अनुक्रमणिका
- १. अन्नपचन नीट न झाल्याने बनणारी शरीरस्थिती हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांच्या वाढीसाठी पोषक ठरणे
- २. केवळ बैठी कामे करणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून ४ वेळा न खाता २ वेळाच आहार घेणे योग्य असणे
- ३. पावसाळ्यातील आरोग्यदायी दिनक्रम
- ४. केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावतांना त्रास होऊ नये, यासाठी हे करा !
- ५. ४ ऐवजी केवळ २ वेळा खाल्ल्यास अशक्तपणा येईल का ?
- ६. ऋतू पालटल्यावर आहारामध्ये पालट करणे आवश्यक !
- ७. दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !
वैद्य मेघराज पराडकर
१. अन्नपचन नीट न झाल्याने बनणारी शरीरस्थिती
हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांच्या वाढीसाठी पोषक ठरणे
‘पावसाळ्यात विशेषतः कोकणासारख्या भरपूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशांमध्ये सततच्या पावसामुळे शरिरातील अग्नी (पचनशक्ती) मंद झालेला असतो. ज्याप्रमाणे चुलीमध्ये अग्नी नीट प्रज्वलित झालेला नसतांना त्यामध्ये सरपण सारले, तर ते नीट पेट घेत नाही, त्याप्रमाणे जठरातील अग्नी नीट प्रज्वलित झालेला नसतांना आहार घेतल्यास नीट पचत नाही. अग्नी मंद असतांना दिवसातून ४ – ४ वेळा खाल्ल्याने एकदा खाल्लेले पूर्ण पचन होण्याआधीच दुसरे अन्न जठरामध्ये येते. त्यामुळे सर्व अन्न नीट पचत नाही. अन्न नीट न पचल्याने दूषित अन्नरस निर्माण होतो. ज्याप्रमाणे ओलसरपणा असतांना जंतूंची वाढ झपाट्याने होते, त्याप्रमाणे दूषित अन्नरस शरिरात फिरत असतांना शरिरातील क्लेदामुळे (अतिरिक्त ओलाव्यामुळे) शरीर हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांच्या वाढीसाठी पूरक ठरते. यामुळे सर्दी, खोकला, ताप इत्यादी विकार होण्याची शक्यता वाढते.
२. केवळ बैठी कामे करणाऱ्या व्यक्तींनी
दिवसातून ४ वेळा न खाता २ वेळाच आहार घेणे योग्य असणे
पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते. यामुळे केवळ बैठी कामे करणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून ४ – ४ वेळा न खाता केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावून घेतल्यास पावसाळ्यात होणारे सर्दी, खोकला, ताप इत्यादी विकारांचा प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.
३. पावसाळ्यातील आरोग्यदायी दिनक्रम
सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पूर्वी थोडा व्यायाम आणि प्राणायाम करावा. यामुळे शरिरातील क्लेद (अतिरिक्त ओलावा) नाहीसा होण्यास साहाय्य होते. यानंतर भूक लागली, तरच चहा, कशाय किंवा गरम पाणी प्यावे. सकाळी ११ नंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा जेवावे. दुपारी ४ च्या सुमारास पुन्हा सकाळप्रमाणे चहा, कशाय किंवा गरम पाणी प्यायल्यास चालते; मात्र काही खाणे शक्यतो टाळावे. एखादे फळ खायचे असल्यास चहा न घेता त्या वेळेत फळ खावे. रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवून रात्री ११ वाजेपर्यंत झोपावे. चहा इत्यादी न घेता केवळ २ वेळा जेवणे आदर्श आहे; परंतु असे शक्य न झाल्यास वर दिल्याप्रमाणे दिनक्रम ठेवावा. असा दिनक्रम पाळल्यास शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होते. शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींनी किंवा अशक्त व्यक्तींनी त्यांच्या भुकेनुसार सकाळी थोडा अल्पाहार करण्यास आडकाठी नाही; पण अल्पाहार केल्यास दुपारचे जेवण थोडे उशिरा चांगली भूक लागल्यावर (साधारण १ किंवा दीड वाजल्यानंतर) करावे. दिवसभरात काही खावेसे वाटल्यास ते अध्येमध्ये न खाता जेवणाच्या वेळेस खावे.
४. केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावतांना त्रास होऊ नये, यासाठी हे करा !
दिवसातून ४ – ४ वेळा आहार घेण्याची सवय असतांना एकाएकी २ वेळाच आहार घेणे जमेल का ? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. कोणत्याही परिवर्तनामध्ये थोडाफार त्रास होतोच; परंतु ‘हे होणारे परिवर्तन आरोग्यदायी आहे’, हे मनाला समजावून सांगितल्यास त्रासदायक वाटत नाही. काहींना सकाळी काही न खाता राहिल्यास डोके दुखू लागते. अशांनी त्यांच्या सकाळच्या खाण्याच्या वेळी गरम पाण्यामध्ये थोडा गूळ घालून ते पाणी प्यावे. असे केल्याने शरिराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि डोकेदुखी टळते. असे काही दिवस केल्याने शरिराला दिवसातून २ वेळाच आहार घेण्याची सवय लागते.
५. ४ ऐवजी केवळ २ वेळा खाल्ल्यास अशक्तपणा येईल का ?
पावसाच्या दिवसांत याप्रमाणे आहार अल्प केल्याने थकवा येत नाही; कारण शरिराची शक्ती आपण किती खातो, यावर अवलंबून नसते, तर किती पचवतो, यावर अवलंबून असते. २ वेळा आहार घेतल्याने सर्व अन्न नीट पचल्याने थकवा येत नाही.
६. ऋतू पालटल्यावर आहारामध्ये पालट करणे आवश्यक !
पावसाळ्यानंतर काही दिवस शरद ऋतू असतो. पाऊस आणि थंडी यांच्यामधील हा संधीकाळ. अशा वेळेस आहार वरीलप्रमाणे अल्पच ठेवावा. शरद ऋतूनंतर हिवाळा चालू होतो. थंडीचे दिवस चालू झाले की, भूकही वाढते. त्या वेळी दिवसातून ४ वेळा आहार घेतला, तरी पचून जातो. साधारण मार्च मासामध्ये वसंत ऋतूमध्ये कफ वाढल्याने अग्नी मंद होतो. त्या वेळी पुन्हा वरीलप्रमाणे अल्प आहार ठेवावा. पुन्हा कडक उन्हाळ्यामध्ये भुकेनुसार आहार घ्यावा; मात्र त्या वेळी द्रव आहाराचे प्रमाणात अधिक असावे.’
७. दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !
अ. आरोग्य चांगले रहाण्यासाठी दिवसभरात किती वेळा आहार घ्यावा ?
‘दिवसातून केवळ २ वेळा आहार घेणे’, हे आदर्श आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते. हे शक्य नसल्यास जास्तीतजास्त ३ वेळा आहार घ्यावा. सकाळी शौचाला साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि चांगली भूक लागलेली असणे, ही लक्षणे निर्माण झाल्यावरच सकाळचा अल्पाहार करावा. ही लक्षणे निर्माण झाली नाहीत, तर सकाळी १० वाजेपर्यंत काही खाऊ नये. तहान लागल्यास केवळ गरम पाणी प्यावे. सकाळी १० वाजल्यानंतर अल्पाहार (‘अल्प’ आहार) करावा. अशा वेळी दुपारचे जेवण साधारण १ ते २ वाजता घ्यावे. सायंकाळी ७ वाजता रात्रीचे जेवण घ्यावे. असे ३ वेळा आहार घेणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.
आ. खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध असले, तरी जास्त वेळा खाण्याचा मोह टाळा !
घरी डब्यांमध्ये खाऊ ठेवलेला असतो. काही वेळा नोकरीच्या ठिकाणी सकाळ-सायंकाळ चहा असतो. हॉटेलमध्ये कधीही खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात. पुष्कळ जण एका ठिकाणी रहातात, अशा ठिकाणी ४ – ४ वेळा आहार उपलब्ध असतो. असे असले, तरी ही केवळ सोय असते. ३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे, हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. कधीतरी भूक लागली म्हणून किंवा वेगळेपणा म्हणून अतिरिक्त वेळी खाणे चालते; पण प्रतिदिन नेमाने जास्त वेळा खाणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२२)