अविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते,
या निर्णयाविषयी धर्मशास्त्र काय सांगते ?
देहली उच्च न्यायालयाने एका प्रकरणाविषयी निकाल देतांना अविभक्त हिंदु कुटुंबातील ज्येष्ठ मुलगी ही त्या कुटुंबाची आणि त्याच्या कुटुंब व्यवसायाची कर्ता होऊ शकते, असा निवाडा दिला आहे. याविषयी धर्मशास्त्रीय दृष्टीकोन पुढे दिला आहे.
१. मनुस्मृति मुलीचा वारसा-अधिकार मान्य करते !
मनुस्मृतीच्या ९ व्या अध्यायामधील पुढील श्लोक वरील आधार आहेत.
१ अ. श्लोक ११८
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक् ।
स्वात् स्वादंशाच्चतुर्भागं पतिता: स्युरदित्सव: ॥
अर्थ : वडिलोपार्जित संपत्तीमधील स्वतःच्या भागातील चौथा भाग बहिणीला देणे, हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन न करणारा भाऊ पतित मानला जातो.
१ आ. श्लोक १३०
यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा ।
तस्यामात्मनि तिष्ठन्त्यां कथमन्यो धनं हरेत् ॥
अर्थ : जसा आपला आत्मा तसाच आपला मुलगा होय. मुलगा आणि मुलगी समान आहेत.त्यामुळे पित्याला आत्मस्वरूप असणारी मुलगी असतांना वारसा अधिकाराने मिळणारे धन परके लोक कसे घेऊ शकतात ?
१ इ. श्लोक १३१ : मातेचे स्त्रीधन हा तिच्या अविवाहित कन्यांचा भाग समजावा.
१ ई. श्लोक १३३ : मुलाची मुले आणि मुलीची मुले यांत काहीच भेद नाही.
१ उ. श्लोक १९२ : सर्व भाऊ आणि अविवाहित बहिणी यांनी आईच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती समान वाटून घ्यावी.
२. अविभक्त कुटुंबातील ज्येष्ठ अपत्य
सक्षम आणि पित्यासमान असणे आवश्यक !
अविभक्त कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र किंवा पुत्री यांनी कर्ता होण्यासाठी तितकेच सक्षम आणि पित्यासमान उत्तरदायी असले पाहिजे. दुर्वतनी ज्येष्ठ अपत्य कर्ता होऊ शकत नाही, असे मनुस्मृतीत ९ व्या अध्यायात म्हटले आहे. महाभारतात धृतराष्ट्र हा अंध असल्याने त्याचा धाकटा बंधू पंडू हा राजा म्हणजे कर्ता झाला होता.
३. हिंदु धर्माच्या इतिहासात अनेक स्त्रिया कर्त्या होत्या !
महाभारतीय युद्धात काश्मीर राजा ठार झाल्यानंतर त्याची पत्नी यशोमती हिचा राज्याभिषेक स्वतः भगवान श्रीकृष्णाने केला होता. अर्जुनाची एक पत्नी चित्रांगदा मणिपूर राज्याची राणी होती. अहल्याबाई होळकर पतीनिधनानंतर होळकर घराण्याच्या कर्त्या झाल्या होत्या. राम वनवासात निघाले, तेव्हा राजगुरु वसिष्ठ ऋषींनी सीता राज्यकारभार करण्यास कुशल आणि सक्षम असल्याने तिचाच राज्याभिषेक करावा, असे सुचवले होते; मात्र सीतेने रामासह वनवासात जाण्याची अनुज्ञा मागितल्याने तिने राज्यकारभार केला नाही, असा उल्लेख वाल्मीकि रामायणात आहे. शहाजीराजे कर्नाटकमध्ये असतांना राजमाता जिजाई यांनी पुणे जहागिरीचा राज्यकारभार सांभाळला. छत्रपती राजारामाची पत्नी राणी ताराबाई यांनी कर्त्या होऊन कोल्हापूर संस्थान स्थापन केले होते. तात्पर्य हिंदु धर्माने कधीही स्त्रीला कर्तेपणापासून रोखलेले नाही.
४. भारतीय शास्त्रांचे आणि कायद्याचे महत्त्व
स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.
५. अन्य पंथांतील महिलांचे अधिकारांविषयी
भारतीय कायदा सजग आणि संवेदनशील होणे आवश्यक !
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाने भारतीय समाजातील ८० टक्के हिंदु महिलांना दिलासा मिळाला असला, तरी संख्येने २० टक्के असलेल्या अन्य पंथांतील महिलांच्या अधिकारांविषयी भारतीय कायदे कधी संवेदनशील आणि सजग होणार, हा खरा प्रश्न आहे. आजही भारतात शरियत कायद्याप्रमाणे मुसलमान महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार नाकारला जातो. तलाक दिल्यानंतर साधी पोटगीसुद्धा दिली जात नाही. १९८६ मध्ये राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणात घटनादुरुस्ती करून तलाखपीडित शहाबानोचा पोटगी अधिकार काढून घेतला होता. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, देशाला मागास करणारा आणि असहिष्णू असा होता. त्याविषयी मुसलमान महिलांनी काँग्रेस शासनाला खरे तर खडसवायला हवे.
६. देशात समान नागरी कायदा करा !
हिंदु महिलांसह समाजातील सर्व पंथांतील महिलांना जर समान न्याय आम्हा सर्वांना बहाल करायचा असेल, तर देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा केला पाहिजे. त्यात समाज, राष्ट्र आणि प्रत्येक धर्म यांचे हित आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात