समर्थभक्त मोहनबुवा रामदासी
यांचा सन्मान करतांना श्री. शिवाजी वटकर
पनवेल – सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालू आहे, याची अनुभूती येते. येथे साधक प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवन जगत आहेत, हे पाहून आनंद होतो. सनातनसारख्या संस्था आज कार्यरत आहेत; म्हणून धर्म जिवंत आहे. समर्थांचे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहेत, असे भावपूर्ण उद्गार समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी काढले. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातनचे साधक श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. या वेळी त्यांना सनातनचे गोसंवर्धन आणि हिंदुराष्ट्र स्थापनेची दिशा हे ग्रंथ भेट देण्यात आले. आश्रमात चालणार्या विविध विभागांतील कार्याविषयी श्री. वटकर यांनी त्यांना अवगत केले.
ह.भ.प. मोहनबुवा रामदासी मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, “आज समाजाची स्थिती बिकट आहे. हिंदु धर्मावर आक्रमणे होत आहेत. कोणी ही परिस्थिती पालटेल, हा भ्रम आहे. त्यासाठी आपल्यालाच कार्य करावे लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या आत्मशक्तीची आवश्यकता आहे. ही शक्ती आपल्याला आपला आत्माराम देईल. त्या आत्मारामाला अनुभवणे हाच खरा परमार्थ आहे. दैनंदिन जीवनातील अनुभूती या आत्मशक्तीने प्राप्त होते. ती आपल्याला वाढवून जतन करायची आहे. आज बाहेर जे काही सामाजिक राजकीय कार्य चालले आहे, त्याला आध्यात्मिक पाठबळ सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थांकडून मिळत असते.”