योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहीत केल्याने अधिकच वाढतो !

Article also available in :

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. ‘युज’ याचा अर्थ ‘संयोग होणे’ असा आहे. ‘योग’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे’ असा आहे. योगशास्त्राचा उगम सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात झाला आहे. खरेतर योग ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली अंगीकारल्यास व्यक्ती आपल्या जीवनात शारीरिक, मानसिक, तसेच आध्यात्मिक स्तरावर यशस्वी होऊन आनंदमय जीवन व्यतीत करू शकते. त्यामुळे ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे.

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव मांडला होता. ‘संपूर्ण विश्‍वासाठी व्यक्तीचे स्वास्थ्य आणि कल्याण यांसाठी एक पूर्णतावादी दृष्टीकोन उपलब्ध करून देणे’, हा यामागचा उद्देश होता. या प्रस्तावात योगासनांचे लाभ आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेे होते. या प्रस्तावाला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेचे १७५ सदस्य सहप्रायोजक म्हणून लाभले. ही आजपर्यंत झालेल्या संयुक्त महासभेच्या कोणत्याही प्रस्तावातील सहप्रायोजकांची सर्वाधिक संख्या होती. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रायोजक होते. ११ डिसेंबर २०१४ या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने ‘वैश्‍विक स्वास्थ्य आणि विदेश नीती’ या अंतर्गत पूर्ण बहुमताने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची अनुमती दिली. हा प्रस्ताव सर्वांत अल्प कालावधीत पारित झाला. यावरून जगभरात योगच्या महत्त्वाविषयी असलेली जागृती लक्षात येते.

आज जगभरातील बहुतांश देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात योगासने आणि प्राणायाम शिकवणारे वर्ग चालू आहेत. या वर्गांची वाढती लोकप्रियता लोकांना त्यांचा लाभ होत असल्याचे निदर्शक आहे. योगासने आणि प्राणायाम यांचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणार्‍या लाभाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणीची माहिती या लेखात देत आहोत.

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे उपकरण माजी अणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केले आहे. ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येते. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही.

 

१. सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ आणि ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्याचा
व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्‍या परिणामाचा अभ्यास सूर्यनमस्कार करतांनाची एक मुद्रा

आजच्या धकाधकीच्या जीवनात विविध योगासने करायला वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. यावर सूर्यनमस्कार घालणे हा उत्तम पर्याय आहे; कारण एक सूर्यनमस्काराच्या अंतर्गत एकूण १२ योगासने येतात. त्यामुळे योगासनांचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणारा लाभ अभ्यासण्यासाठी सूर्यनमस्काराची निवड करण्यात आली.

१ अ. सूर्यनमस्काराचे महत्त्व

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । जन्मान्तरसहस्रेषु दारिद्य्रं नोपजायते ॥

अर्थ : जे लोक सूर्याला प्रतिदिन नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्य्र येत नाही.

१ आ. सूर्यनमस्कार घातल्याने होणारे लाभ

१. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.

२. हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.

३. बाहू आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात.

४. पाठीचा मणका आणि कंबर लवचिक होतात.

५. पोटाजवळची चरबी वितळून वजन अल्प होण्यास साहाय्य होते.

६. पचनक्रिया सुधारते.

७. मनाची एकाग्रता वाढते.

१ इ. सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ आणि ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर
होणार्‍या परिणामाचा ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास

हा अभ्यास १ पुरुष आणि १ स्त्री अशा २ साधकांवर करण्यात आला. यासाठी पुढीलप्रमाणे चाचणी करण्यात आली.

१. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी दोघांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. ही त्यांच्या ‘मूळ स्थिती’ची नोंद होय.

२. त्यानंतर दोघांनीही प्रत्येकी १२ सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ घातल्यावर त्यांच्या पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या नोंदींतून त्यांच्यावर सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.

३. दुसर्‍या दिवशी दोघांची परत ‘मूळ स्थिती’ची नोंद केल्यावर त्यांनी १२ सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे घेऊन’ घातले. त्यानंतर त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या नोंदींतून त्यांच्यावर सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.

वरील चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढीलप्रमाणे होत्या.

वरील सारणीतून पुढील सूत्रे स्पष्ट होतात.

१. पुरुष साधकामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली नकारात्मक ऊर्जा त्याने सूर्यनमस्कार दोन्ही प्रकारे घातल्यानंतर पूर्णतः नाहीशी झाली.

२. पुरुष साधकामधील सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘सूर्याची नावे न घेता’ ते घातल्यावर २.३९ मीटरने वाढली, म्हणजे दुप्पटपेक्षा अधिक वाढली. त्याने ते ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्यावर ४.१७ मीटर अशी त्याहूनही अधिक वाढली.

३. स्त्री साधिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हतीच. तिच्यामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘सूर्याची नावे न घेता’ ते घातल्यावर ३.०५ मीटरने वाढली, म्हणजे दुपटीपेक्षा अधिक वाढली. तिने सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्यानंतर ४.६६ मीटर अशी त्याहूनही अधिक वाढली.

 

२. ‘नामजप न करता’ आणि ‘नामजप करत’ प्राणायाम
केल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्‍या परिणामाचा अभ्यास

हा अभ्यास करण्यासाठी ‘अनुलोम-विलोम’ हा प्राणायामाचा प्रकार निवडण्यात आला.

२ अ. ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम कसा करावा ?

१. पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसून खांदे सैल सोडा. चेहर्‍यावर मंद स्मित हास्य असू द्या.

२. तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, तळवा आकाशाकडे उघडा ठेवा किंवा अंगठा आणि तर्जनीचे टोक एकमेकांना हळूवारपणे स्पर्श करा.

३. उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा यांची टोके भुवयांच्या मध्यभागी ठेवा, अनामिका आणि करंगळी डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा. अनामिका आणि करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी वापरायची आणि अंगठा उजव्या नाकपुडीसाठी वापरायचा.

४. तुमचा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून हळूवारपणे श्‍वास सोडा.

५. आता डाव्या नाकपुडीतून श्‍वास घ्या आणि नंतर अनामिका अन् करंगळीने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून उजव्या बाजूने श्‍वास सोडा.

६. आता उजव्या बाजूने श्‍वास घ्या आणि डाव्या बाजूने सोडा. अशा प्रकारे तुम्ही अनुलोम-विलोम प्राणायामाचे एक चक्र पूर्ण केले आहे. आळीपाळीने एकेका नाकपुडीने श्‍वास घेणे आणि सोडणे चालू ठेवा.

७. अशा प्रकारे आळीपाळीने दोन्ही नाकपुड्यामधून श्‍वास घेऊन ९ चक्रे पूर्ण करा. प्रत्येक वेळी श्‍वास  सोडल्यावर त्याच नाकपुडीने श्‍वास घेण्याचे लक्षात ठेवा. प्राणायामाच्या संपूर्ण वेळी डोळे बंद ठेवा आणि कोणताही जोर न देता लांब, खोल आणि सहज श्‍वास चालू ठेवा.

२ आ. ‘अनुलोम-विलोम’ प्राणायामाचे लाभ

१. शरिराचे तापमान संतुलित ठेवतो.

२. अनेक अभिसरण आणि श्‍वसन यांच्या समस्यांवर चिकित्सेप्रमाणे काम करतो.

३. मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांमध्ये, जे आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या अनुक्रमे तार्किक आणि भावनिक बाजूंशी परस्परसंबंधित आहेत, त्यांच्यात समन्वय घडवून आणण्यास साहाय्य करतो.

४. शरीर आणि मन यांतील संचित ताणतणाव प्रभावीपणे घालवण्यास आणि तणावमुक्त होण्यास साहाय्य करतो.

५. मन शांत आणि स्थिर करण्यासाठी प्राणायाम हे अतिशय उत्तम असे श्‍वसनाचे तंत्र आहे.

६. मन वर्तमानकाळात रहाते.

२ इ. ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम केल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर
होणार्‍या परिणामाचा ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास

हा अभ्यास ‘सूत्र क्र. १ इ’ मधील चाचणीतील १ पुरुष आणि १ स्त्री अशा २ साधकांवर करण्यात आला. यासाठी पुढीलप्रमाणे चाचणी करण्यात आली.

१. सूर्यनमस्कार घातल्यानंतर मोजण्यांच्या नोंदी केल्यानंतर १० मिनिटे शवासन करून पुन्हा दोघांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. ही त्यांची प्राणायामाचा परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या चाचणीसाठी ‘मूळ स्थिती’ होती.

२. त्यानंतर दोघांनीही प्रत्येकी ९ वेळा ‘नामजप न करता’ अनुलोम-विलोम हा प्राणायाम केल्यानंतर त्यांच्या पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

३. दुसर्‍या दिवशी दोन्ही व्यक्तींच्या ‘मूळ स्थिती’ची नोंद करण्यात आली. त्यानंतर परत त्यांनी अनुलोम-विलोम हा प्राणायाम ‘नामजप करत’ केल्यावर त्यांच्या पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

वरील चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढीलप्रमाणे होत्या.

वरील सारणीतून पुढील सूत्रे स्पष्ट होतात.

१. दोन्ही साधकांमध्ये ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम करण्यापूर्वी आणि नंतर नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२. पुरुष आणि स्त्री साधक यांनी नामजप न करता प्राणायाम केल्यानंतर त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुक्रमे २.६९ अन् २.४७ मीटरने, म्हणजे दीडपटपेक्षा अधिक वाढली. दोघांनी ‘नामजप करत’ प्राणायाम केल्यानंतर ती अनुक्रमे ५.९९ आणि ५.४३ मीटरने, म्हणजे दुप्पटीपेक्षा अधिक वाढली.

 

३. चाचणीचा निष्कर्ष

सूर्यनमस्कार आणि अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याचा आध्यात्मिक
स्तरावर पुष्कळ लाभ होणे; परंतु दोन्ही प्रकार नामजपासहीत केल्याने सर्वाधिक लाभ होणेे

या चाचणीतून सूर्यनमस्कार घातल्यामुळे आणि अनुलोभ-विलोम हा प्राणायाम केल्यामुळे सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणारा लाभ लक्षात आला. हा लाभ सूर्यनमस्कार आणि प्राणायाम नामजप करत केल्यावर अधिकच वाढतो, हेही स्पष्ट झाले. हे लाभ पहाता, ५००० वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी कोणत्याही बाह्य, स्थूल उपकरणाच्या आधारावाचून अद्वितीय अशी योगासने आणि प्राणायाम यांची निर्मिती केली, हे लक्षात येते. यांना चैतन्यमय नामजपाची जोड दिल्यावर लाभात होणारी वृद्धी पहाता, आपल्या ऋषिमुनींप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला होते.

या चाचणीतून नामजपासहीत योगासने आणि प्राणायाम केल्याचा लाभ लक्षात घेऊन अधिकाधिक व्यक्तींना आपल्या दिनचर्येत अंतर्भूत करून घेवोत, ही ईश्‍वचरणी प्रार्थना !’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा (१८.६.२०२०)

Leave a Comment