भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

Article also available in :

पाश्चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर शास्त्रीय संगीतात अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे. – एक प्रसिद्ध संगीतकार

१. भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच
निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

कु. तेजल पात्रीकर

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली. त्याचीच परिणती म्हणजे त्याने केलेली सृष्टीची उत्पत्ती. या सृष्टीतील प्रत्येकच जीव त्या वेळी सोऽहम् म्हणजे तोच मी आहे, या भावात होता, म्हणजेच प्रत्येक जिवाला आपण भगवंताचाच अंश आहोत, याची पूर्ण जाणीव होती. सृष्टीच्या रचनेच्या वेळीच भगवंताने त्याच्याशी एकरूपता साधण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तीयोग इत्यादी विविध योगमार्गांची निर्मिती केली. यासमवेतच विविध दैवी कलांची उत्पत्ती करून त्यायोगेही जिवाने साधना करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, हा त्यामागील उद्देश होता. संगीत ही त्यातीलच एक कला. गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचा समावेश ज्यात होतो, त्याला संगीत असे म्हणतात.

 

२. प्राचीन भारतीय संगीताच्या समृद्धतेची उदाहरणे

२ अ. संगीताचा उपयोग करून गायकाने नादब्रह्माची अनुभूती घेणे

शिवाच्या डमरूतून निघालेला ॐकार हा सृष्टीतील प्रथम नाद. त्यानंतर कालपरत्वे या नादाला जोडून विविध शब्दांचे प्रचलन (मूळ निर्गुणातील ॐ कार सगुण रूपात येतांना नादाला विविध शब्दांची जोड दिली गेली. ती प्रक्रिया म्हणजे प्रचलन.) चालू झाले. अशा प्रकारे संगीत हे विविध बोलांतून व्यक्त व्हायला लागले. आपल्या प्राचीन काळी गायक संगीताचा उपयोग साधना करण्यासाठी करत असत आणि त्यातूनच ते नादब्रह्माची अनुभूती घेत असत.

२ आ. एकेक स्वर सिद्ध करून गायकाने साधना म्हणून गाणे

प्राचीन काळी भारतीय संगीत अतिशय समृद्ध होते. संगीतातील एकेका स्वराला सिद्ध करून गायक साधना म्हणून गात असत. रागांच्या स्वर समुहावर प्रभुत्व मिळवून दीप प्रज्वलीत करणे, तसेच निरभ्र आकाश मेघांनी आच्छादित करणे, हे त्यांना सहज शक्य होत असे.

२ इ. संगीताच्या उपयोगाने रोग बरे करणे

आयुर्वेदामध्येही संगीताचा उपयोग करून रुग्णांचे विविध रोग बरे करण्याचे दाखले प्राचीन इतिहासात आढळून येतात.

 

३. संगीतकलेचा -हास होण्याची कारणे

साधनासमृद्ध संगीतकलेचा काळपरत्वे -हासच होत गेलेला आपल्याला दिसतो. मनुष्याची आध्यात्मिक पातळी जसजशी घटत गेली, तसतशी संगीताकडे ईश्वरप्राप्तीसाठीचे माध्यम म्हणून पहाण्याची दृष्टी लुप्त होऊन मनोरंजनाकरता संगीत असा दृष्टीकोन अधिकाधिक दृढ होत गेला. याला तशीच विविध कारणेही आहेत.

३ अ. यवनी आक्रमणे

संगीतकलेचा -हास होण्यासाठी बहुतांशी कारणीभूत आहेत यवनी आक्रमणे ! त्यांनी भारतात येऊन केवळ राज्य केले नाही, तर आपली संस्कृती नष्ट करण्याचे पूर्ण प्रयत्न केले.

३ आ. ईश्वरप्राप्ती नव्हे, तर लोकेषणा मिळवणे, हा संगीताचा उद्देश असल्याचे जनमानसात दृढ करणे

ईश्वरप्राप्ती हा संगीताचा उद्देश नसून मनोरंजन, राजांची खुशमस्करी करणे, राजदरबारात वाहवा मिळवणे, इनाम मिळवणे इत्यादीसाठीच ते असल्याचे जनमानसात दृढ केल्याने संगीताची अपरिमीत हानी झाली. त्यातूनच कव्वाली, ठुमरी इत्यादी गीतप्रकारांची चलती होऊ लागली.

३ इ. प्रसिद्ध हिंदु गायक-वादक यांचे धर्मांतर करणे

यवनी आक्रमणकारी एवढेच करून थांबले नाहीत, तर त्याकाळचे कितीतरी प्रसिद्ध हिंदु गायक आणि वादक यांना त्यांनी इस्लाम पंथात धर्मांतरित करून घेतले. आज त्यामुळेच तानसेनसारख्या कितीतरी हिंदु गायकांचा गायन वारसा त्यांची इस्लामी पिढीच चालवत आहे.

३ इ १. संगीताचा उपयोग साधना म्हणून
केल्यास त्या गायनात किती सामर्थ्य येते, हे स्पष्ट करणारी कथा

३ इ १ अ. अकबराला तानसेनच्या गुरूंचे गायन ऐकण्याची इच्छा होणे आणि त्याने वेश पालटून तानसेनसमवेत गुरूंचे गायन ऐकायला जाणे

एकदा राजा अकबराने गानसम्राट तानसेनकडे विचारणा केली, तू अतिशय सुंदर गातोस. ज्यांनी तुला हे संगीत शिकवले, त्या तुझ्या गुरूंचे संगीत मला एकदा ऐकायचे आहे. त्या वेळी तानसेन म्हणाला, महाराज, माझ्या गुरूंचे गायन तुम्हाला ऐकायचे असेल, तर ते चोरून ऐकावे लागेल; कारण ते कुणासाठी गात नाहीत. त्यावर अकबर बादशहाने तानसेनसमवेत जाण्याची सिद्धता दर्शवली. त्याप्रमाणे अकबर आणि तानसेन वेश पालटून स्वामी हरिदास यांच्याकडे ब्राह्ममुहूर्तावर पोेहोचले.

३ इ १ आ. स्वामी हरिदासांचे गायन ऐकून अकबराने समाधी अवस्था अनुभवणे

स्वामी हरिदासांनी आपले प्रातर्विधी आटोपून सूर्याला अर्घ्य दिले आणि झोपडीत येऊन गायन आरंभ केले. त्यांचे गायन ऐकून अकबर बादशहाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या आणि तो एका विलक्षण समाधी अवस्थेत गेला. काही वेळाने त्या स्थितीतून बाहेर आल्यावर तानसेन आणि अकबर दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले.

३ इ १ इ. स्वतःचे गाणे लोकेषणेसाठी असून गुरूंचे गाणे केवळ जगन्नियंत्या परमेश्वरासाठी असल्याने त्यांच्या गाण्यात सामर्थ्य असल्याचे तानसेनने सांगणे

परतीच्या प्रवासात अकबराने तानसेनला विचारलेे, तुझ्या गाण्याला तर तुझ्या गुरूंच्या गाण्याची थोडीही सर नाही. असे का ? त्यावर तानसेन उत्तर देतो, तुमचे म्हणणे खरे आहे, महाराज. माझे गाणे माझ्या गुरूंच्या गाण्याच्या तुलनेत कवडीमोलही नाही. आमच्या गाण्यात हा भेद असण्याचे कारण म्हणजे माझे गाणे लोकेषणेकरता, आपल्याला खुश करण्याकरता आहे, तर माझे गुरु केवळ जगन्नियंत्या परमेश्वरासाठीच गातात.

संगीताचा उपयोग साधना म्हणून केल्यास त्या गायनात किती सामर्थ्य येते, हे यावरूनच लक्षात येते. संगीताची वाटचाल अधोगतीकडे कशी होऊ लागली, हे तानसेनने दिलेल्या उत्तरावरून लक्षात येते.

३ ई. संगीताला शृंगारिकतेकडे वळवणे

या इस्लामी राजवटींनी राजदरबारात संगीताला विशेष स्थान देऊ केले आणि हळूहळू त्या संगीताला शृंगारिकतेकडे वळवले. त्यामुळे संगीतात कामुक भाव अधिक दिसायला आरंभ झाला. अशा प्रकारे ईशभक्तीकडून कामवासनेकडे नेणार्याि संगीताचा आरंभ झाला.

उत्तर भारतीय संगीताची ही स्थिती असली, तरी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की, मोगलांच्या एवढ्या आक्रमणांनंतरही दाक्षिणात्य संगीताने मात्र आजही आपली पारंपरिक संगीतसाधना जोपासून ठेवली आहे.

३ उ. भारतीय संगीतात विदेशी पॉप गायनाचा अंतर्भाव होणे

त्यानंतर आताच्या एकूणच भारतीय संगीतात विदेशी पॉप गायनाचा अंतर्भाव व्हायला लागला आहे. त्यामुळे भारतीय संगीताचे रूपांतर आता पाश्चारत्त्य गायनात व्हायला लागले आहे. कर्णकर्कश आवाज, अनेक वाद्यांची सरमिसळ आणि कामुक हावभाव अन् बोल यांच्या आधारे आपण आजच्या संगीताचे अधःपतन पहात आहोत. हल्लीच्या गायनाबद्दल एका प्रसिद्ध संगीतकाराने म्हटले आहे, पाश्चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर शास्त्रीय संगीतात अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे.

अशा या जीवनोद्धारक संगीतकलेच्या माध्यमातून आम्हा कलाप्रेमी जिवांना साधनेच्या प्रगतीपथावर आपणच घेऊन जावे, अशी भगवान शिव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते.

 

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment