हिंदु कोणाला म्हणायचे ?

1403265184_dharma

 

१. आसिंधुसिंधु भारतभूमी ही
ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदु !

आसिन्धु सिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्‍चैव स वै हिन्दुरिति स्मृतः ॥

प्राकृत गीती (समश्‍लोकी) :
भारतभूमि असे ही सिंधूपासोनि सिंधुपावेतो ।
हिंदु म्हणा तयासी जो पितृभू पुण्यभू तिला म्हणतो ॥

अर्थ : जे सिंधू नदीपासून दक्षिण सिंधूपर्यंत (समुद्रापर्यंत) पसरलेल्या विशाल भूभागाला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी समजतात, ते सर्व हिंदू होत.

 

२. हिंदु या शब्दामध्येच हिंदुसंघटनेचा पाया असणे

हिंदु हा शब्द हिंदुसंघटनेचा केवळ पायाच आहे. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक वा आकुंचित, बळकट वा ढिला, चिरंतन वा चंचल आहे, त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदूसंघटनेचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्कम आणि टिकाऊ ठरणारे आहे.

 

३. देश नि त्यात निपजलेला धर्म
आणि संस्कृती यांच्या बंधनांनी अनुप्राणित
झालेले राष्ट्र, हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक असणे

हिंदु शब्दाची व्याख्या कोणताही धर्मग्रंथ वा कोणतेही धर्ममत यांच्याशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदु शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभूमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेला धर्म आणि संस्कृती यांच्या बंधनांनी अनुप्राणित झालेले राष्ट्र, हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत; म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहिजे, आसिंधुसिंधु भारतभूमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदु !

 

४. हिंदूंनी सार्‍या पृथ्वीवर जरी साहती स्थापल्या, तरी त्यांच्या
प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू भारतभूमीच असणार !

यातील पितृभू नि पुण्यभू या शब्दांना कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो, तसा थोडासा पारिभाषिक अर्थ आहे. पुण्यभू म्हणजे जिथे आपले आई-बाप तेवढेच निपजले ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज रहात आले ती, असा अर्थ आहे. काही जण पटकन शंका घेतात, आम्ही दोन पिढ्या आफ्रिकेत आहोत. मग आम्ही हिंदु नाही कि काय ? ती शंका यामुळे अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी संपूर्ण पृथ्वीवर जरी उद्या वसाहती स्थापल्या, तरी त्यांच्या प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू ही भारतभूमीच असणार.

 

५. पुण्यभू म्हणजे धर्मोपदेश करणारा
धर्माचा संस्थापक, ऋषी, अवतार वा प्रेषित यांच्या
अवतरत्वाने आणि निवासाने धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आलेली भूमी !

पूण्यभूचा अर्थ इंग्लिश होली लँड या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक, ऋषी, अवतार वा प्रेषित प्रकटला आणि त्या धर्मास उपदेशिता झाला अन् त्याच्या निवासाने ज्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिस्त्यांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थे हा पुण्यभू शब्द वापरलेला आहे, नुसत्या पवित्रभूमी या अर्थी नव्हे.

 

६. हिंदुत्वाच्या व्याख्येचे सत्यत्व आणि व्यापकत्व

पितृभू नि पुण्यभू या शब्दांच्या या पारिभाषिक अर्थी ही आसिंधुसिंधु भारतभूमिका ज्याची ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, तो तो हिंदु ! हिंदुत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच आजच्या वस्तूस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे आणि जितकी व्यापक, तितकीच व्यावर्तकही आहे.

संदर्भ : सांस्कृतिक वार्तापत्र, हिंदुसंघटक सावरकर विशेषांक, १५ ऑगस्ट २००८
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात