महर्षि अत्री यांचे सुपुत्र आणि शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि यांच्या तपोभूमीचे भावपूर्ण दर्शन !

Article also available in :

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

कुलु (हिमाचल प्रदेश) – सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे १९ जून २०२१ या दिवशी देवभूमी हिमाचल प्रदेशचा प्रवास आरंभला. सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेशमधील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांचे दर्शन घेतले आणि ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे लवकरात लवकर दूर व्हावेत, त्याची लवकरात लवकर स्थापना व्हावी अन् आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली. अशा या दैवी क्षेत्रामध्ये कुलु प्रदेशात अनेक ऋषींचे तपोस्थान आहे. २६.०६.२०२१ या दिवशी येथील ‘दुर्वासऋषि’, तसेच तेथील साचाणी भागातील गर्गऋषि यांच्या तपोस्थानी जाऊन श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांचे दर्शन घेतले. याविषयीचा हा वृत्तांत…

 

हिमाचल प्रदेशमध्ये सर्व ऋषींचे दिव्य तेजोमय रूपाने वास्तव्य

सनातन हिंदु धर्मशास्त्रांमध्ये ८८ सहस्र ऋषींचा उल्लेख आहे. भारतात अनेक ठिकाणी विशेष करून पर्वतांच्या ठिकाणी ऋषींनी तपश्चर्या केलेली अनेक ठिकाणे आहेत. देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये अशी अनेक गावे आहेत की, जी केवळ ऋषींच्या नावानेच ओळखली जातात. त्यांतील काही गावांमध्ये ऋषींनी घालून दिलेले नियमच पाळले जातात. वसिष्ठ, व्यास, पराशर, दुर्वास, गर्ग, च्यवन, मार्कंड, पुंडरिक, जमदग्नी, मनु, भृगु, गौतम, याज्ञवल्क्य आदी अनेक ऋषींचे स्थान हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. ‘हे सर्व ऋषी आजही दिव्य तेजोमय रूपाने येथे वास करतात’, असे म्हटले जाते.

श्री. विनायक शानभाग

 

दुर्वासऋषि यांचे माहात्म्य

महर्षि अत्री आणि ऋषिपत्नी अनुसूया यांनी केलेल्या कठीण तपामुळे साक्षात् शिव ‘दुर्वासऋषि’ यांच्या रूपात अवतरले. आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र हा ब्रह्मदेवाचा अंश आहे, आणि तो महर्षि अत्री अन् अनुसूया यांचा सुपुत्र आहे, तसेच तो दुर्वासऋषि यांचा भाऊ आहे. याचसमवेत महर्षि अत्री आणि अनुसूया यांचे सुपुत्र भगवान दत्तात्रेय हेही दुर्वासऋषींचे भाऊ आहेत. सर्व पुराणांमध्ये दुर्वासांचा उल्लेख ‘शीघ्रकोपी’ असाच आहे; मात्र दुर्वासांच्या शापांमुळेच अनेक दैवी लीला घडल्या आहेत. समुद्रमंथन, श्रीरामावतार आणि श्रीकृष्णावतार समाप्ती आदी दैवी घटना दुर्वासांच्या शापांमुळेच घडल्या. दुर्वास जेवढे शाप द्यायचे, त्यापेक्षाही अधिक वरदान द्यायचे. राणी कुंतीने केलेल्या सेवेमुळे दुर्वासांनी कुंतीला सिद्ध मंत्र दिला, ज्याने सूर्याचा अंश असलेल्या कर्णाचा जन्म झाला. द्रौपदीला कधीही वस्त्र न्यून न पडण्याचे वरदान दिले होते. त्यामुळेच महाभारतात वस्त्रहरण प्रसंगात द्रौपदीला वस्त्र न्यून पडले नाही.

 

पालगी येथील दुर्वासऋषि मंदिराचे स्थानमाहात्म्य

सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि पाठीमागे पालगी येथील दुर्वासऋषींचे मंदिर

कुलु जिल्ह्यातील पालगी नावाच्या गावात दुर्वासऋषींचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे. येथील पर्वतावर दुर्वासऋषींनी तपश्चर्या केली, असे म्हटले जाते. प्रतिदिन सोवळे पाळून सकाळी ७ ते ८ या वेळेत पूजा होते. प्रतिदिन पूजेला आरंभ करण्यापूर्वी पुजारी एका पितळी भांड्यात तांदुळ, गूळ, दूध आणि तूप घालून एकदाच ढवळतात अन् कोळशाच्या चुलीवर ठेवून देतात. पूजा संपेपर्यंत ती खीर न ढवळता सिद्ध होते. या खिरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चव नेहमी एकसारखी असते, असे तेथील महिला भक्तांनी सांगितले. आजपर्यंत अनेक लोकांना अशी अनुभूती आली आहे की, अर्धा किलो तांदुळाची खीर मंदिरात ५०, १००, ५०० किंवा १ सहस्र लोक जरी आले तरी ती पुरते. आजपर्यंत एकदाही भांडे रिकामे झाले किंवा खीर परत करावी लागली, असे झाले नाही. हे दुर्वासांचे अक्षय्यपात्रच आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील स्थानिक लोक दुर्वासऋषींना त्यांच्या घरातील समस्या, विवाह आदी गोष्टींविषयी कौल लावून विचारतात. येथील कौल लावण्याची पद्धत निराळी आहे.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१. आम्हाला दुर्वासऋषींच्या मंदिराकडे जाण्यासाठी पहाटे ५.३० वाजता निघायचे होते. त्यामुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या पहाटे ३.३० वाजता उठल्या आणि त्यांनी अंतःप्रेरणेने ‘शिवमहिम्न स्तोत्र’ ऐकले. त्यानंतर प्रवासाला निघाल्यावर त्यांना लक्षात आले की, दुर्वासऋषि हे साक्षात् शिवाचे अंशावतार होते आणि दुर्वासऋषींनीच त्यांना ते स्तोत्र ऐकण्याची प्रेरणा दिली.

२. जेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दुर्वासऋषींच्या मंदिरात पोचल्या, तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून दुर्वासऋषींची पाद्यपूजा केली. सूक्ष्मातून त्यांच्या चरणांवर पाणी घालत असतांना दुर्वासऋषींच्या चरणांतून गरम वाफा निघत असल्याचे त्यांना दिसले. या वेळी त्यांना जाणवले की, त्या गरम वाफा म्हणजे दुर्वासऋषींच्या तपोबलामुळे निर्माण झालेल्या उष्णतेचे प्रतीक आहे.

३. कुलूपासून ३० कि.मी. दूर उंच पर्वतावर दुर्वासऋषींचे मंदिर आहे. तेथे जाण्याचा मार्ग खडतर आहे. गाडीने उंच उंच पर्वतावर जातांना भीती वाटते. काही ठिकाणी रस्ताही ढासळलेला होता. अशा वेळी आम्हाला दुर्वास मंदिराचे विश्वस्त श्री. दिलीप सिंह यांनी साहाय्य केले. त्यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘श्री. दिलीप सिंह यांच्या माध्यमातून दुर्वासऋषींनीच आम्हाला साहाय्य केले. दुर्वासऋषींच्या तपोस्थानी आपण सर्वांनी जावे, ही ऋषींचीच इच्छा आहे.’’ दर्शन आणि पूजा झाल्यावर श्री. दिलीप सिंह आम्हा सर्वांना त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्या बागेतील अक्रोड त्यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अर्पण केले.

– श्री. विनायक शानभाग, हिमाचल प्रदेश (२६.६.२०२१)

 

जगाला गर्ग संहिता देणारे आणि भगवान श्रीकृष्णाचे नामकरण करणारे
गर्गऋषि यांचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले कृतज्ञतापूर्वक दर्शन !

कुलु प्रदेशात साचाणी येथील ‘गर्गऋषि’ यांचे तपोस्थान आहे. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २६.६.२०२१ या दिवशी या तपोस्थानाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. त्याविषयीचा हा वृत्तांत…

गर्गऋषि यांचे माहात्म्य

जगाला गर्ग संहिता देणारे गर्गऋषि हे गोकुळाच्या यादव कुळाचे कुलपुरोहित होते. नंदराजाला ठाऊक होते की, गर्गऋषि हे ज्योतिषशास्त्र तज्ञ आणि जाणकार होते. नंदांच्या विनंतीवरून गर्गऋषि यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून ध्यान लावले आणि वसुदेवाने नंदराजाकडे आणलेल्या बालकाचे नामकरण ‘श्रीकृष्ण’ असे केले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, शुक्राचार्य यांच्याप्रमाणे गर्गऋषींनाही ‘गर्गाचार्य’ अशी आचार्य पदवी लाभली आहे. वास्तूशास्त्र आणि आयुर्वेद यांवरही त्यांनी अनेक शास्त्रग्रंथ लिहिले आहेत. गर्गऋषींनी २७ नक्षत्रांपैकी ‘कृत्तिका’ या नक्षत्राला प्रथम नक्षत्राचे स्थान दिले आहे.

साचाणी (हिमाचल प्रदेश) येथील गर्गऋषि मंदिर

श्रीकृष्णाच्या यादव कुळाचे कुलपुरोहित गर्गऋषि यांचे साचाणी (हिमाचल प्रदेश) येथील मंदिर

 

गर्गऋषींच्या मंदिरातील १. गर्गऋषींचा मुखवटा आणि बाजूला त्यांची शक्ति २. योगिनीदेवीचा मुखवटा

 

गर्गऋषींची पालखीतील उत्सवमूर्ती आणि बाजूला मंदिराचे पुजारी श्री. नरेंद्र धामी

हिमाचल प्रदेशमधील कुलु जिल्ह्यातील साचाणी नामक गावाच्या चारही बाजूंनी उंच उंच असे सुंदर पर्वत आहेत. यातील एका पर्वतावर गर्गऋषींचे मंदिर आहे. ‘येथे असलेल्या पर्वतावर गर्गऋषींनी तपश्चर्या केली होती’, असे म्हटले जाते. साचाणी येथील स्थानिक लोक या स्थानाला ‘गर्गाचार्य मंदिर’ असे म्हणतात. या मंदिरात मुखवट्यांच्या रूपात गर्गऋषींची पूजा केली जाते. त्यांच्या समवेत त्यांची शक्ति योगिनीदेवीचाही मुखवटा आहे.

क्षणचित्रे

१. गर्गऋषींच्या मंदिरात सर्वांना प्रवेश देण्यात येत नाही. आश्चर्य म्हणजे तेथील पुजारी श्री. नरेंद्र धामी यांना ‘आम्ही सनातन संस्थेच्या आश्रमातून आलो आहोत’, असे म्हटल्यावर मंदिराच्या आत प्रवेश दिला आणि त्यांनी मंदिराविषयीची सर्व माहिती आम्हाला सांगितली. मंदिराच्या आत गर्गऋषींची उत्सवमूर्ती आणि पालखी आहे. या वेळी पुजार्‍यांनी गर्गऋषींच्या पालखीवरील एक वस्त्र आश्रमात जतन करण्यासाठी दिले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संग्रहातील या वस्त्राच्या माध्यमातून गर्गऋषींचे माहात्म्य पुढील अनेक पिढ्यांना ज्ञात होईल.

२. मंदिराच्या आत प्रवेश करतांना हातावर गोमूत्र लावून जाण्याची पद्धती येथे फार पूर्वीपासून पाळली जाते. आता कोरोना महामारी आल्याने आपण हाताला ‘सॅनिटायझर’ लावतो; पण आपल्या ऋषींनी स्वतःला शुद्ध करण्याची ही पद्धत प्राचीन काळापासूनच शोधली होती.

– श्री. विनायक शानभाग, हिमाचल प्रदेश
सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत अनुमाने ८ लाखांहून अधिक कि.मी. प्रवास करून अशा प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. त्यामुळे आपल्याला इतिहासाच्या पोटात दडलेल्या दैवी स्मृतींचे छायाचित्रमय दर्शन घडत आहे ! त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

Leave a Comment