स्वामी विवेकानंदांनी भारताची संस्कृती एका शब्दात सांगितली, ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! ही पवित्र परंपरा आणि सुसंस्कृतपणा याचा उगम भारतियांना अध्यात्मामुळेच लाभला. भारत म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे भारत ! एवढी एकच ओळख सर्व अंगांनी आणि अर्थांनी भारतियांचे विश्लेषण करण्यास पूरक आहे. पुरातन काळापासून भारत आणि भारतीय यांची ओळख ही आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्ती आणि देश याच अर्थाने संपूर्ण जगात होती. या देशाला अध्यात्मशास्त्र वेगळ्या अंगाने शिकवायची किंवा समजावून द्यायची निकडच नसायची. अगदी बाल्यावस्थेपासूनच व्यक्तींच्या प्रत्येक कृतीत आध्यात्मिक दृष्टीकोन अंतर्भूत असायचा. साहजिकच व्यावहारिक कार्यासोबतच अध्यात्म श्वासागणिक जगले जायचे. अभ्यास आणि कृती यांची योग्य सांगड असल्यामुळे उगीचच विरोधासाठी विरोध होत नव्हता. एकूणच सर्वांचे आयुष्य आनंदी आणि आत्यंतिक समाधानाने भरलेले असायचे.
अशा या आध्यात्मिक तेजाने तळपणार्या भारतीय समाजाला आज अध्यात्म या शब्दाचे इतके वावडे कसे निर्माण झाले, हा एक वैचारिक मंथनाचा भाग आहे. यामध्ये काही प्रमाणात आपल्या वैचारिक त्रुटी आणि कालमहात्म्य या दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. गेल्या २ सहस्रांहून अधिक वर्षांच्या यवनी आक्रमणात वैदिक संस्कृतीने अग्नीपरीक्षा दिली आणि ती नवीन तेजाने तळपतच राहिली. अशा परकीय आक्रमणात आक्रमकांनी त्यांची रज-तम विचारधारांची मुळे भारतियांमध्ये प्रभावीपणे रुजवली. यामुळे भारतियांना त्यांच्या मूळ प्रवृत्तीचा विसर पडला आणि संस्कृतीचा अभिमान न बाळगता त्याचा न्यूनगंड जास्त प्रमाणात बाळगला गेला.
आज आयुष्यातील प्रत्येक अंग परकीय मनोवृत्तीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. साहजिकच त्या विचारांच्या अधिपत्याखाली असलेले नागरिक आज अध्यात्म पूर्णपणे झटकून जगत आहेत. तथाकथित विज्ञानवादी सूक्ष्मतम किंवा अतिसूक्ष्मतम गोष्टी मानवी जीवनावर व्यापक प्रमाणात परिणाम करत असतात, हा नियम विज्ञानात जरी मान्य करत असले, तरी अध्यात्मातील हे नियम ते समजून घेण्याच्या सिद्धतेत नसतात. अपौरुषेय असे अध्यात्म परकियांच्या नव्हे, तर आपल्या वैदिक धर्माने दिलेल्या दृष्टीने पहाण्याची आवश्यकता आहे. अध्यात्म हे इतके व्यापक आहे की, संपूर्ण विज्ञान त्यात सामावू शकते. अध्यात्म हे क्लिष्ट नव्हे, तर जीवनातील क्लिष्टतेला सोपे करणारे आहे. प्राथमिक स्तरावर अध्यात्माचा विज्ञान म्हणून जरी अभ्यास केला, तरी हे शास्त्र म्हणजे अतीप्रगत विज्ञानच आहे, हे निश्चितच कळेल. अध्यात्म म्हणजे काहीतरी कठीण असे न वाटू देता बुद्धीवादी आणि विज्ञानवादी यांनी ते लक्षात येण्यासाठी कृतीत आणणे महत्त्वाचे आहे; कारण हे कृतीचे शास्त्र आहे. अध्यात्मात सांगितलेल्या सोप्या सोप्या कृती केल्यावर त्यामुळे आपले आयुष्य कसे समृद्ध होऊ शकते, हे लक्षात येईल. सध्या जीवनाचे जे वैज्ञानिकीकरण झाले आहे, त्याऐवजी जीवनाचे अध्यात्मीकरण करायला आरंभ केल्यावर अध्यात्म अधिक चांगल्या रितीने समजू लागेल.
– सौ. श्रद्धा मुकुल जोशी, पुणे