श्री दुर्गादेवी
नवरात्रीच्या काळात श्री सप्तशतीचा पाठ केला जातो आणि शेवटी हवन केले जाते. यालाच चंडीविधान असे म्हणतात. याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
१. चंडीविधानचा अर्थ
चंडी हे श्री दुर्गादेवी हिचे एक नाव आहे. मार्कंडेयपुराणात चंडीदेवीचे माहात्म्य सांगितले असून त्यात तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील जवळजवळ सातशे श्लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी निराळा काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे. हा पाठ विशेषतः आश्विनातील नवरात्रीत करतात. काही घराण्यांत तसा कुलाचारही असतो. पाठ केल्यानंतर हवनही करायचे असते. या सगळ्याला मिळून ‘चंडीविधान’ असे म्हणतात.
२. चंडीविधानचे प्रकार
अ. नवचंडी
नऊ दिवस प्रतिदिन सप्तशतीचा पाठ आणि त्याच्या दशांशाने हवन करतात, त्याला नवचंडी म्हणतात. अनुष्ठानाच्या अंगभूत म्हणून नऊ दिवस एका कुमारीची पूजा करतात किंवा पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन अशा वाढत्या क्रमाने कुमारींची पूजा करतात.
आ. शतचंडी
या विधानात सप्तशतीचे शंभर पाठ करतात. पाठाच्या आद्यंती नवार्ण मंत्राचा शंभर-शंभर जप करतात. अशा प्रकारे केलेल्या पाठाला ‘संपुटित पाठ’ असे म्हणतात. पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन, तिसर्या दिवशी तीन आणि चौथ्या दिवशी चार अशा चढत्या क्रमाने दहा ब्राह्मणांनी पाठ केले म्हणजे शंभर चंडीपाठ पुरे होतात. ते पुरे झाल्यावर पाचव्या दिवशी दशांश हवन करतात.
इ. सहस्रचंडी
राज्यनाश, महाउत्पात, महाभय, महामारी, शत्रूभय, रोगभय इत्यादी संकटांचा निरास होण्यासाठी सहस्रचंडीचे विधान करतात. यात सप्तशतीचे एक सहस्र पाठ करायचे असतात. त्यासाठी शंभर ब्राह्मण बोलावतात.
ई. लक्षचंडी
सप्तशतीचे एक लक्ष पाठ आणि त्या अनुषंगाने इतर विधी, याला लक्षचंडी म्हणतात.
३. विविध पद्धती
श्री दुर्गासप्तशतीचे उपासक त्याचे सुलटे, उलटे, सपल्लव, संपुट अशा पद्धतींचे पाठ करतात. विशिष्ट कामनेसाठी विशिष्ट प्रकारचा पाठ करतात.
४. इच्छेनुसार प्रार्थना
श्री सप्तशतीमध्ये पुढे दिलेल्या काही श्लोकांसारखे विशिष्ट कामनापूर्तीसाठी विशिष्ट श्लोक आहेत.
अ. चांगली पत्नी मिळण्यासाठी
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् ।
तारिणीं दुर्गसंसारात् सागरस्य कुलोद्भवाम् ।।
अर्थ : मला मनोरमा, माझ्या इच्छेनुसार वागणारी, कठीण अशा या संसारसागरातून तारणारी आणि चांगल्या कुळात जन्मलेली अशी पत्नी मिळू दे.
आ. सर्वांगीण कल्याणाकरिता
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : सर्व मंगलवस्तूंतील मांगल्यरूप अशा देवी, कल्याणदायिनी देवी, सर्व पुरुषार्थ साधविणार्या देवी, शरणागतांचे रक्षण करणार्या देवी, त्रिनयने, गौरी, नारायणी तुला नमस्कार असो.