१. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे उमाजी
भारतीय समाजात रामोशांसारख्या जमातीत जन्मलेल्या एका माणसाने आम्ही चोर नाही, बंडखोर आहोत, असा खणखणीत निरोप इंग्रजांना पाठवावा आणि एका देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पहावे अन् त्यासाठी आमरण झटावे, ही या देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातसुद्धा एक हुरहूर लावणारी घटना घडून गेली, असे जाणवल्याशिवाय रहात नाही.
२. दरोडे घालून देवळे, गोरगरीब आणि ब्राह्मण यांमध्ये
सर्व पैसे वाटून टाकणारा लोकप्रिय दरोडेखोर उमाजी नाईक !
पैशाच्या संबंधातले उमाजीचे वागणे म्हणजे एक विलक्षणच प्रकार होता. उमाजी पैशासाठीच दरोडे घालायचा. त्याला खूप पैसा मिळायचाही. तेव्हा त्याने खूप मोठा द्रव्यसंचय केला असणार, असे धरून मॅकिंटॉशने त्याला त्याबद्दल खोदून विचारले असता उमाजीने आपणाकडे काही शिल्लक नसल्याचे सांगितले. त्याच्या बायकोनेही तशीच साक्ष दिली. त्याचे कारण असे की, मिळालेला पैसा उमाजी लगेच साथीदारांमध्ये वाटून टाकायचा. स्वतःच्या वाट्याचे पैसेही तो साठवून ठेवायचा नाही. देवळांची देखभाल, तसेच गोसावी, बैरागी, ब्राह्मण वगैरेंना तो नेहमी देणग्या देत असायचा. कोणीही गोरगरीब त्याच्याकडे काही मागायला आला, तर विन्मुख कधीच परत जायचा नाही. प्रसंगी तो स्वतःच्या अंगावरचे कपडेही काढून द्यायचा. एवढेच नव्हे, तर बायकोलाही कधीकधी, तसेच करायला लावायचा.
माणूस म्हणून उमाजी हा असा होता. तेव्हा एका बाजूने त्याच्याविषयी कमालीचे भय वाटत असतांनाही दुसर्या बाजूने अनेकांना तो का आवडत असेल, हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.
– सुधाताई धामणकर (सदाचार आणि संस्कृती मासिक,ऑगस्ट २००८)