१. आरोग्यदायी हिवाळा
हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.
२. ऋतूनुसार आहार
२ अ. हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये ?
या ऋतूमध्ये जाठराग्नी उत्तम असल्याने कोणत्याही प्रकारचे अन्न सहज पचते. यामुळे या ऋतूमध्ये खाण्यापिण्याला फार मोठे बंधन नसते. या काळात रात्री मोठ्या असल्याने सकाळी उठल्या उठल्या भूक लागते, म्हणून सकाळी अह्निके
वैद्य मेघराज पराडकर
आटोपल्यावर पोटभर जेवून घ्यावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. हिवाळ्यात कोरडेपणा वाढलेला असतो. त्यामुळे आहारामध्ये स्निग्ध (तेलकट) घटक उदा. तीळ, शेंगदाणे, खोबरे आवर्जून असावेत; म्हणूनच या दिवसांत तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. या ऋतूत आपल्याला पचतील असे पौष्टिक पदार्थ खाऊन तब्येत चांगली सुधारून घ्यावी. अधेमधे खात रहाणे आरोग्याला हानीकारक असते; म्हणून दिवसाच्या ठरवलेल्या २ वेळांमध्ये योग्य मात्रेत जेवावे, म्हणजे अवेळी भूक लागत नाही. पचन चांगले होण्यासाठी जेवणानंतर विडा खावा.
२ आ. कूलरमधील थंड पाणी आरोग्याला अपायकारक
कोणत्याही ऋतूमध्ये शीतकपाटातील किंवा कूलरमधील थंड पाणी पिणे आरोग्याला अपायकारक आहे. असे पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंद होते आणि सर्दी, खोकला, सांधेदुखी, आळस यांसारखे विकार उद्भवतात.
३. हिवाळ्यातील इतर आचार
३ अ. ब्राह्ममुहूर्तावर उठणे
या दिवसांत थंडीमुळे अजून थोडेसे झोपावे, असे वाटत असले, तरी नियमितपणे ब्राह्ममुहूर्तावर, म्हणजे सूर्योदयाच्या दीड घंटा अगोदर उठावे. नियमितपणे ब्राह्ममुहूर्तावर उठणे ही एक कृतीही सर्व रोगांपासून दूर ठेवणारी आहे.
३ आ. औषधी धूमपान करणे
सकाळी दात घासल्यावर औषधी धूर घ्यावा. असे केल्याने सर्दी, खोकला यांसारख्या कफाच्या विकारांना आळा बसतो. कागदाच्या सुरळीमध्ये ओव्याची पूड घालून विडी बनवावी आणि ती एकीकडून पेटवून दुसरीकडून धुराचे ३ झुरके घ्यावेत. धूरयुक्त श्वास नाकाने न सोडता तोंडानेच सोडावा. ओव्याऐवजी तुळशीच्या पानांची भुकटीही वापरता येते.
३ इ. अंघोळीपूर्वी अंगाला नियमित तेल लावणे
या ऋतूत अंघोळीपूर्वी नियमितपणे अंगाला खोबरेल तेल, तीळ तेल, सरकीचे तेल, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल यांपैकी कोणतेही तेल लावावे. यामुळे थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन खाज येणे; त्वचा, ओठ, पाय यांवर भेगा पडणे हे विकार होत नाहीत. खोबरेल तेल थंड, तर मोहरीचे तेल उष्ण असते. असे असले, तरी हिवाळ्यात खोबरेल तेल वापरले, म्हणून अपाय होत नाही. नेहमी उष्णतेचे विकार होणार्यांना खोबरेल तेल फारच लाभदायक ठरते. पेट्रोलियम जेली, कोल्ड क्रीम यांसारखी महागडी आणि कृत्रिम प्रसाधने वापरण्यापेक्षा त्यांहून स्वस्त आणि नैसर्गिक तेल वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे.
३ ई. व्यायाम
हिवाळ्यामध्ये भरपूर व्यायाम आणि श्रम करावेत. सकाळी अंगाला तेल लावून व्यायाम करणे आणि त्यानंतर अर्ध्या घंट्याने अंघोळ करावी.
३ उ. स्नान
या ऋतूत गरम पाण्याने स्नान करावे.
३ ऊ. कपडे
थंडीपासून रक्षण होण्यासाठी ऊबदार कपडे वापरावेत.
४. हे कटाक्षाने टाळा !
दवात किंवा चांदण्यात फिरणे, थंडीपासून स्वतःचे संरक्षण न करणे, पाण्याचे तुषार अंगावर घेणे, सतत पंख्याचा जोराचा वारा अंगावर घेणे, दिवसा झोपणे या गोष्टी या ऋतूत कटाक्षाने टाळाव्यात. या गोष्टींमुळे शरिरातील कफ वाढतो आणि विकार निर्माण होतात.
हिवाळ्यासंबंधीच्या ऋतूचर्येचे पालन करून साधक निरोगी होवोत आणि सर्वांचीच आयुर्वेदावरील श्रद्धा वाढो, ही भगवान धन्वन्तरीच्या चरणी प्रार्थना !
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०१५)
५. रोगांची तीन कारणे
५ अ. असात्म्येंद्रियार्थ संयोग
‘असात्म्य म्हणजे न मानवलेले, न सोसवलेले, जे सवयीचे नसते ते. मानवते आणि सोसते, ते सात्म्य. ते सर्वांचे असते. सात्म्येंद्रियार्थ संयोगाने जीवन व्यापारात सात्म्यस्थिती टिकते. असात्म्येंद्रियार्थ संयोगाने त्यात वैषम्य येते.
बाह्य विश्वाचे ज्ञान स्पर्शाने होते. बाह्य जगाचा परिणाम स्पर्शाने होतो, म्हणजे सर्व इंद्रियार्थांचा परिणाम स्पर्शमात्रे होते. हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. स्पर्शाने ज्ञान होते. ज्ञानाचा परिणाम शरिराच्या सर्व बारीक, लहानातील लहान परमाणूवरही होतो. इंद्रियार्थ ग्रहण अती झाले, विपरीत झाले, अल्प झाले अथवा मुळीच न झाले, तर शरिराचे व्यापार, म्हणजे त्रिधातूंचे (वात, पित्त आणि कफ यांचे) व्यापार आणि मनोव्यापार यांतही वैषम्य येते. वैषम्याने रोग होतात. असात्म्येंद्रियार्थ संयोगाचा परिणाम बाहेरून आत सरळ मनापर्यंत होतो.
५ आ. प्रज्ञापराध
हा अपराध मनाने मनातच होतो; म्हणून परिणाम मनावर होतो. प्रज्ञापराध म्हणजे, जाणूनबुजून, हट्टाने, मानसिक भावना वा वृत्ती विरोधी, वेडेवाकडे आणि नीतीधर्म गुंडाळून एखादे आचरण कर्म करणे. साहस, अती स्त्रीसंग, वाटेल तसे वाटेल तेथे आणि वाटेल त्याला टाकून बोलणे, कुणाचा कुठेही अपमान करणे, अभक्ष्य भक्षण, अपेयपान, अहितार्थ सेवन आदी प्रज्ञापराध आहेत. ते मनोगोचर आहेत. त्यांचा परिणाम आधी मनावर होतो. नंतर शरिरावर होतो. प्रज्ञापराधाने सर्व दोषांचा प्रकोप होतो. (वात, पित्त आणि कफ या त्रिधातूंंचे प्रमाण समान असते, तेव्हा पूर्ण स्वास्थ असते. त्यांच्यात विकृती वा वैषम्य झाले की, शरीर रुग्ण होते.) प्रज्ञापराध हा मानसिक दोष (रज आणि तम) आणि शारीरिक दोष, (वात, पित्त, कफ) या सर्वांनाच दुष्ट करणारा (वैषम्य निर्मिणारा) आहे.
५ इ. कालाच्या स्वभावाचा परिणाम
काळ म्हणजे परिणाम. पाऊस, शीत, उष्ण, भेद, नक्त, दिन, ऋतू व भुक्तभेद यांमुळे दोषांचे चय, प्रकोप व प्रशम होतात. दोषांत वैषम्य येते. स्वस्थानी चय होतो. स्वस्थानातून दोष उन्मार्ग गामी होतो, तो प्रकोप आहे. दोषांचे दुष्टत्व न्यून होते, तो प्रशम. कालाच्या स्वभावाचा परिणाम शरीर आणि मन या दोन्हीवर एकदमच होतो. दोषाची दृष्टी हे निश्चिात कारण आहे.
‘परिणामः काल अण्यते ।’
अर्थ : काल गेल्यानंतर परिणाम परिपक्व होतो. ‘
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००६)