आजच्या तुलनेत अत्यंत प्रगत असलेले भोज राजाचे अष्टांग स्थापत्यशास्त्र !

सहस्र वर्षांपूर्वीच्या कालखंडातही आजच्या तुलनेत अत्यंत प्रगत असलेले भोज राजाचे अष्टांग स्थापत्यशास्त्र !

 

१. आजच्या काळातील सर्व विषय
राजा भोजने ग्रंथांत ७ सहस्र श्‍लोकांत मांडणे

वास्तूशास्त्र आणि तंत्रज्ञान यांवर आधारलेला समरांगण सूत्रधार हा ग्रंथ, म्हणजे एक अद्भुत खजिना आहे. विमानशास्त्र, जलशास्त्र, यंत्रशास्त्र असे आजच्या काळातील सर्व विषय भोज राजाने त्यातील ७ सहस्र श्‍लोकांत मांडले आहेत. डोंगरावरचे पाणी खाली आणून त्या शक्तीवर पॉवर हाऊस उभारण्याचे तंत्र त्यात आहे.

 

२. शहर आराखड्यात विचार केलेले अनेक बारकावे

शहर आराखडा असा एक अध्याय आहे. त्यात अमुक-अमुक लोकसंख्या असलेल्या गावांना जोडणारा रस्ता किती रुंदीचा असावा, तेही नमूद केले आहे. राजपथ किती रुंद असावा, याविषयी राजा भोज लिहितात, इतका प्रशस्त की, चतुरंग दल एकमेकांना न घासता जाऊ शकेल.

 

३. धार्मिक स्थापत्यात यज्ञकुंड, होमकुंड यांविषयी माहिती

धार्मिक स्थापत्यात यज्ञकुंड, होमकुंड यांविषयी माहिती, तर सैनिकी स्थापत्यात रथशाळा कशी असावी, व्यूह कसा रचावा यासंबंधीचे ज्ञान आहे.

 

४. यांत्रिक प्रगतीचे अनेक आविष्कार

त्याहीपुढे जाऊन आजही दुर्बोध वाटणार्‍या यंत्रमानव या कल्पनेचे अनेक आविष्कार भोज राजाच्या लेखणीतून उतरले आहेत. उदा. हेर अथवा शत्रूचा सैनिक राजवाड्यात शिरत आहे, असे समजताच तिथे पहार्‍यावर उभ्या असलेल्या सैनिकाच्या हातातील तलवार तत्क्षणी खाली येऊन त्याचे शिर धडावेगळे करण्याची किमया, तसेच राजाचा पलंग प्रत्येक प्रहरी एक एक मजला वर जात, पहाटेच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जेव्हा महाराजांचे नेत्रकमल उघडतील, तेव्हा बरोबर पाचवा मजला आला असेल आणि समोरच उगवणार्‍या सूर्यनारायणाचे राजांना दर्शन होईल. या संकल्पनेपुढे आपले आजचे उद्वाहक (लिफ्ट) एक पिल्लू वाटते.

 

५. भोज राजाने सहस्र वर्षांपूर्वी बांधलेले
भोपाळताल धरण आणि रस्ते आजही वापरात असणे

भोज राजाच्या स्थापत्यकलेतील कौशल्याची एक झलक पहायची असेल, त्याने भोपाळला जाऊन भोपाळताल (धरण) अवश्य पहावे. सहस्र वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणामुळे आजुबाजूची लक्षावधी एकर भूमी, तर सुजलाम्-सुफलाम् झालीच आहे, तसेच मजबुती एवढी की, त्यावर बांधलेल्या रस्त्यावरून आजही अनेक अवजड वाहने ये-जा करत आहेत. यापुढे जाऊन त्यांनी सांगितले की, या धरणाला इतक्या वर्षांनंतर अलीकडेच पडलेली छोटीशी फट बुजवायला आपले आजचे तंत्रज्ञ सतत ८ दिवस झटत होते.

(कुठे सहस्र वर्षांपूर्वीही अत्यंत प्रगत स्थापत्यशास्त्राविषयी ग्रंथ लिहिणारा राजा भोज, तर वापरण्यापूर्वीच कोसळणार्‍या इमारती बांधून देशाचे कोट्यवधी रुपये उधळणारे आजचे राज्यकर्ते ! प्राचीन हिंदु संस्कृतीला मागास म्हणून हिणवणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांना ही चपराकच आहे ! – संपादक)

 

६. जगभर राजा भोजच्या स्थापत्यशास्त्राची प्रशंसा होणे

समरांगण सूत्रधार या अमूल्य ग्रंथातील राजा भोजच्या अष्टांग स्थापत्यशास्त्रावरील माहिती वाचून आपण थक्क होतो. पुण्याचे डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे यांचे वय ८२ वर्षे आहे. ते डेक्कन महाविद्यालयात पूर्वी संस्कृतकोशाचे संपादन करीत. आज जगभर राजा भोजच्या स्थापत्यशास्त्राची (आर्किटेक्चरची) प्रशंसा होत आहे. एक सहस्र वर्षांपूर्वीच्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर आपटे पती-पत्नी करीत आहेत.

– दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर, जून २०१४)