शेवगा, सांधेदुखी आणि भारतीय शेती…

Article also available in :

शेवगा शेंगा खाऊन नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवा. कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शेवग्याचा आहारात अवश्य समावेश करावा.

‘पिकते तिथे विकत नाही’, असे म्हणतात. शेवग्याच्या शेंगांच्या विषयी ही म्हण तंतोतंत लागू पडते. भारतात शेवगा उत्पादन चांगले मिळते; मात्र त्यांच्या दैनंदिन आहारात वापर करण्याविषयी भारतीय उदासीन आहेत. वास्तविक शेवग्याच्या शेंगा या पौष्टिक असून त्याचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शेवग्याच्या शेंगांचे गुणधर्म सांगणारी माहिती पुढील लेखात दिली आहे. कॅल्शियमच्या गोळ्या विकत घेऊन कॅल्शियम वाढवण्याऐवजी शेवग्याच्या शेंगा खाऊन नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवल्यास त्याचा शरीरावर नक्कीच चांगला परिणाम होईल.

लेखक : डॉ. ज्ञानेश्‍वर जाधव, आंतरराष्ट्रीय शेतीतज्ञ

शेवगा

 

१. शेवगा : औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष !

१ अ. भारतीय नागरिक कॅल्शियमच्या वाढीसाठी गोळ्या खातात; मात्र कॅल्शियमने युक्त असलेल्या शेवगा खाण्याविषयी उदासीनता दाखवतात !

भारतात वर्ष २०१७ मध्ये शेवग्याच्या शेंग्याचे चांगले पीक आल्याने ते निर्यात करण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाला; म्हणून या वर्षी शेतकर्‍यांनी पुन्हा गुणवत्तापूर्ण शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन घेऊन त्या बाजारात उपलब्ध केल्या. त्या शेंगांच्या निर्यातीची मागणी तेवढीच आहे; पण उत्पादन ४ पट अधिक झाल्याने बाजारभाव कोसळले. भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. एका बाजूला ‘कॅल्शियम’ची कमतरता वाढून गुडघे, मणका आणि सांधे हे दुखण्याविषयीचे आजार लोकांमध्ये वाढत चालले आहेत. त्यासाठी समुद्रातील शिंपले दळून कॅल्शियम निर्माण केले जात आहे आणि त्याच्या महागड्या गोळ्या खाऊन नागरिक ‘किडनी स्टोन’सारख्या दुसर्‍या आजारांना बळी पडत आहेत. दुसर्‍या बाजूला जनावरांचे कॅल्शियम न्यून झाल्याने त्यांच्याही आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्याचा परिणाम म्हणून लहान मुलांचे दात किडतांना दिसत आहेत.

१ आ. शेतकर्‍यांना शेवग्याचे पीक घेण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक !

आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवग्याची शेंग विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पीक घेणे थांबवतील. मग हाच शेवगा इस्रायलमधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने आयात होईल आणि तेव्हा नागरिकांना रांगा लावून तो महागड्या दराने विकत घ्यावा लागेल.

२. शेवग्याच्या शेंगाचे करण्यात येणारे विविध पदार्थ !

अ. महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ सिद्ध करून मुलांना द्यावेत, तसेच त्याचे सूप करूनही ते देऊ शकतो.

आ. शेवग्याचा आहार आठवड्यातून किमान ३-४ वेळा घेतला गेला पाहिजे.

इ. शेवग्याच्या शेंगांची भाजी करता येते, तसेच शेंग्याचे सरबतही करून ते शीतकपाटात ठेवून वापरू शकतो.

ई. शेवग्याची चटणी, पराठे, पापड अशा नानाविध गोष्टी करता येतील.

उ. निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्त्व आहे. त्यापासून गाजराच्या १० पट ‘अ’ जीवनसत्त्व, दुधाच्या १७ पट कॅल्शियम, केळाच्या १५ पट पोटॅशियम, पालकाच्या २५ पट लोह आणि दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते.

ऊ. शेंगा शिजवून त्याचा गर काढून तो वाळवताही येतो. हे सेंद्रिय कॅल्शियम पचनास चांगले असते. अधिक पक्व शेंगा घेतल्यास त्यात अधिक कॅल्शियम मिळते; मात्र ते सावलीत वाळवून ठेवावे लागते.

३. पाश्‍चात्त्य देशांत हाडांचे विकार वाढल्याने शेवग्याची मागणी वाढणे !

पाश्‍चात्त्य देशांत ‘जंकफूड’मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच चालू झाल्याचे दिसत आहे. हाडांचे झिजणे आणि कॅल्शियमची कमतरता आदी रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर चालू झाला आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांत शेवग्याची मागणी वाढली असून आपल्या देशातून शेवग्याची निर्यात वाढली आहे.

४. शेतकर्‍यांनी शेवगा पीक वाया न घालवता जनावरांसाठी वापरावे !

ज्या शेतकर्‍यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवग्याचा पाला आणि शेंगा दळून त्याची भुकटी प्रतिदिन २५० ते ५०० ग्रॅम या प्रमाणात जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी. शेतकरी स्वत:ही या पौष्टिक दुधाचे सेवन करू शकतात आणि इतरांनाही तसे सांगून ५ रुपये अधिक दराने दूध विकू शकतात. शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी आणि ते दर टिकवण्याचे दायित्व हे शेतकर्‍याचे एकट्याचे नसून आपल्या सर्वांचे आहे. शेतकर्‍यांनीही हे पीक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्त्व म्हणून त्याचा विचार करावा.

५. कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शेवगा विकत घ्यावा !

महाराष्ट्रातील जनतेने शेतकर्‍यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि स्वत:च्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

६. शे‍वगा हे खरोखरच बहुगुणी !

अ. शेवग्‍याच्‍या शेंगांची, तसेच पानाफुलांचीही भाजी होते. या झाडामध्‍ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. आठवड्यातून एक दिवस शेवग्‍याच्‍या शेंगा, पाने किंवा फुले यांची भाजी आहारामध्‍ये असल्‍यास शरिरामध्‍ये खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची न्‍यूनता दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

आ. गळू झाल्‍यास शेवग्‍याची पाने वाटून त्‍यांचा लेप करावा. गळू लवकर पिकून फुटून जाते किंवा न पिकता बरे होते.

इ. डोळे आलेले असतांना शेवग्‍याची पाने वाटून त्‍या पानांचा लगदा डोळे बंद करून डोळ्‍यांवर ठेवावा आणि डोळ्‍यांवर पट्टी बांधून विश्रांती घ्‍यावी. डोळे लवकर बरे होतात.

ई. शेवग्‍याच्‍या बिया पाणी शुद्ध करण्‍यासाठी वापरल्‍या जातात.

उ. शेवग्‍याच्‍या सालीचेही औषधी गुणधर्म आहेत.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२३)

Leave a Comment