‘भावजागृतीचे प्रयत्न’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली प्रक्रियाच आपत्काळात जगण्यासाठीची संजीवनी !

Article also available in :

अनुक्रमणिका

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. स्वतःतील दैवी गुण जाणून घ्यावा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करावेत

‘प्रत्येकामध्ये देवाने असा एक उत्तम गुण दिलेला असतो की, त्याचा योग्य वापर केल्यास त्याची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढते. ‘तो गुण कोणता आहे ?’, हे स्वतः चिंतन करून आणि इतरांचेही साहाय्य घेऊन जाणून घ्यावा अन् त्याचा वापर करून जोमाने प्रयत्न करावेत.

 

२. एका गुणाच्या पूर्ण समर्पणातूनच
देवाचे विश्व उमजू लागून देवाविषयी जवळीक
वाटू लागणे आणि त्यातूनच भावनिर्मिती होत असणे

आपल्याला जे येते, ते सर्वस्वी देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. एक गुण आपल्याला पुष्कळ काही शिकवून जातो. ‘किती शिकलो ?’, यापेक्षा ‘काय शिकलो ?’, याला अधिक महत्त्व आहे. एका गुणाच्या पूर्ण समर्पणातूनच देवाचे विश्व आपल्याला कळू लागते आणि साधनेमुळे अनंत गुणांनी युक्त असलेल्या देवाविषयी आपल्याला जवळीक वाटू लागते. यालाच ‘देवाविषयी भाव निर्माण होणे’, असे म्हणतात.

 

३. अंगी देवत्व येणे

एकदा का आपल्यात भाव निर्माण झाला की, सर्व गुणांचे भांडार असणारा देवच आपल्या हृदयात येऊन राहू लागतो. तोच आपल्यात आला की, आपोआपच आपण त्याच्या सर्व गुणांशी एकरूप होऊ लागतो, यालाच ‘अंगी देवत्व येणे’, असे म्हणतात.

 

४. इतरांना विचारून कृती केल्याने देव प्रसन्न होऊन
तो साधकांना कठीण परिस्थितीतही सांभाळत असणे

‘काळाची गती जाणून केलेले वर्तमानातील कर्म हे जिवाच्या उद्धारासाठी प्रमाण ठरते; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘काळानुसार साधना’ हे वचन आधीच सांगून ठेवले आहे. कधीही काहीही करू नये. प्रत्येक वेळी उन्नतांना विचारून कर्म करावे. या गुणावर प्रसन्न होऊन देव आपल्याला कठीण परिस्थितीतही सांभाळतो.

 

५. बाह्य नात्यात गुंतण्यापेक्षा आंतरिक नात्याने
मनुष्यातील देवाला जवळ करावे, देव आपल्याला कधीही अंतर देणार नाही

बाह्य देहापेक्षा साधकाच्या अंतरातील देवावर आपण प्रेम केले पाहिजे, म्हणजे काही कारणाने तो साधक आपल्या समवेत नसेल, तरीही त्याच्या विरहाचे दुःख आपल्याला होत नाही. आपल्या मनाला साधकाच्या देहातील तत्त्वावर प्रेम करण्याची सवय लागलेली असल्याने ‘तत्त्वरूपाने तो आपल्या जवळच आहे’, असे वाटते. यात एकटेपणाचे दुःख होत नाही, तर ‘देव सर्वत्र असल्याने तो साधकही आपल्याजवळच आहे’, या आनंदात आपल्याला सेवा करता येते. ‘आपत्काळात कोण कुठे असेल ?’, हे ठाऊक नाही; म्हणून बाह्य नात्यात गुंतू नका. आंतरिक नात्याने मनुष्यातील देवाला जवळ करा. देव आपल्याला कधीही अंतर देत नाही.

 

६. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना
साधना करण्याचा महामंत्र दिला असल्याने साधक
आपत्काळातही आनंदस्वरूप असलेल्या देवाच्या संगतीत आनंदी रहातील !

ईश्वराने काळानुसार आता समाजमंथन चालू केले आहे. ईश्वराच्या गाळण्यातून जे गाळले जातील, तेच पुढे कठीण काळात वाचतील. आता सर्वांना सर्वच त्यागावे लागेल. साधकांनी आधीच तन, मन आणि धन यांचा त्याग केल्याने साधकांना कठीण काळाचे काही वाटणार नाही; कारण त्यांच्या जवळ काही नाहीच, तर हरवल्याचे दुःखही त्यांना होणार नाही; परंतु आपत्काळात सामान्यजनांचे मात्र हाल होतील. त्यांना सर्वस्व गमावल्याचे दुःख होईल. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना साधना करण्याचा महामंत्र दिल्याने ते आपत्काळातही आनंदस्वरूप असलेल्या देवाच्या संगतीने आनंदी रहातील’, यात शंका नाही.’

 

७. ‘भावजागृतीचे प्रयत्न करणे’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी
शिकवलेली प्रक्रियाच आपत्काळात जगण्यासाठी संजीवनी ठरणार असणे

गुरूंनी आपल्याला जो भाव दिला आहे, तो आपत्काळात सतत जागृत ठेवायला हवा. ‘भाव तेथे देव’ या उक्तीप्रमाणे ‘भावजागृतीचे प्रयत्न करणे’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली प्रक्रियाच आपत्काळात जगण्यासाठी संजीवनी ठरणार आहे. हिला ‘आंतरिक संजीवनी’ असे नाव आहे. आंतरिक संजीवनीमुळे आपत्काळात देहाबरोबरच प्राणाचेही रक्षण होणार आहे.

 

८. मानवनिर्मित गोष्ट क्षणिक आनंद देत असणे; मात्र देवनिर्मितीत आनंद कायमचा असणे

‘तुमची दृष्टी सुंदर असायला हवी. मग मार्गावरील दगड, माती, पाने, फुले यांमध्येही तुम्हाला देव दिसेल; कारण प्रत्येक गोष्ट देवानेच निर्माण केली आहे. देवनिर्मित आनंद कायमचा असतो; परंतु मानवनिर्मित गोष्ट मात्र क्षणिक आनंद देते. क्षणिक आनंदाला ‘सुख’ हे नाव आहे.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२०)

Leave a Comment