‘प्रतीके ही अर्थघन, सामर्थ्यवान आणि प्रभावी असतात. आपला राष्ट्रध्वज अनंत पटींनी आपणास सर्वश्रेष्ठ वाटतो तो याचसाठी ! आपला तिरंगी झेंडा हा प्रतिकात्मक असा प्रत्येक भारतियांचा प्राण आणि आत्माच आहे. त्यास आदराने प्रणाम करणे प्रशस्त आहे. भारतियांच्या प्रखर राष्ट्रीय भावना तिरंगी झेंड्याच्या मागे अखंड कार्यप्रवण आहेत. स्वधर्म, देशप्रेम, राष्ट्रवाद त्यात अखंड जागृत आहे.
स्त्रीच्या हातातील हिरवा चुडा आणि भालप्रदेशावरील कुंकू ही थोर प्रतिकेच आहेत. त्यात जीवन सौभाग्यच एकवटलेले आहे. जेव्हा दगडाला शेंदूर फासून त्याची श्रद्धेने पूजा केली जाते, तेव्हा या दगडरूपी प्रतिकात देवत्व प्रकट होते आणि मनुष्यास ते तारक ठरते. प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.
१. ॐकार
सर्व मंत्रांमध्ये ‘ॐकार’ हे मुख्य प्रतीक आहे. ॐकार हा परमेश्वराचा प्रथम ध्वनी आहे. तो परमेश्वराचा प्रथमचा हुंकार आहे. ॐकार हे साक्षात् ब्रह्म आहे. ॐ हा साडेतीन अक्षरांचा बनलेला आहे. त्यातील पहिली मात्रा ‘अ’कार, दुसरी मात्रा ‘उ’कार आणि तिसरी मात्रा ‘म’कार आहे. अर्धी मात्रा अनुस्वार आहे. जीवनाच्या ३ अवस्था विश्व, तेजस, प्राज्ञ हे ‘अ’कार, ‘उ’कार आणि ‘म’कार आहेत. या तीन मात्रा मानवी जीवन शक्तीचे प्रतीक आहेत. अर्धमात्रा ही पाप-पुण्य, सुख-दुःखापासून आपणास अलिप्त ठेवते. वेदमंत्र हे ॐकार पूर्वक उच्चारले पाहिजेत. समग्र विश्व ॐकारामध्ये सामावलेले आहे. अशा ॐकाराचे योगी लोक अखंड ध्यान करतात.
२. कमळ
भारतीय संस्कृतीतील ‘कमळ’ हे प्रतीक प्रभावी आहे. ज्याची नाळ पाण्यात असून कित्येक कोस ज्याचा जीवन सुगंध दरवळतो, ज्याचा देठ टणक आहे, मुख कोमल आहे, ज्याचा गुणसंग्रह सुखावह आहे, असे ‘कमळ’ हे प्रतीक आहे. कमळ चिखलातून वर येते. सर्वांना सुखद दर्शन देते; पण मनुष्य विषयांच्या चिखलातून कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहून अनासक्त जीवन जगत असतो. तोच खरा मानव होय ! गीतेत श्रीकृष्णाने कमळाला जीवनाचा आदर्श मानला आहे. भारतीय संस्कृतीला अनेक कमळासारख्या पाकळ्या आहेत. कमळ हे जीवन सौंदर्याचे प्रतीक आहे. हस्तकमल, चरणकमल, हृदयकमल, नयनकमल, वदनकमल ही कमळ प्रतिकाचीच सुंदर नावे आहेत.
३. कलश
भारतीय वैदिक संस्कृतीत ‘कलश’ प्रतीक श्रेष्ठ आहे. मंदिरावर कळस शोभून दिसतो. प्रत्येक शुभकार्यात श्री गणेश आणि कलश यांचे पूजन केले जाते. ‘स्वस्तिक’ चिन्ह काढताच सूर्यदेव त्याच्यावर आसनस्थ होतो. त्याप्रमाणे कलश सजवताच त्याच्यात वरुणदेव येऊन विराजमान होतो. कलश पूजनाच्या वेळी कलशातील पाणी शुद्ध आणि पवित्र बनते. कलश व्यापक झाला की, त्याला ‘कुंभ’ म्हणतात. नव्या घरात प्रवेश करतांना कुंभ ठेवण्याची प्रथा आहे. कुंभावर श्रीफळ ठेवले की, कलशाची शोभा द्विगुणित होते. कलश प्रतीक हे मानवी दुर्लभ आणि दुर्मिळ देहाचे प्रतीक आहे. शरीर पवित्र, सुंदर आणि दर्शनीय आहे. त्याप्रमाणे कलश पवित्र, सुंदर आणि दर्शनीयच आहे. संतांच्या आगमनाच्या वेळी श्रीफळयुक्त कलशाने त्यांचा सन्मान केला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीत १८व्या अध्यायाला ‘कळसाध्याय’, असे म्हटले आहे.
४. स्वस्तिक
भारतीय संस्कृतीत ‘स्वस्तिक’ प्रतिकाला पुष्कळ महत्त्व आहे. वेदांमध्ये स्वस्तिक मंत्रांना पुष्कळच महत्त्व आहे. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे करतांना स्वस्तिक पूजन केले जाते. देवाची शक्ती आणि भानाची शुभ भावना स्वस्तिकात सामावलेली आहे. एक उभी रेष, एक आडवी रेष आणि ४ भुजा यांनी स्वस्तिक चिन्ह सिद्ध होते. या ४ भुजा हे श्रीविष्णूचे ४ पाय आहेत. भगवान श्रीविष्णु ४ हातांनी ४ दिशांचे रक्षण करतो. स्वस्तिक सर्वांगाने सर्वांचे रक्षण करते. स्वस्तिक शांतीचे, समृद्धीचे, पावित्र्याचे, मांगल्याचे पवित्र प्रतीक आहे. भारतीय शिल्पकलेतही स्वस्तिक चिन्हाला पुष्कळ महत्त्व आहे. स्वस्तिक पूजनाने मनुष्य जीवन समृद्ध बनते. हिंदु स्त्रिया घराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर स्वस्तिक चिन्ह काढतात. त्यामुळे घरात शांतता नांदते.
५. श्रीफळ
हिंदूंच्या प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्यारंभी श्रीफळाला अनन्य स्थान आहे. बाहेरून कठोर आणि आतून मृदू असे श्रीफळाचे रूप अन् स्वरूप आहे. वैभव म्हणजे ‘श्री’ कोणत्याही शुभकार्यात श्रीफळ देवापुढे ठेवून फोडतात. श्रीफळानेच श्री गणेशपूजन केले जाते. समुद्राचा खारटपणा अंतःकरणात साठवून श्रीफळ सर्वांना गोड आणि मधुर पाणी देते.
६. मातीचे मडके
मानवी देहाची क्षणभंगूरता मातीचे मडके शिकवते. मृत व्यक्तीला अग्नी देतांना मातीच्या मडक्याचा सर्रास वापर केला जातो. हा नरदेह क्षणभंगूर असून मातीतून आला तसा मातीला मिळणारच. मातीचे मडके मनुष्यास निरासक्तेचे मनोज्ञ जीवन दर्शन घडवते. मानव देहाच्या नश्वरतेचे दर्शन घडवणारे मातीचे मडके ! जीवनातील प्रत्येक क्षण माणसाला जर जगता आला, तर त्याच्या जीवनाचे कच्चे मडके पक्के होईल.
७. श्री सरस्वतीदेवी आणि श्री लक्ष्मीदेवी
१४ विद्या, ६४ कला यांची जननी जशी श्री सरस्वतीदेवी आहे, त्याप्रमाणेच सर्व लौकिक आणि अलौकिक वैभवाची जननी श्री लक्ष्मीदेवीच आहे.
८. अर्धनारी नटेश्वर
अर्धनारी नटेश्वर हे भारतीय संस्कृतीचे प्रधान जीवनोपयोगी प्रतीक आहे. स्त्री आणि पुरुष यात अर्धनारी नटेश्वराचा अखंड अंगीभूत स्वाभाविक आविर्भाव अन् आविष्कार झालेला दिसून येतो. स्त्रीचे एक अंग पुरुषप्रधान आणि दुसरे अंग स्त्रीप्रधान असते, तर पुरुषाचे अर्धे अंग स्त्रीप्रधान असते; म्हणून आपण सारे अर्धनारी नटेश्वरच आहोत.
९. देवद्रव्य
देवद्रव्य हे असेच दैवी प्रतीक आहे. या जगात माझे म्हणून काहीच नसून सारे प्रभूचे आहे. स्वतःच्या उत्पन्नातील एक भाग आपण ‘देवद्रव्य’ म्हणून व्यय देवाच्या कार्यासाठीच केला पाहिजे.’