मृत्योत्तर विधीसंदर्भातील शंकानिरसन

१. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा देह घरात
ठेवतांना तिचे पाय दक्षिणेकडे का करतात ?

Pret_480

अ. मृतदेहातून उत्सर्जित होणार्‍या टाकाऊ
लहरींचा ओढा अधिक प्रमाणात दक्षिणेकडे असणे

‘दक्षिण ही यमदिशा आहे. व्यक्तीचे प्राणोत्क्रमण होतांना यमदिशेकडेच तिचे प्राण खेचले जात असतात. देहातून प्राण बाहेर पडला की, इतर टाकाऊ वायूंचे देहातून उत्सारण चालू होते. या उत्सारणातील लहरींचा वेग, तसेच त्यांचा ओढाही अधिक प्रमाणात दक्षिण दिशेकडेच अधिक असतो.

आ. देहातून टाकाऊ वायूंचे होणारे उत्सारण
अधिक चांगल्या प्रमाणात होण्यासाठी या कार्याला पूरक
दिशेकडे, म्हणजेच दक्षिण दिशेकडे मृत व्यक्तीचे पाय केले जाणे

व्यक्तीच्या कटीखालच्या (कमरेखालच्या) भागातून अधिक प्रमाणात वासनात्मक लहरींचे उत्सारण होत असते, ते अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी यमलहरींचे वास्तव्य असलेल्या दक्षिण दिशेकडेच त्या व्यक्तीचे पाय करून ठेवण्याचे शास्त्र आहे. असे केल्याने यमलहरींचे साहाय्य मिळून व्यक्तीच्या देहातून तिच्या पायाच्या दिशेने अधोगतीने अधिकाधिक टाकाऊ लहरी खेचल्या जाऊन या वायूंचे योग्य प्रकारे अधिकतम प्रमाणात ऊत्सारण झाल्याने देह चितेवर चढण्यापूर्वी अधिकतम प्रमाणात रिकामा होतो. ही दिशा अधिकाधिक स्तरावर देहातून बाह्य दिशेने विसर्जित होणार्‍या टाकाऊ वायूंच्या प्रक्षेपणास पूरक असते.

इ. यम (दक्षिण) दिशेकडे यमदेवतेचे वास्तव्य असल्याने
तिच्या सान्निध्यात देहातून उत्सर्जित होणार्‍या टाकाऊ वायूंच्या
वातावरणातील विलिनीकरणाची प्रक्रिया दोषरहित करण्याचे प्रयत्न केले जाणे

यम (दक्षिण) दिशेत यमदेवतेचे अस्तित्व असल्याने तिच्या सान्निध्यात देहातून प्रक्षेपित होणार्‍या टाकाऊ वायूंच्या उत्सर्जनातील विलिनीकरणात्मक प्रक्रिया अधिकाधिक प्रमाण दोषविरहित करण्याचे प्रयत्न केले जातात, नाहीतर टाकाऊ वायूंच्या उत्सर्जनास ती ती दिशा पूरक ठेवली नाही, तर घरात या लहरी अधिक काळ घनीभूत होण्याची शक्यता असते; म्हणून यमदिशेकडेच या टाकाऊ लहरींचे वहन होण्यासाठी मृत व्यक्तीचे पाय ती घरात असतांना दक्षिणेकडे करून ठेवण्याची पद्धत आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, भाद्रपद कृष्ण पंचमी, कलियुग वर्ष ५११२ २८.९.२०१०़, सायं. ५.५६)

 

२. मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये
गंगाजल घालून तुळशीपत्र का ठेवतात ?

‘प्राण जातांना बर्‍याच वेळा व्यक्तीचे तोंड उघडे राहून, त्यातून शरिरातील टाकाऊ लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होत असते. तोंडात गंगाजल घातल्याने आणि तुळशीपत्र ठेवल्याने, त्यांच्याकडे आकृष्ट होणार्‍या ब्रह्मांडातील सात्त्विक लहरींच्या साहाय्याने तोंडातून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या दूषित लहरींचे विघटन केले जाऊन वायूमंडल सातत्याने शुद्ध ठेवले जाते. तसेच गंगाजल आणि तुळशीपत्र यांमुळे मृतदेहाच्या आंतरकोषांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन, तोंडातून आत शिरकाव करणार्‍या वाईट शक्तींनाही अटकाव केला जातो.

 

३. मृतदेहाचे कान आणि नाक यांत
तुळशीच्या पानांचा एकत्रित तुरा का ठेवतात ?

मृतदेहाचे कान आणि नाक यांत कापसाचे बोळे ठेवण्यापेक्षा त्यांमध्ये तुळशीच्या पानांचा एकत्रित तुरा ठेवावा. तुळशीदलामुळे कान आणि नाक यांद्वारे सूक्ष्म टाकाऊ वायू वातावरणात पसरण्यापासून अटकाव केला जातो, तसेच वातावरणाची शुद्धीही केली जाते.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.६.२००५, दुपारी ३.२९)

 

४. व्यक्ती मृत झाल्यावर घरात
पणती का आणि कोणत्या दिशेने लावावी ?

‘व्यक्तीचे प्राण जात असतांना तिच्या देहातून उपप्राण तसेच इतर टाकाऊ सूक्ष्म वायू वातावरणात सोडले जाऊन व्यक्ती असते त्या ठिकाणी बद्ध होतात आणि त्यानंतर व्यक्तीचा देह निष्प्राण होतो. यामुळे व्यक्तीच्या वासनामयकोषाशी संबंधित या रज-तमात्मक लहरींचे गोलाकार वेगवान भ्रमण, व्यक्ती गेलेल्या ठिकाणी चालू झाल्याने या भ्रमणकक्षेत येणार्‍या इतर जिवांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हा त्रास होऊ नये यासाठी व्यक्ती ज्या ठिकाणी मृत होते, त्या ठिकाणी पणती लावावी. पणती लावतांना ती दक्षिण दिशेकडे, म्हणजेच यमदिशेकडे ज्योतीचे तोंड करून लावावी; कारण या दिशेला मृत्यूची देवता ‘यम’ हिचा वास असतो. पणती लावल्यावर यमदेवतेला प्रार्थना करावी, ‘तुझ्याकडून येणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरी या दिव्याच्या ज्योतीकडे आकृष्ट होऊन त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे वास्तूतील मृतदेहाशी संबंधित रज-तमात्मक लहरींच्या संचारावर निर्बंध येऊन त्यांचे विघटन होऊ दे.’

प्रार्थनेमुळे पणतीची ज्योत कार्यरत होऊन त्या ठिकाणी गोलाकार भ्रमण करणार्‍या रज-तमात्मक लहरींचे समूळ उच्चाटन करते. या कारणास्तव पहिले पाच दिवस ज्योतीची हालचाल अधिक होत असते. यातून ज्योतीची कार्यमान अवस्था कळते. त्यानंतर साधारणतः सातव्या दिवसानंतर ज्योत शांतपणे तेवत रहाते. ज्योतीचे शांतपणे तेवत रहाणे, हे रज-तमात्मक लहरींचे भ्रमण उणावून त्यांचे विघटन होत असल्याचे प्रतीक आहे.

 

५. पणती गव्हाच्या भिजवलेल्या पिठावर (कणकेवर) का लावतात ?

गव्हाच्या पिठाच्या गोलावर (कणकेवर) पणती लावून ठेवतात. कणकेमुळे ज्योतीकडे आकृष्ट झालेल्या तेजतत्त्वात्मक लहरी दीर्घकाळ धरून ठेवल्या जातात आणि हळूहळू त्यांचे दूरवर आवश्यकतेप्रमाणे प्रक्षेपण केले जाते. यामुळे तेजतत्त्वात्मक लहरींचे भूमीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य झाल्याने रज-तमात्मक लहरींचे विघटन होण्यात पाताळातील वाईट शक्तींचा येणारा अडथळा घटण्यास साहाय्य होऊन ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडते. रज-तमात्मक लहरींच्या समूळ उच्चाटनामुळे मृत व्यक्ती भूलोकात अडकण्याची शक्यता उणावते.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.६.२००५, सकाळी ११.०६)

 

६. पणतीत एकच वात का लावतात ?

व्यक्ती मृत झाल्यानंतर तिचे पंचमहाभौतिक शरीर अचेतन होते आणि केवळ आत्मज्योतच तेवत असते. याचे प्रतीक म्हणून पणतीत एकच वात लावतात.

 

७. मृत व्यक्तीला आंघोळ घालून नवीन कपडे का घातले जातात ?

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे उच्चारण मोठ्याने करत मृत व्यक्तीला आंघोळ घालावी. नामजपाच्या उच्चारणाने आंघोळ घालणार्‍या जिवाच्या हातातून संक्रमित होणार्‍या सात्त्विक लहरींनी पाणी भारित बनते, तसेच वातावरणही शुद्ध होते. अशा वातावरणात सात्त्विक लहरींनी युक्त पाण्याने मृतदेहाला आंघोळ घातली असता, त्याच्या देहावरील रज-तम कणांचे आवरण नष्ट होते, तसेच त्याच्या देहात राहिलेले सूक्ष्म टाकाऊ वायू बाहेर पडण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे मृतास आंघोळ घालणे, म्हणजे एकप्रकारे त्याची आंतर्-बाह्य शुद्धी करणे.

आंघोळ घालून झाल्यानंतर मृतदेहास नवीन कपडे घालावेत. हे कपडे धुपवून किंवा गोमूत्र वा विभूतीचे तीर्थ शिंपडून शुद्ध केलेले असावेत. यामुळे नवीन कपड्यांच्या माध्यमातून मृताच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.६.२००५, सायं. ७.१८)

 

८. मृतदेहाला स्मशानात नेतांना अंत्ययात्रेत सहभागी
असणार्‍यांनी मोठ्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप का करावा ?

Antayatra_Namjap_480

मृतदेह स्मशानात नेतांना दत्ताचा नामजप
केल्याने लिंगदेहाला आणि पूर्वजांना गती मिळणे

मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करावा. पूर्वजांना गती देणे, हे दत्ततत्त्वाचे कार्यच असल्याने दत्ताच्या नामजपाने अल्प कालावधीत लिंगदेहाला, तसेच वातावरणकक्षेत अडकलेल्या त्याच्या इतर पूर्वजांना गती मिळते.

मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी दत्ताचा
नामजप सामूहिकरित्या मोठ्याने करण्याचा परिणाम

व्यापक भाव निर्माण होण्यास साहाय्य होऊन वातावरणावर पटकन परिणाम होतो, शिवाय समष्टी साधनेचे फळ मिळण्यास साहाय्य होते आणि सर्वांना एकत्रितपणे आलेल्या दुःखद प्रसंगाला धैर्याने तोंड देता येते. याउलट स्वतःच्या साधनेनुसार मनात नामजप केल्याने अध्यात्माचा प्रसार न झाल्याने इतरांना समष्टी साधनेचे महत्त्व कळत नाही. मनात नामजप केल्याने संकुचितपणाची वृत्ती वाढीस लागून फक्त मी नाम घेतो, असा अहं जोपासला जातो; म्हणून कोणतेही कर्म करतांना सर्वांना साधनेचा दृष्टीकोन देऊन त्यांना प्रेमाने आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा.

– पू. (सौ.) अंजली गाडगीळ

 

९. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी अस्थी गोळा का करतात ?

dahanvidhi_480

‘मंत्रोच्चाराच्या साहाय्याने मृतदेहास दिलेल्या अग्नीची धग, म्हणजेच आकाश आणि तेज या तत्त्वांच्या संयुक्त लहरींचे अस्थींमध्ये चाललेले संक्रमण हे तीन दिवसांनंतर उणावू लागते. या कारणास्तव अस्थींच्या भोवती निर्माण झालेल्या संरक्षककवचाची क्षमताही उणावते. असे असतांना अस्थींवर विधी करून वाईट शक्ती त्या जिवाच्या लिंगदेहाला त्रास देऊ शकतात. तसेच वाईट शक्ती लिंगदेहाच्या माध्यमातून त्या जिवाच्या कुटुंबियांनाही त्रास देऊ शकतात. यासाठी तिसर्‍याच दिवशी स्मशानासारख्या रज-तमात्मक वातावरणातून अस्थी गोळा करतात.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.६.२००५)

 

१०. पिंडदान करण्याचे कर्म नदीकाठी किंवा घाटावर का केले जाते ?

‘मृत्यूनंतर स्थूलदेह त्यागला गेल्यामुळे लिंगदेहाभोवती असलेल्या कोषातील पृथ्वीतत्त्वाचे, म्हणजेच जडत्वाचे प्रमाण उणावते आणि आपतत्त्वाचे प्रमाण वाढते. लिंगदेहाभोवती असलेल्या कोषामध्ये सूक्ष्म आर्द्रतेचे प्रमाण सर्वांत जास्त असते. पिंडदान कर्म हे लिंगदेहाशी संबंधित असल्याने लिंगदेहाला पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येतांना सोपे जावे, यासाठी बहुतांशी असे विधी नदीकाठी किंवा घाटावर केले जातात. नदीच्या काठावरच्या किंवा घाटावरच्या वातावरणात आपतत्त्वाच्या कणांचे प्राबल्य असल्याने, तेथील वातावरण आर्द्रतादर्शक असते. असे वातावरण इतर जडत्वदर्शक वातावरणापेक्षा लिंगदेहांना जवळचे अन् परिचयाचे वाटते. अशा आर्द्रतादर्शक वातावरणाकडे लिंगदेह लगेच आकर्षिले जातात; म्हणून पिंडदानासारखे विधी प्रामुख्याने नदीकाठी किंवा घाटावर केले जातात.

 

११. दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?

Kakbali_1_Kavala_corr

‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो ‘पिंडदान’ या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो. कावळ्याभोवती असलेल्या सूक्ष्मकोषातही लिंगदेहाभोवती असलेल्या कोषासारखेच आपकणांचे प्राबल्य जास्त असल्याने लिंगदेहाला कावळ्याच्या देहात प्रवेश करणे अतिशय सोपे जाते. वासनांत अडकलेले लिंगदेह हे भूलोक, मर्त्यलोक (हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.), भुवलोक आणि स्वर्गलोक यांमध्ये अडकलेले असतात. असे लिंगदेह पृथ्वीच्या वातावरणकक्षेत प्रवेश केल्यानंतर कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करतात. मधला पिंड हा मुख्य लिंगदेहाशी संबंधित असल्याने या पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे समजले जाते. प्रत्यक्ष पिंडातील अन्न कावळ्याच्या माध्यमातून भक्षण करून स्थूल स्तरावर, तसेच अन्नातून प्रक्षेपित होणारे सूक्ष्म वायू ग्रहण करून सूक्ष्म स्तरावर, अशा दोन्ही माध्यमांतून लिंगदेहाची तृप्ती होते आणि पृथ्वीची कक्षा भेदून पुढे जाण्यासाठी त्याला या अन्नातून स्थूल अन् सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर ऊर्जा मिळते. स्थूल ऊर्जा ही लिंगदेहाच्या बाहेरील वासनात्मक कोषाचे पोषण करते, तर सूक्ष्म वायूरूपी ऊर्जा ही लिंगदेहाला पुढे जाण्यासाठी आंतरिक बळ प्राप्त करून देते.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००५, दुपारी १२.४१)

 

१२. तेराव्या दिवशी सर्वांना बोलावून गोड जेवण का घालतात ?

‘१३ व्या दिवशी करायच्या विधीमुळे लिंगदेह पृथ्वीची वातावरणकक्षा भेदून पुढच्या गतीला प्राप्त होतो. लिंगदेहाला गती प्राप्त होणे, म्हणजेच त्याचे त्याच्या कुटुंबियांशी असलेले सर्व नातेबंध तुटून, ईश्वराशी नाते जुळणे. ‘प्रत्यक्ष स्थूलदेहाशी संबंधित आसक्ती सुटून ईश्वराची ओढ निर्माण होणे’, या आनंदस्वरूप प्रक्रियेचे स्वागत करण्याचे प्रतीक म्हणून या दिवशी सर्वांना बोलावून गोड जेवण घालतात.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००५, दुपारी २.०५)

 

१३. देहावसान झालेल्या व्यक्तीला
पुन्हा जन्म मिळण्यासाठी प्रार्थना करावी का ?

देहावसान झालेल्या व्यक्तीला
पुन्हा जन्म मिळण्यासाठी प्रार्थना करणे टाळा !

प्रारब्धभोग भोगून मोक्षप्राप्ती करणे, म्हणजेच ज्या ईश्‍वराचे आपण अंश आहोत, त्या ईश्‍वराशी एकरूप होणे, हा मानवी जन्माचा प्रमुख उद्देश आणि हेच मानवाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे; मात्र एखादी व्यक्तीचे निधन झाल्यास बर्‍याचदा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य सदस्य अथवा हितचिंतक त्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळावा, यासाठी प्रार्थना करतात. एखाद्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळावा, यासाठी प्रार्थना करणे म्हणजे त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकवल्यासारखे होते; म्हणून अशी प्रार्थना करणे अयोग्य होय. या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन मोक्षप्राप्तीसाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्तीची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करणे अधिक योग्य ठरते. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करण्याने आपण त्यांचे खर्‍या अर्थाने हितचिंतक ठरू !

 

१४. त्रिपाद आणि पंचक म्हणजे काय ?

२७ नक्षत्रांपैकी काही नक्षत्रे पंचक आणि काही त्रिपाद म्हणून गणले जातात.
पंचक अथवा त्रिपाद हा नक्षत्राचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे एखादी घटना पंचक या कालावधीत घडली तर त्याची ५ वेळा पुनरावृत्ती होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी सुतक संपल्यानंतर पंचक शांती करण्यास सांगतात.
तसेच त्रिपाद या कालावधीत घडलेल्या घटनेची तीन वेळा पुनरावृत्ती होऊ शकते. हे टाळण्यासाठी त्रिपाद शांती करण्यास सांगितली जाते.
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’

 

हिंदु धर्मात लहान बालकांचे श्राद्धकर्म न करण्याची कारणे

१. लहान बालकाला आसक्ती आणि या जन्मातील देवाणघेवाण नसल्याने
असा जीव भुवलोकात न अडकणे, त्यामुळे हिंदु धर्मात लहान बालकांचे श्राद्धकर्म न केले जाणे

साधिका : ‘हिंदु धर्मामध्ये लहान बालकांचे श्राद्धकर्म का केले जात नाही ?

उत्तर : तीन पिढ्यांपर्यंतच श्राद्धकर्म केले जाते. श्राद्ध केल्याने पितृऋण फिटते. लहान बालके म्हणजे ज्यांना दात आले नाहीत, तसेच ज्यांची हाडे बनण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे श्राद्ध केले जात नाही. अशा बालकाचा देवाणघेवाण हिशोब पूर्ण झाल्यावर तो ईह लोकातून निघून जातो. एवढ्या अल्प काळासाठी आलेल्या जिवाला स्वदेहाची आसक्तीच नसते. आसक्ती आणि देवाणघेवाण न राहिल्याने असा जीव भुवलोकात अडकत नाही अन् त्याला पुढची गती प्राप्त होते. यामुळे अशा लहान बालकांचे श्राद्ध केले जात नाही.’

२. लहान मुलांचा (वयाच्या १० वर्षापर्यंतच्या बालकांचा) मृत्यू झाल्यास धर्मशास्त्राने केलेली व्यवस्था !

‘लहान मुलांच्या मृत्यूनंतर त्यांचे श्राद्धकर्म करतांना पिंडदानानंतर केवळ त्यांना अन्नाचा घास मंत्रपूर्वक दिला जातो. याला ‘प्रकीर’ असे म्हणतात. लहान जिवावर या जन्मातील कोणतेही संस्कार झालेले नसल्याने ईश्‍वराने त्या जिवासाठी ही व्यवस्था केली आहे.’

– श्री. दामोदर वझेगुरुजी (सनातनचे पुरोहित), सनातन आश्रम, गोवा. (३१.७.२०१८)