श्रीकृष्णाच्या भक्तीत रममाण झालेल्या
मुंबई येथील श्रीमती शिरीन चायना यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
२.७.२०१४ या दिवशी मला श्रीकृष्ण या ग्रंथाच्या संदर्भातील धारिका सेवेसाठी मिळताक्षणीच माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाने ही सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञताभाव दाटून आला. ही सेवा करतांना मला विविध अनुभूती आल्या. त्या मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. २.७.२०१४ या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. सेवेला आरंभ करण्यापूर्वी कमरेपर्यंतच्या श्रीकृष्णाचे दर्शन होणे
ग्रंथाच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वीच मला सूक्ष्मातून कमरेपर्यंतच्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि माझ्या तोंडून राधा मैया, मीरा मैया, माझ्या लाडक्या श्रीकृष्णापर्यंत माझे प्रेम पोचवण्यासाठी मला अनुमती द्या, असे शब्द आले.
१ आ. स्वतःला गोपी बनवण्यासाठी देवाला
आर्ततेने प्रार्थना करणे आणि श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न होणे
थोड्या वेळाने मी प्रार्थना केली, देवा, मला गोपी बनव. गोपी कसे बनायचे ?, हे तूच मला शिकवू शकतोस; पण केवळ इंग्रजीत शिकव हां, म्हणजे मी गाणे म्हणत इतर गोपींप्रमाणे भावविभोर होऊन नाचू शकेन. देवा, तुझ्यावर माझ्या जीवनापेक्षा अधिक प्रेम कसे करायचे ?, हे तूच मला शिकव. तूच माझा मधुर मुरलीधर श्याम आहेस. त्या वेळी मी श्रीकृष्णाच्या ध्यानात एवढी मग्न होते की, उदबत्तीमुळे माझ्या चादरीवर एक मोठे आणि माझ्या अंगावरील कपड्यावर एक लहान छिद्र पडलेले मला कळलेच नाही. त्यानंतर माझ्या मनात विचार आला, या चादरीला पडलेले छिद्र शिवून नीट करता येईल; परंतु श्रीकृष्णच माझ्या हृदयातून निघून गेला, तर काहीच करता येणार नाही. त्यानंतर माझ्याकडून प्रार्थना झाली, देवा, माझा मनोलय आणि बुद्धीलय कर अन् आनंदाच्या लहरीत मला डुंबवून ठेव.
१ इ. भ्रमणभाषमध्ये नाद नसतांना त्यामधून मिनिटभर मंजुळ घंटानाद ऐकू येणे
मी कोणतेही संगीत लावले नसतांना अकस्मात् मला मिनिटभर मंजुळ घंटानाद ऐकू आला. असे दोनदा झाल्यावर तो नाद कुठून येतो ?, हे जिज्ञासेने पाहिले. तेव्हा तो माझ्या भ्रमणभाषमधून येत असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रत्यक्षात तसा नाद माझ्या भ्रमणभाषमध्ये नाही, तरीही तो नाद मला सलग २ दिवस २ – ३ वेळा ऐकू आला. तेव्हा मला व्यष्टी साधनेची आठवण करून देण्यासाठी तो नाद आला असावा, असे मला वाटले.
२. ३.७.२०१४ या दिवशी आलेल्या अनुभूती
२ अ. श्रीकृष्णाच्या हृदयाकडून माझ्याकडे मंद सोनेरी प्रकाश
येत असल्याचे आणि श्रीकृष्णाच्या जवळ मोर नाचत असल्याचे दिसणे
मला जाणवले, श्रीकृष्णाच्या हृदयाकडून माझ्याकडे मंद सोनेरी प्रकाश येत असून मी त्यात पूर्णतः झाकून गेले आहे. मी सोनेरी प्रकाशाच्या झोताकडे, म्हणजेच श्रीकृष्णाकडे जाण्यासाठी पावले उचलत आहे. श्रीकृष्णाच्या जवळ मोर नाचत आहे. तूच माझी गंगा, तूच माझी यमुना, तूच माझा आत्मा, असे शब्द माझ्या ओठांवर आले. श्रीकृष्ण झोपाळ्यावर बसून खुदुखुदु हसत होता. पुन्हा श्रीकृष्णाच्या हृदयातून माझ्या हृदयाच्या ठिकाणी सोनेरी प्रकाश येतांना दिसला. श्वेत रंगाची कबुतरे उडतांना दिसली.
२ आ. सुंदर निळ्या आभाळातील धुक्यात श्रीकृष्णाचा महिमा गात
आणि नाचत जात असल्याचे जाणवणे अन् एक घंटाभर भावावस्थेत असणे
त्यानंतर मला जाणवले, श्रीकृष्ण मला स्वतःसमवेत त्याच्या सोनेरी रथात बसवून नेत आहे. सुंदर निळ्या आभाळातील धुक्यात श्रीकृष्णाचा महिमा गात आणि नाचत मी जात आहे. शेवटी मला कानात हळूच शब्द ऐकू आले, सेवेसाठी तुला हा ग्रंथ देणे केवळ एक निमित्त होते. त्याद्वारे मला तुझा भाव जागृत करायचा होता. श्रीकृष्णाचा नामजप करतांना बहुतांश वेळा मी वेगळ्याच विश्वात असल्याचे जाणवते. शेवटी मला त्याचे आशीर्वादात्मक शब्द ऐकू आले आणि त्याने मला हात हलवून दाखवला. त्यानंतर जवळजवळ १ घंटा मी भावावस्थेत होते.
३. ४.७.२०१४ या दिवशी आलेल्या अनुभूती
३ अ. श्रीकृष्ण डोक्याला स्पर्श करत असल्याचे जाणवणे
अर्जुनाप्रमाणे मी श्रीकृष्णासमोर शरणागत झाले. माझे डोळे बंद होते, तरी श्रीकृष्ण माझ्या डोक्याला स्पर्श करत आहे, असे मला जाणवले.
३ आ. श्रीकृष्णाच्या समवेत रासलीला खेळत असल्याचे दिसणे
त्यानंतर मला जाणवले, मी द्वारकेतील श्रीकृष्णाच्या महालाच्या प्रारंभीच्या पायर्या चढत आहे. शीतल चांदण्या रात्री मी श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यासमवेत मैदानात रासलीला खेळत आहे. तुझा नामजप माझ्यापर्यंत पोचत आहे, असे श्रीकृष्ण सांगत असल्याचा विचार माझ्या मनात आला.
३ इ. सेवेची धारिका तिसर्यांदा वाचतांना धारिकेतील त्रुटी
लक्षात येणे आणि त्याद्वारे देव सहनशीलता वाढवत असल्याचे जाणवणे
सेवेसाठी दिलेली धारिका तिसर्यांदा वाचतांना ३ ठिकाणी अपूर्ण माहिती असल्याचे माझ्या लक्षात आले. यापूर्वी धारिका २ वेळा वाचूनही या त्रुटी माझ्या लक्षात आल्या नव्हत्या. याद्वारे देव माझी सहनशीलता वाढवत असून लक्षपूर्वक सेवा करण्यास शिकवत आहे, असे मला जाणवले.
३ ई. कोणत्याही कारणाविना मोगर्याचा सुगंध येणे
६.७.२०१४ या दिवशी मी रामनाथी, गोवा येथील साधिका कु. सुप्रियाताईला संगणकीय पत्र पाठवण्याच्या सिद्धतेत असतांना माझा पेन ड्राईव्ह आणि भ्रमणसंगणक यांना मोगर्याचा सुगंध येत होता. तेथे जवळपास उदबत्ती किंवा अत्तर काहीही नसतांना हा सुगंध येत होता. मोगरा आणि चमेली हा श्रीकृष्णाचा आवडीचा सुगंध असल्याचे मला जाणवले.
४. ७.७.२०१४ या दिवशी आलेल्या अनुभूती
४ अ. एका आश्रमात यज्ञ होत असून यज्ञकुंडातील ज्वाळा आकाशाला
भिडल्या असल्याचे जाणवणे आणि श्रीविष्णु जमलेल्या लोकांना आशीर्वाद देत असल्याचे दिसणे
सकाळी १०:२८ वाजता एका आश्रमात यज्ञ होत असल्याचे सूक्ष्मातून दिसून यज्ञकुंडातील ज्वाळा आकाशाला भिडल्या असल्याचे जाणवले आणि त्यात श्रीविष्णूचे (कमरेपर्यंतच्या भागाचे) दर्शन झाले. श्रीविष्णूचा उजवा हात तेथे जमलेल्या लोकांना आशीर्वाद देतांनाच्या स्थितीत होता. २ – ३ मिनिटांनी मला पुन्हा तेच दृश्य दिसले. यज्ञ होत असलेले ठिकाण सनातनचे आश्रम असण्याविषयी साशंक असले, तरी यज्ञ एका पवित्र ठिकाणी होत असल्याचे जाणवले.
४ आ. गोपी होळी खेळतांनाचा आनंद अनुभवणे
१०:३२ वाजता गोपी होळी खेळत असून त्या त्यातील शुद्ध आनंद अनुभवत असल्याचे जाणवले.
आजच्या दिवशी यज्ञाचे दर्शन घडवल्याबद्दल श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांच्या चरणी शरणागतभावाने कोटी कोटी कृतज्ञता !
– श्रीमती शिरीन चायना, मुंबई (८.७.२०१४)
(भाव तेथे देव या उक्तीनुसार आलेल्या अनुभूती या साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)