निरपेक्ष वृत्ती अन् संयम असलेले आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाणारे रामनगर (बेळगाव) येथील पू. शंकर गुंजेकर !

१. प्रेमभाव

सनातन संस्थेत आल्यापासून मामांनी प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन केले. प्रारंभी रामनगरमध्ये मामांच्या घरी साधक येऊन त्यांनी मामांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या घरी सत्संग चालू झाला. तेव्हापासून त्यांचे घर हे सेवाकेंद्रासारखे झाले आहे. मामांच्या प्रेमभावामुळे कधीही कोणीही त्यांच्या घरी ऐनवेळी हक्काने येऊन रहायचे.

२. कधीच कोणावर न रागावणे

घरात कोणी त्यांचे ऐकले नाही, तरी पू. मामा रागवत नाहीत. तिथेही साधना म्हणून स्वीकारतात. भले त्यांची चूक नाही तरीही आणि कोणी त्यांना १० वेळा त्यांची चूक म्हणून सांगितले, तरी ते न रागावता, प्रत्युत्तर न देता, न चिडता आनंदाने चूक स्वीकारतात. त्यासंदर्भात ते सांगतात, समोरच्याने जरी तुम्ही चुकता, असे मला सांगितले, तरी कोण चुकतो आणि कोण नाही, हे देवाला कळत नाही का ?

३. निरपेक्ष वृत्ती, संयम आणि देवावरील श्रद्धा

P.-Shri-Shankar-Gunjekar---1
पू. शंकर गुंजेकर

पू. मामांची घरची परिस्थिती बेताची आहे. कष्ट करून सगळे मिळवावे लागते. पू. मामांनी त्यांच्यातील सकारात्मकतेमुळे व्यवहारातील पुष्कळ कठीण प्रसंग शांतपणे हाताळले आहेत. व्यवहारातही त्यांनी कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. ते देव देतो त्यातच समाधान मानून व्यवहार सांभाळत साधना करत आले. एखादी सेवा असेल आणि साधक सेवेला अल्प असतील, तर ते कधी कोणाची अपेक्षा न करता स्वतःच सेवा करतात. कधीच मला येत नाही किंवा जमत नाही असे नसते. आतापर्यंत देवाने केले, पुढेही तोच करणार आहे, असा त्यांचा भाव असतो. संयम आणि भगवंतावर श्रद्धा कशी असायला हवी, हे त्यांच्याकडून शिकता आले.

४. साधकत्व

     पू. मामा लहान भाऊ आणि बहीण यांच्याशी नम्रपणे, आदराने अन् साधक या नात्यानेच वागतात. त्यांच्या बहिणीही साधनेच्या स्तरावर काही अडचणी असतील, तर पू. मामांशी बोलून घेतात. पू. मामा त्यांना व्यावहारिक दृष्टीने साहाय्य न करता आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात अन् त्यांच्या अडचणीही सोडवतात.

५. सतत अनुसंधान

      पू. मामा म्हणजे अनुसंधानाचा एक झराच आहे, असे वाटले. पू. मामांकडे कधीही पाहिल्यास ते सतत अनुसंधानात असल्यासारखे जाणवते. त्यांच्या मनातील विचार व्यावहारिक असो वा आध्यात्मिक ते प्रत्येक कृतीला भावाची जोड देतात. त्यांना कधीही अनुसंधानात रहा किंवा प्रयत्न वाढवा, असे सांगावे लागत नाही. ते सहसाधकाला अजून कोणते प्रयत्न वाढवायला पाहिजेत ?, असे विचारून सांगितलेले प्रयत्न करत असतात.

६. कृतज्ञताभाव आणि भोळा भाव

trupti_gavade
कु. तृप्ती गावडे

पू. मामांचा भोळा भाव असल्यामुळे ते अखंड देवाचे साहाय्य घेऊन सेवा करतात. ते कधी बुद्धीने विचारच करत नाहीत. देवाने विचार दिला किंवा साधकांनी सांगितले, तरी किंतु, परंतु असे शब्दच त्यांच्या मनात येत नाहीत. त्यामुळे देवही त्यांना प्रत्येक गोष्टीत साहाय्य करतो. पू. मामांना खाण्याविषयी आवड-नावड नसल्यामुळे त्यांना जे मिळेल, ते आनंदाने स्वीकारतात. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता वाटते. मनात कृतज्ञताभाव ठेवूनच ते सेवा करतात. भोळा भाव असेल, तर साधनेला कधीच आणि कुठेच आपल्या मनाला मर्यादा नसते, तसेच ती सेवा कशी करायला पाहिजे, हे देवाने पू. मामांच्या कृतींतून शिकवले.

७. पुढची प्रगती होण्यासाठी
देवाने कर्मकांडातून अलगद बाहेर काढणे

     त्यांची पुढची प्रगती होण्यासाठी देवाने त्यांना कर्मकांडातून अलगद बाहेर काढले. पू. मामांचे वडील वारल्यापासून पूजाघरातील सर्वच दायित्व त्यांच्याकडे आले. त्यांना सकाळ-संध्याकाळ पूजा करायला फार वेळ लागायचा. त्याची त्यांना आवडही होती. त्यातच त्यांचा दिवस जायचा आणि ते काही वेळा बाहेर पडू शकायचे नाहीत. काही कारणामुळे त्यांच्या मोठ्या भावाकडे पूजेची सेवा द्यावी लागली, तर पू. मामांना त्याचे पुष्कळ वाईट वाटायचे. त्यांना खंत वाटत होती की, आपण देवाची सेवा करायला कुठे न्यून पडलो ? माझ्या हातून सेवा करवून घ्यायला देवाला का आवडले नाही ? ते थोडे निराश झाल्यावर काही जणांनी त्यांना समजावले आणि नंतर त्यांनी ते स्वीकारले. त्यांचे मन सकारात्मक झाले आणि त्यामुळे त्यांना सेवेला, साधना करायला अधिक वेळ मिळायला लागला. त्या प्रसंगावरून देव त्यांना पुढे पुढे घेऊन चालला आहे. पुढच्या साधनेला प्रारंभ झाला आहे, हे काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले.

८. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे

     घरच्या आर्थिक अडचणी, तसेच इतर काही अडचण आली, तरी ते स्पष्टीकरण न देता सगळी परिस्थिती आनंदाने स्वीकारतात. त्यासाठी घरात इतरांना दोष देत नाहीत किंवा त्या स्थितीत इतरांवर चिडण्याचा किंवा रागावण्याचा त्यांचा भाग नसतो. त्यांची इतरांना समजून घेण्याची वृत्ती, तसेच सकारात्मकता असल्यामुळे घराचे घरपण, नातेवाईक टिकून आहेत. देव आहे ना ? तो काळजी घेणार, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. अचानक सेवा आल्यावरही ते लगेच स्वीकारतात, कधी नाही म्हणत नाहीत. तसेच ती सेवा प.पू. डॉक्टरांंनी दिली आहे, असा त्यांचा भाव असतो. तिथे ते कधीच सवलत घेत नाहीत.

९. अंतर्मुखता आणि भगवंताच्या
भक्तीची गोडी लावणारा पू. मामांचा सहवास !

     पू. मामांकडे पाहिल्यावर ते सतत अंतर्मुख असतात, असे जाणवते. त्यात त्यांची सहजावस्था असते. त्यांच्या सहवासात राहिल्याने आपोआप भगवंताच्या भक्तीची गोडी लागते. पू. मामांच्या बोलण्यात भावातील गोडवा असल्यामुळे त्यांच्याशी आपोआप जवळीक होते. ते व्यवहाराच्या दृष्टीने न बोलता आध्यात्मिक स्तरावर बोलतात, उदा. सेवेतून देव कसा साहाय्य करतो किंवा देव आपल्यासाठी किती करतो इत्यादी.

१०. प्रेमळ आणि निर्मळ मन

      लहानपणापासून मला पू. मामांसमवेत रहायला आवडायचे. त्यामुळे मी पू. मामांच्या सहवासात अधिक असायची. ते मला समजून घ्यायचे. त्यामुळे पू. शंकरमामांविषयी मला अधिक जवळीक वाटायची; म्हणून मी मामांच्या घरी रहायला जायचे. पू. मामा सतत देवाविषयी बोलायचे. ते प्रेमळ आणि निर्मळ मनाचे असल्यामुळे पू. मामांचा सहवास हवाहवासा वाटायचा. त्यांच्या सहवासात अखंड सत्संग मिळतो.

११. भावपूर्ण कृती आणि कर्तेपण देवाला अर्पण करणे

     मामांच्या संपर्कात राहिले नाही, तरी त्यांच्या कृतीतूनच शिकायला मिळते. त्यांची प्रत्येक कृती भावपूर्ण असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृतीकडे पाहून आनंद मिळतो. पू. मामा करत असलेल्या कृतींमुळे त्यांचा अहं कधीच वाढत नाही आणि ते व्यवहारात किंवा साधनेत कधीच कोणाशी तुलना करत नाहीत. त्यांनी केलेल्या चांगल्या कृतींचे कौतुक केल्यावर ते देवानेच करून घेतले; म्हणून झाले, असे सांगतात. तसेच ती कृती देवाने त्यांच्याकडून कशी करून घेतली, असा त्यांचा शिकण्याचा भाग असतो.

कृतज्ञता

      देवाने पू. मामांना संत म्हणून घोषित केले, मूर्तीमंत गुणांची खाण असलेल्या पू. मामांचा सहवास मला दिला, तसेच पू. मामांची भाची होण्यासाठी देवाने पात्र बनवले; म्हणून कृतज्ञता वाटली.

     पू. मामांविषयी लिहावं तेवढं अल्पच आहे. देवाने एवढी सूत्रे शिकायला दिली, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे !

– कु. तृप्ती गावडे (पू. शंकर गुंजेकर यांची भाची), कोल्हापूर सेवाकेंद्र

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात