संत तुकाराम महाराज (तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला (माघ शुद्ध पंचमीला) महाराष्ट्रातील देहू या गावी झाला. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकाराम बीज) या दिवशी संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत.
पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्यदैवत होते. जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा ! देव तेथेची जाणावा ! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला.
तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले. संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले.
तुकाराम महाराज उपदेश करताना सांगतात की, लोकहो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही, त्यामुळे महाराज एका ठिकाणी सांगतात,
। प्रपंच करोनी परमार्थ साधावा।
। वाचे आळवावा पांडुरंग।
तुकाराम महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नगण्य किंमत आहे आणि जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे. त्याच्या संसारात कधीच व्यथा येणार नाहीत.
। संसाराच्या नावे घालुनिया शून्य। वाढता हा पुण्य धर्म।
। हरिभजनें हे धवळिले जग। चुकविला लाग कळिकाळाचा।
। तुका म्हणे सुख समाधि हरिकथा। नेणे भवव्यथा गाईल तो।
तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, संसार म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. व्यसनाधीन लोकांना हरिची व्याप्ती कळत नसते. जे संसार करत बसतात, हरिला भजत नाहीत त्याचे ब्रह्मांडात अखंड वास्तव्य राहात नाही. जे संसारात विलीन असतात त्यांना नाम कळतही नाही आणि पचतही नाही, असा आशय सांगणारा अभंग
। संसाराच्या अंगी अवघीच व्यसने। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो।
। आता हे सोवळे झाले त्रिभुवन। विषम धोऊन सांडियेले।
। ब्रह्मपुरी वास करणे अखंड। न देखिजे तोंड विटाळाचे।
। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास। ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा।
इंद्रायणीच्या उदकात महाराजांचे अभंग तेरा दिवस तरले,
यावर महाराजांनी देवाची केलेली स्तुती आणि क्षमायाचना
तुकाराम महाराजांचे अभंग काहींच्या कटकारस्थानामुळे इंद्रायणीत बुडवले गेले. त्यावेळी महाराजांनी पंढरीरायास साकडे घातले. तेरा दिवस अन्न-पाणी सोडले. महाराजांनी देवाला सांगितले, हे भगवान आता ही तुझी परीक्षा आहे, असा आशय सांगणारा अभंग.
। थोर अन्याय केला। तुझा अंत म्या पाहिला।
। जनाचिया बोला। साठी चित्त क्षोभिवले।
। भागविलासी केला सीण। अधम मी यातीहीन।
। झाकूनि लोचन। तेरा दिवस राहिलो।
। अवघे घालूनिया कोडे। तहानभुकेचे साकडे।
। योगक्षेम पुढे। करणे लागले।
। उदकी राखिले कागद। चुकविला जनवाद।
। तुका म्हणे ब्रीद। साच केले आपुले।
महाराज म्हणतात, भगवंता माझ्या वह्या तू इंद्रायणीतून काढून तुझे ब्रीद सत्य केलेस आणि लोकांना खोटे पाडलेस. तुकाराम महाराजांचे उदकावर तरल्यानंतर रामेश्वर भट्ट यांनी याचे वर्णन केलेला अभंग..
। जळी दगडासहित वह्या। तारियल्या जैशा लाह्या।
। म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा। तुका विष्णू नाही दुजा।
छत्रपती शिवाजी आणि तुकाराम महाराज
तुकोबांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन राजांनी राज्यच सोडून दिले आणि तुकोबांचे भजन कीर्तन श्रवण करू लागले, तेव्हा तुकोबांनी त्यांना आणि त्यांच्या सेवकांना क्षात्र धर्म सांगीतला :
आम्ही जगाला उपदेश करावा । आपण क्षात्रधर्म सांभाळावा ॥
तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराजे झाले.