स्वातंत्र्यवीर सावरकर – आरोप आणि वास्तव ! (भाग १)

savarkar_2_antim
स्वातंत्र्यवीर सावरकर

साप्ताहिकाच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. इतिहास संशोधनाच्या नावाखाली लेखक निरंजन टकले यांनी वस्तूस्थितीचा विपर्यास करून एका महान क्रांतीकारकाचा अपमान केला आहे. या लेखातील प्रत्येक सूत्र याआधी अनेकदा खोडून काढले गेले असतांनाही द वीकने एक नवीन संशोधन सादर करण्याच्या आविर्भावात नुराणी आणि शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले निराधार आरोप पुन्हा सादर केले आहेत. त्याचे खंडण या लेखातून करत आहे.

 

 

Ranjeet_Savarka_clr
श्री. रणजित सावरकर

वर्ष १९०५ मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत वर्ष १९३० पर्यंत काँग्रेसलाही अशी मागणी करण्याचे धैर्य झाले नव्हते. अशा असामान्य धैर्यशाली व्यक्तीवर चिखलफेक करणार्‍या या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चार आरोप करण्यात आले आहेत.

 

 

आरोप क्रमांक १

(म्हणे) स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये गेल्यानंतर
खचले  आणि त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रे पाठवली !

खंडण

१. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणे आणि पुन्हा
लढा उभारणे, हाच सावरकरांचा हेतू होता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःची सुटका व्हावी, यासाठी अनेकदा आवेदनपत्रे पाठवली होती आणि ही वस्तूस्थिती त्यांनी आपल्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रात कधीही लपवलेली नाही; परंतु या आवेदनपत्रांत कुठेही स्वतःच्या कृत्याविषयी माफी मागितलेली नाही. सावरकर बॅरिस्टर होते. त्यामुळे वकिली बाण्याने आपल्या सुटकेसाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न करणे त्यांच्या दृष्टीने गैर नव्हते. कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणे, आणि पुन्हा लढा उभारणे, हे प्रत्येक क्रांतीकारकाचे कर्तव्य आहे, असे सावरकरांचे मत होते. हे मत ते अंदमानात असलेल्या क्रांतीकारकांपुढे वारंवार मांडत. याला पुरावा म्हणजे थोर क्रांतीकारक सच्चिंद्रनाथ संन्याल ! लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुटले. नंतर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतीकार्य चालू केले आणि प्रसिद्ध काकोरी कटाचे सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेपही झाली होती. आपल्या बंदीजीवन या आत्मचरित्राच्या पृष्ठ २२६ वर ते म्हणतात, सावरकरांनी केलेल्या अर्जात माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते. माझी सुटका झाली; परंतु त्यांची का नाही ? कारण शासनाला अशी भीती होती की, सावरकरांची सुटका झाली, तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल.

२. सावरकरांनी सुटकेच्या अर्जात
लिहिलेला मजकूर हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग !

दी वीक ने नोव्हेंबर वर्ष १९१३ चा एक अर्ज दिला आहे. त्यात कुठेही पश्‍चात्ताप किंवा माफी नाही. हा अर्ज त्यांनी सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांना देतांना त्यांच्याशी व्यक्तीगत चर्चा केली होती. हा अर्ज शासनाकडे पाठवतांना रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की, It cannot be said to express any regret or repentance. परंतु हे वाक्य निरंजन टकले यांनी सोयीस्कररित्या गाळले आहे. त्यांचे हे कृत्य त्यांचा लेख हा संशोधन नसून फसवेगिरी आहे, हे सिद्ध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर कारागृहात खचले होते कि नाही आणि सावरकरांनी सुटकेच्या अर्जात लिहिलेला मजकूर हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग होता कि नाही, हे बघायचे असेल, तर त्यासाठी कारागृहात त्यांच्याबरोबर शिक्षा भोगत असलेले क्रांतीकारक आणि कारागृहाच्या नोंदी तपासणे, हाच एकमेव मार्ग आहे; परंतु टकले यांनी असे काहीही केलेले नाही. सावरकरासमवेत कारागृहात असलेले क्रांतीकारक उल्लासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा या प्रसिद्ध क्रांतीकारकांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेले सावरकरांचे उल्लेख वस्तूस्थिती स्पष्ट करते.

३. सावरकरांसमवेत कारागृहात असलेल्या
क्रांतीकारकांचे अनुभव सावरकरांचे दृढ मनोबल स्पष्ट करतात !

B11 उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झटका आला होता. त्याआधी त्यांना जेव्हा हातकडीत टांगून ठेवले होते, तेव्हा तापाच्या भरात त्यांना भास झाला. त्यात कारागृहरक्षक बारीने त्यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने लढतात आणि बारीचा पराभव करतात. (12 years in prison life page 64 & 65) आता अगदी भ्रमात असतांनादेखील सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आहेत, हा उल्लासकर दत्त यांचा विश्‍वास हा सावरकरांचे मनोबल वर्ष १९१२ मध्ये कसे होते, हे सिद्ध करतो.

वर्ष १९१३ मध्ये सुराज्य पत्राचे संपादक रामशरण शर्मा यांना संपामध्ये भाग घेतल्याविषयी जेव्हा शिक्षा वाढवण्याची धमकी कारागृहरक्षकाने दिली, तेव्हा त्यांनी उत्तर दिले यदी विनायक सावरकर के ५० बरस कट सकते हैं, तो मैं भी काट लुंगा। (काला पानी का ऐतिहासिक दस्तऐवज पृष्ठ ५३) म्हणजेच वर्ष १९१३ मध्येही क्रांतीकारक सावरकरांकडे एक आदर्श म्हणूनच बघत होते. जर सावरकरांचे मनोबल तुटले असते, तर असे शक्य होते का ?

वर्ष १९१९ मधील संपाविषयी अंदमानमध्ये शिक्षा भोगत असलेले महान क्रांतीकारक भाई परमानंद त्यांच्या आपबीती या चरित्रात म्हणतात की, कारागृहात झालेल्या कुठल्याही संघर्षासाठी जेलर बारी आणि पर्यवेक्षक सावरकर बंधूंनाच उत्तरदायी धरत असत.

४. क्रांतीकारकांची आत्मचरित्रे आणि अंदमानमधील अपूर्ण
दस्तऐवज यातूनही सावरकरांनी कठोर शिक्षा भोगल्याचे स्पष्ट होते !

सावरकरांनी कारागृहात कुठलेही कष्ट भोगले नाहीत, असा एक बिनबुडाचा आरोप श्री. टकले यांनी केला आहे; परंतु अंदमानमध्ये वर्ष १९१६ ते वर्ष १९२१ मध्ये शिक्षा भोगत असलेले महान क्रांतीकारक पृथ्वीसिंह आझाद यांचा अनुभव काही वेगळेच सांगतो. वीर सावरकर ने आधुनिक भारत के युवकों को क्रांती का पाठ पढाया था । क्रांतीकारी वृत्तीवाले नवयुवकों के वे तेजस्वी नेता थे । ऐसे सामर्थ्यशाली व्यक्ती के अंग्रेज अधिकारियों ने वह काम लिया जो बैलोंसे लिया जाता था । तेल के कोल्हू पर प्रतिदिन तीस पौंड तेल निकालने के लिए सावरकर को मजबूर किया गया । (क्रांती के पथिक – पृष्ठ १०८)

B7

पृथ्वीसिंह आझाद पुढे भारतात परत आल्यानंतर ब्रिटिशांच्या कैदेतून निसटल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांनीच त्यांना आसरा दिला होता (क्रांती के पथिक-पृष्ठ १५३). त्यानंतर भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा सूड म्हणून जेव्हा पृथ्वीसिंह आझाद आणि सुप्रसिद्ध महिला क्रांतीकारी दुर्गाभाभी व्होरा यांनी जेव्हा वर्ष १९३० मध्ये लॅमिंग्टन पोलीस ठाण्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांच्यासमवेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विश्‍वासू सहकारी आणि क्रांतीकारक गणेश रघुनाथ वैशंपायन होते. (क्रांती के पथिक – पृष्ठ १९०) हेच गणेश रघुनाथ वैशंपायन हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचेही निकटचे सहकारी होते. (क्रांती के पथिक- पृष्ठ १८४)

म्हणजे पृथ्वीसिंह आझाद, उल्लासकर दत्त, भाई परमानंद, रामचरण शर्मा आणि सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्यासारख्या महान क्रांतीकारकांचा प्रत्यक्ष अनुभव खोटा आहे, असे श्री. टकले यांना म्हणावयाचे आहे का ?

सध्या उपलब्ध असलेल्या सावरकरांच्या कारागृहातील नोंदीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खालील शिक्षा ठोठावण्यात आल्या. या वेळी द्वितीय महायुद्धात जपानी अंमलाच्या काळात अंदमान कारागृहातील असंख्य कागदपत्रे नष्ट झाली असल्यामुळे या नोंदींमध्ये त्रुटी आहेत.

१. कारागृहात पोहोचल्यानंतर ११ व्या दिवशी, म्हणजे १५ जुलै १९११ या दिवशी त्यांना ६ मास कोठडी बंद करण्यात आले.

२. १६ ऑगस्ट १९११ – त्यांना हातकोलूवर १४ दिवस जुंपण्यात आले.

३. १५ जानेवारी १९१२ – त्यांची कोठडी बंदी संपली.

४. ११ जून १९१२ – त्यांच्याजवळ कागद सापडल्याविषयी १ मास एकांतवास

५. १९ सप्टेंबर १९१२ – त्यांच्याजवळ दुसर्‍याला लिहलेले पत्र सापडल्याविषयी सात दिवसांची खडी हातबेडी

६. २३ नोव्हेंबर १९१२ – त्यांच्याजवळ दुसर्‍याला लिहिलेले पत्र सापडल्याविषयी १ महिन्याची एकांतवासाची शिक्षा

७. ३० डिसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ – अन्नत्याग.

८. १६ नोव्हेंबर १९१३ – रेजेनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर काम करण्याचे नाकारल्याविषयी १ मासाची एकांतवासाची शिक्षा.

९. ८ जून १९१४ – काम करण्यास नकार दिल्यामुळे सात दिवस हातबेड्या घालून उभे रहाण्याची शिक्षा.

१०. १६ जून १९१४ – काम करण्यास नकार दिल्यामुळे चार मास साखळदंडाची शिक्षा.

११. १८ जून १९१४ – काम करण्यास संपूर्ण नकार दिल्यामुळे दहा दिवस खोडाबेडीची शिक्षा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देण्यात आलेल्या अनेक शिक्षा या अवैध असल्याने त्याची नोंद झाली नाही, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माझी जन्मठेप या पुस्तकात स्पष्टपणे म्हटले आहे आणि इतर क्रांतीकारकांच्या आत्मचरित्रातही हे स्पष्ट केले गेले आहे. तरीही वरील अपूर्ण दस्तऐवज बघतांनाही सावरकरांना किती कठोर शिक्षा झाल्या होत्या, याची झलक मिळते.

५. सावरकरांनी कारागृहात अनेक वेळा केलेले बंड आणि
त्याविषयी त्यांना झालेली शिक्षा त्यांचा कणखर स्वभाव दर्शवतात !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातील वागणूक कशी होती, याविषयी श्री. टकले त्यांची ५ वर्षांची वागणूक उत्तम असल्याचा उल्लेख जेल रेकॉर्डमध्ये असल्याचे सांगतात; पण सोयीस्कररित्या ! मनोवृत्ती या स्तंभाखाली लिहिलेला लेख सांगतो, त्यांची वागणूक नम्र असली, तरीही त्यांनी स्वतःहून सरकारला सहकार्य करण्याची प्रवृत्ती कुठेही दाखवली नाही. त्यांचे खरे राजकीय विचार काय आहेत, हे या वेळी सांगता येणे कठीण आहे. म्हणजेच सावरकर हे अजूनही धोकादायक कैदी आहेत, असे ब्रिटीश सरकारचे वर्ष १९१९ पर्यंत मत असल्याचे स्पष्ट होते आणि याच अहवालाच्या आधारावर सावरकरांना सार्वत्रिक माफीचा लाभ देऊ नये, असा निर्णय मुंबई प्रांतिक शासनाने घेतला होता.

रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्यापुढे तथाकथित विनंतीअर्ज सादर केल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे लगेच संप पुकारतात आणि त्याविषयी त्यांना १ मासाची एकांतवासाची शिक्षा होते अन् त्यानंतरही अनेकदा ते काम नाकारून खडाबेडी, दंडाबेडी, एकांतवासाची शिक्षा भोगतात. हे त्यांच्या कणखर स्वभावाचे निर्विवाद निदर्शक आहे.

६. सावरकरांचे वर्ष १९२१ मधील
हस्तलिखित कठोर कारावासानंतरही सावरकरांचे
विचार तीळमात्र पालटले नव्हते, हेच निर्विवादपणे सिद्ध करते !

यानंतरही सावरकरांच्या मनोधर्याविषयी कुणाच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निराकरण करणारा अस्सल पुरावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळाला आहे. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले हस्तलिखित प्रकाशात आले असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेल्या तीन देशभक्तीपर रचना आहेत.

वर्ष १९२१ च्या या हस्तलिखितातील रचना युवकांना ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्याचे आवाहन करतात. यातील एक गीत सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्याद्वारे काकोरी कटातील आरोपींपर्यंत पोहोचले असावे. कारागृहात जी देशभक्तीपर गीते हे क्रांतीकारक गात, त्यात सावरकरांची यही पाओगे… ही गझल समाविष्ट होती.

(काकोरी के दिलजले, पृष्ठ ११२)
सावरकरांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या एका रचनेत ते म्हणतात,

हंता रावणका हैं अपना रामवीरवर सेनानी,
कर्मयोग का देव हैं स्वयं कृष्ण सारथी अभिमानी ।
भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली हैं,
फिर देर क्यूँ, उठो भाई हम ही हमारे वाली हैं ॥

वर्ष १९१० मध्ये अंदमानमध्ये जाण्याआधी लिहिलेल्या पहिला हप्ता या कवितेत हेच भाव व्यक्त झाले होते आणि ११ वर्षांच्या कठोर कारावासानंतरही सावरकरांचे विचार तीळमात्र पालटले नव्हते, हेच सावरकरांचे हस्तलिखित निर्विवाद सिद्ध करते.

– श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक

पुढील भाग वाचण्यासाठी भेट द्या. भाग २

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात