सनातन दृष्टीकोन
नंदुरबार जिल्ह्यातील कांजारभाट समाजातील एका विधवेवर बाह्यसंबंधांचा आरोप करून तिला नग्न करण्याची शिक्षा देण्यास सांगण्याच्या जातपंचायतीच्या निर्णयामुळे प्रसारमाध्यमांमध्ये जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ?, याविषयी चर्चा चालू आहे. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.
१. जातपंचायतीचा हा निर्णय निषेधार्ह आहे. अशा प्रकारचे निंद्य, रानटी आणि अमानवी निर्णय देणार्या जातपंचायतीतील तथाकथित न्यायाधिशांना प्रस्थापित कायद्यांनुसार कठोर शिक्षा होईल, यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे.
२. जातपंचायतीचा हा निर्णय म्हणजे एकप्रकारची विकृती होय. अशा विकृत झालेल्या जातपंचायती चालण्यापेक्षा बंद होणे अधिक योग्य ठरते.
३. देशात स्वतंत्र न्यायपालिका असतांना जातपंचायतींनी सध्याच्या काळात अवैध निवाडे देण्याचे कार्य न करता केवळ स्वतःच्या ज्ञातीमध्ये संस्कृती संवर्धनाचे कार्य करावे.
४. एखाद्या गोष्टीची काळानुसार निर्मिती जेव्हा होते, तेव्हा त्यामागे कार्यकारणभाव असतो. जातपंचायत अस्तित्वात का आली, याचा विचार केला, तर हे लक्षात येईल. स्वातंत्र्यापूर्वी दंडाचे भय नसलेल्या समाजात अनाचार माजू नये, सामंजस्याने निर्णय व्हावेत, समाजव्यवस्था टिकून रहावी, तसेच समाजावर नैतिक नियंत्रण रहावे, या आवश्यकतेला अनुसरून प्रत्येक जातीची पंचायत निर्माण झाली. उत्पत्ती, स्थिती आणि लय या अध्यात्मशास्त्रीय नियमानुसार उत्पत्तीला आलेली प्रत्येक गोष्ट कालांतराने लय पावते. आज राज्यघटना आणि भारतीय दंडविधान अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीत काळाच्या कसोटीवर जातपंचायत निरुपयोगी आणि कालबाह्य ठरली आहे.
५. जे चिरंतन असते, त्यात चैतन्य असते. जातपंचायत काळाच्या कसोटीवर टिकली नाही; कारण तिच्यात चैतन्य नव्हते. त्यामुळे आज समाजातील जातपंंचायतींचे प्रस्थ घटू लागले आहे. वैदु समाजासारख्या अनेक समाजांनी जातपंचायत मोडीत काढल्या आहेत. जातपंचायतीमध्ये वाढलेली विकृती, हीच तिच्या नाशाची घंटा आहे.
६. जोपर्यंत जातपंचायतीमध्ये शिस्त, परस्परसामंजस्य आणि संस्कृतीचे संवर्धन होते, तोवर कोणीही जातपंचायतींना विरोध करण्याचे कारण नव्हते. अनेक जातीपंचायतींनी स्वतःच्या ज्ञातीसाठी विधायक कार्य करून संस्कृती संवर्धनाचे चांगले कार्य केले. आज अनेक ठिकाणी जातपंचायतींमध्ये विकृतीचा शिरकाव झालेला आहे. अमानुष आणि अनैतिक निर्णय होऊ लागले आहेत. त्यामुळे अशा जातपंचायतींना विरोध करणे, ही काळाची आवश्यकता ठरते; मात्र त्याचबरोबर आजही ज्या काही जातपंचायती संस्कृती संवर्धनाचे उत्तम आणि नैतिक कार्य करत आहेत, त्यांना विरोध करणे अयोग्य ठरेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात