेमळ आहेत. मी कधी साधना करीन, असा विचारच करत नव्हतो; मात्र केवळ आजींच्या कृपेने मी साधना करू लागलो आहे. रामनाथी आश्रमात झालेली प.पू. डॉक्टर आणि पू. आई यांची भेट हा एक अविस्र्मरणीय क्षण होता. कृष्ण-सुदाम्याच्या भेटीप्रमाणे ही भेट मला जाणवली.
सौ. कपिला महेश घाणेकर (पू. आजींची छोटी नात)
आजीची ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर संतपदाला पोहोचेपर्यंत रात्रभर ती जागी असायची. तिला मोठमोठ्या वाईट शक्ती दिसायच्या. प्रारंभी ती घाबरायची. नंतर तिने श्रीकृष्णाला बोलावून वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी प्रार्थना केली. त्याप्रमाणे तिला त्रास देणार्या शक्तींचा नाश होत असल्याचे ती सांगायची. ज्या शाळेत आज तिचा संत झाल्यानिमित्त सन्मान होत आहे, त्या शाळेतूनच ती आम्हाला नेहमी घरी ने-आण करायची, हा योगायोग आहे. आम्हाला अशी आजी मिळाली, त्यासाठी आम्ही श्रीकृष्णाप्रती कृतज्ञ आहोत.
श्री. महेश घाणेकर (पू. आजींचे नातजावई)
मी प्रथम जेव्हा आजींना भेटलो, तेव्हा त्यांच्यातील तेज मला जाणवले. त्यानंतर आजींच्या कृपेने आम्हाला प.पू. डॉक्टरांचे दर्शन घडले. अनेकदा सायंकाळचा वेळ आम्हा कुटुंबियांना आजींच्या सहवासात घालवण्यात मिळतो, हे अनपेक्षितपणे घडते. आजी अतिशय प्रेमळ आहेत.
पू. पाटीलआजींचे खरे रूप जाणिले !
मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग.दि. माडगूळकर त्यांच्या गंध हा, श्वास हा या कवितेतून सांगतात,
गंध हा, श्वास हा, स्पर्श हा सांगतो ।
तूच तो, तूच तो, तूच तो ॥
कितीही लपविले खरे रूप तू ।
मी जाणिले कोण आहेस तू ॥
या काव्यपंक्तीप्रमाणे मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी या नावाप्रमाणे आनंदाची अनुभूती घेऊन तिच्यात सतत मग्न असतात. असे असले, तरी त्या ५ फेब्रुवारी २०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांच्या अस्तित्वाने, श्वासाने, स्पर्शाने आणि डोळ्यांतील भावामुळे आश्रमातील अनेकांनी त्या संत असल्याचे आधीच ओळखले. त्यानंतर १४ फेब्रुवारी या दिवशी पू. अनुराधा वाडेकर यांनी आजी सनातनच्या ५७ व्या संत आहेत, असे उद्घोषित केले.
१. अत्यंत कष्ट सोसून कुटुंबाचा भार वाहणे
आजींनी जीवनात पुष्कळ हालअपेष्टा सहन केल्या आणि कष्टही केले. आजींचे यजमान त्यांचा मुलगा ८ वर्षांचा असतांनाच गेले, तरीही आजींनी मुलांचे संगोपन फार चांगल्या पद्धतीने केले. आजींनी स्वतः कष्ट केले आणि मुलेे अन् त्यांची कुटुंबे यांचेही पालनपोषण वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत केले. आजींनी मिठाईच्या कारखान्यात कामाला जाऊन मुलांच्या कुटुंबासाठी आर्थिक साहाय्य केले.
२. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा
आजींना स्वच्छता फार आवडते. पायाला जरा जरी कचरा लागला, तरी त्या लगेच झाडू घेऊन घर स्वच्छ करतात. अंथरुणे आणि कपडे यांच्या घड्या घालतात. नामजपाला बसण्यापूर्वी तेथील लादी पुसतात. वैशिष्ट्य म्हणजे आजींनी घरात केर काढला की, घर एकदम लख्ख दिसते. ते बघून अतिशय प्रसन्न वाटते, तसेच कपडे आणि अंथरुणे यांच्या घड्यांकडे बघून वाटते की, जणू त्या घड्या आनंदाने हसत आहेत आणि म्हणत आहेत, आजींचे हात आम्हाला लागले. त्यामुळे आम्ही धन्य झालो.
३. शिकण्याची वृत्ती आणि तळमळ
आजींची सतत शिकण्याची वृत्ती असते. नामजप कसा करायचा ?, हे त्या सतत विचारून घेतात. वयानुसार त्या नामजपातील ॐ लावण्यास कधी कधी विसरतात; पण गुरुदेवांनी दिलेला नामजप योग्य कसा होईल ?, यासाठी त्या फार प्रयत्न करतात. देवाला प्रार्थना करतात, मला नाम विसरायला होत आहे. तुम्हीच योग्य तो नामजप माझ्या जिभेवर बसून माझ्याकडून करवून घ्या. नामजप योग्य प्रकारे करता आला की, मी तो देवामुळेच करू शकले, असे आजी म्हणतात.
४. उतारवयातही सेवा करण्याची तळमळ
आजींचे वय ९५ वर्षे असूनही कुठे जवळपास सेवा असेल, तर त्या तळमळीने जातात, उदा. धर्मरथ जवळपास असेल, तर आजी सकाळपासून दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत तेथे सेवा करतात. आजी आसंदीत एका जागी बसून पूर्ण सेवा होईपर्यंत नामजप करतात.
५. कष्टाळू वृत्ती आणि इतरांचा विचार करणे
आजी घरातील सर्व कामे नामजप करत न थकता करतात. आजींची सून आजींना शक्यतो कामे करू देत नाही. ती स्वतः कामावरून आली की, सर्व करण्याची सिद्धता दाखवते आणि करते; पण आजींना स्वस्थ बसायला आवडत नाही. त्यांना सतत सेवा हवी असते. माझी सून कामावरून थकून घरी येईल. त्यामुळे घरातील थोडी कामे मी केली, तर मला काहीच त्रास होणार नाही. उलट माझी सेवा होईल, या भावाने आजी घरातील लहान-मोठी कामे कधी कधी करतात.
६. प्रेमभाव
घरी कुणी आले, तर आजी त्यांना जेवण्यास सांगतात. प.पू. डॉक्टरांनी दिलेला खाऊ त्या घरी येणार्या प्रत्येकास आनंदाने देतात. घरी आलेल्या कुणी काही खाल्ले नाही, तर आजींना फार अस्वस्थ वाटते. थोडेतरी खाऊन जावे, असा हट्ट त्या करतात आणि तसे झाले की, आनंदी होतात.
७. आनंदी
आजी सतत आनंदी असतात. त्यांना बघून शांत वाटते.
८. आजी घरी येणार्या किंवा
सेवेत भेटणार्या साधकांमध्ये प.पू. गुरुदेवांनाच बघतात.
९. आजींच्या आशीर्वादामुळे आमची
साधना होत आहे, असा कुटुंबियांचा भाव असणे
आजींनी वर्ष १९९६ पासून साधनेला आरंभ केला. आजींमुळे सर्व कुटुंबीय साधना करत आहेत. आजींची मधली नात सौ. दीपा म्हात्रे हिला लग्नानंतर साधनेस घरातून विरोध होता. लग्नानंतर ५ वर्षे तिला सेवेला जायला मिळत नव्हते; परंतु आजींमधील चैतन्य आणि साधना यांमुळे आता त्यांच्या घरातील विरोध आता न्यून झाला आहे. तिचे यजमान श्री. मच्छिंद्र म्हात्रे हेसुद्धा प्रासंगिक सेवा करतात. हे सर्व आजींच्या आशीर्वादामुळे शक्य झाले, असे सौ. दीपा म्हात्रे यांना वाटते.
१०. सतत अनुसंधानात असणे
आजी सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात. दिवसभरातील लहानातील लहान कृतीही त्या देवाला सांगतात. पूर्वी आजी बरेच घंटे बसून नामजप करायच्या; पण आता त्या जास्तीतजास्त वेळ प.पू. गुरुदेव आणि कृष्ण यांच्याशी बोलतात.
११. आजींकडून काही चूक झाली की, त्या प.पू. गुरुदेवांच्या प्रतिमेकडे बघून त्यांना नम्रपणे सांगतात.
१२. आजी भजने म्हणतात, तेव्हा ती इतकी मधुर वाटतात की, आपणसुद्धा ती म्हणावीत, असे वाटते. आजींनी ३ – ४ लहान भजने स्वतः रचली आहेत.
१३. आजींकडे जमा झालेले पैसे त्या स्वतः न वापरता अर्पण करतात.
१४. भाव
१४ अ. दैनिक सनातन प्रभातप्रतीचा भाव
आणि त्यातील सूचना स्वतःला वाचता येत नसल्याने खंत वाटणे
सकाळी दैनिक सनातन प्रभात घरी येते, तेव्हा आजींना वाटते की, प्रत्यक्ष गुरुदेवच घरी आले आहेत. त्या दैनिक डोक्याला आणि छातीला लावून नमस्कार करतात. दैनिक वाचता येत नाही; म्हणून त्यांना त्याची खंत वाटते की, गुरूंनी आपल्यासाठी इतके मार्गदर्शन दिलेले असते; पण मी स्वतः वाचू शकत नाही. देवा, मी लहान असतांना का नाही शिकले ? शिकले असते, तर आता मी तुमच्या सर्व सूचना आणि माहिती वाचली असती, असे आजी म्हणतात.
१४ आ. आरोग्य आणि भाव
आजींना आता इतक्या वर्षांमध्ये कोणतीही शारीरिक व्याधी किंवा आजार झालेला नाही. त्या नेहमी म्हणतात, माझ्या गुरूंमुळे अजून मी नीट आहे. तेच माझी काळजी घेतात.
– सौ. दीपा म्हात्रे, डोंबिवली, ठाणे आणि सौ. कपिला महेश घाणेकर, शिवडी, मुंबई. (आजींच्या नाती)
(लिखाण पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी यांना संत घोषित होण्यापूर्वीचे असल्याने लिखाणात श्रीमती आजी असा उल्लेख करण्यात आला आहे. – संपादक)