सर्वस्वरूपी, विश्वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यानुमेय श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली अशी विभिन्न रूपे धारण केली. शरणागतांना तात्काळ पावणारी, जे जे मंगल आहे, ते ते प्रदान करणारी, जीवनाला परिपूर्ण करणार्या प्रत्येक गोष्टीचे मूर्तीमंत प्रतीक असलेली, भक्तांच्या हाकेला लवकर धावून येणारी, अशी आई जगदंबेची ख्याती आहे. तिच्या असंख्य भक्तांना तिची अशी प्रचीती आहे.
अनुक्रमणिका
- १. देवीची पूजा कशी करावी ?
- २. उपासनेच्या कृती करण्याच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धती
- ३. विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील शास्त्र
- ४. देवीला कुंकूमार्चन करणे !
- ५. देवीची ओटी कशी भरावी ?
- अ. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?
- आ. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
- इ. ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र
- ई. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ?
- उ. देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?
- ऊ. देवीच्या चरणांवरील वस्त्र परिधान करण्यामागील लाभ कोणते ?

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।।
श्लोकाचा अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो.
१. देवीची पूजा कशी करावी ?
देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडल्याने होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
याविषयीचे अधिक विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
२. उपासनेच्या कृती करण्याच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धती
आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि तिची सर्व रूपे (सर्व देवी) यांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृतींविषयी सूत्रे (माहिती) पुढील सारणीत दिली आहेत.
| उपासनेची कृती | कृतीविषयीचे विवेचन |
| १. ‘पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला गंध कसे लावावे ? | मध्यमेने कपाळावर आपापल्या संप्रदायानुसार गोल किंवा उभे गंध लावावे. |
| २. देवीला गंध कोणत्या बोटाने लावावे ? | अनामिकेने (करंगळीजवळील बोटाने) लावावे. |
| ३. फुले वहाणे
अ. कोणती वहावीत ? |
मोगरा, शेवंती, निशिगंध, कमळ किंवा जुई. |
| आ. संख्या किती असावी ? | एक किंवा नऊच्या पटीत |
| इ. वहाण्याची पद्धत कशी असावी ? | फुलांचे देठ देवीकडे करून वहावीत. |
| ई. फुले कोणत्या आकारात वहावीत ? | फुले गोलाकार वाहून गोलातील पोकळी रिकामी ठेवावी. |
| ४. उदबत्तीने ओवाळणे
अ. तारक उपासनेसाठी उदबत्तीचा कोणता गंध ? |
चंदन, गुलाब, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी किंवा अंबर. |
| आ. मारक उपासनेसाठी उदबत्तीचा कोणता गंध ? | हीना किंवा दरबार |
| इ. संख्या किती असावी ? | दोन |
| ई. ओवाळण्याची पद्धत कशी असावी ? | उदबत्त्या उजव्या हाताची ‘मध्यमा, अनामिका (करंगळीच्या शेजारचे बोट) आणि अंगठा’ या तीन बोटांनी किंवा उजव्या हाताच्या पाचही बोटांनी धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळाव्यात. |
| ५. कोणत्या गंधाचे अत्तर अर्पण करावे ? | मोगरा |
| ६. देवीला न्यूनतम (किमान) किती प्रदक्षिणा घालाव्यात ? | एक किंवा नऊच्या पटीत’ |
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१.२००५, रात्री ९.४२)
३. विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील शास्त्र
‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा. विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके, म्हणजे त्या देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर फुलांच्या तुलनेत जास्त असते. अशी फुले त्या त्या देवतेच्या मूर्तीला वाहिली, तर ती ती देवतेची मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन त्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. त्यामुळे विशिष्ट देवतेला विशिष्ट फूल वहाण्याला महत्त्व आहे. यानुसार पुढील सारणीत काही देवी आणि त्यांना वहावयाची फुले यांची नावे दिली आहेत.
सारणीत दिलेल्या त्या त्या फुलाच्या गंधाकडे त्या त्या देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याने त्या त्या गंधाची फुले आणि उदबत्त्या वापरल्यामुळेही त्या त्या देवीच्या तत्त्वाचा पूजकाला जास्त लाभ होतो.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.९.२००५, सायं. ६.५५ आणि ७.९.२००५, दु. १२.१४)
| देवी | देवीचे तत्त्व आकृष्ट करून घेणारे फूल |
| १. श्री दुर्गा | मोगरा |
| २. श्री लक्ष्मी | झेंडू |
| ३. श्री सप्तशृंगी | कवठी चाफा |
| ४. श्री शारदा | रातराणी |
| ५. श्री योगेश्वरी | सोनचाफा |
| ६. श्री रेणुका | बकुळी |
| ७. श्री वैष्णोदेवी | निशिगंध |
| ८. श्री विंध्यवासिनी | कमळ |
| ९. श्री भवानी | भुईकमळ (केशरी रंगाचे भूमीवर येणारे फूल) |
| १०. श्री अंबा | पारिजात |
४. देवीला कुंकूमार्चन करणे !
देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र याविषयी पाहूया.

४ अ. पद्धती
पद्धत १
‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वाहतात.’ – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २२.२.२००४, रात्री ९.३०)
पद्धत २
काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते.
४ आ. शास्त्र
‘मूळ कार्यरत शक्तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली अाहे. शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१०.२००५, रात्री ९.५३)
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
४ इ. कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र
५. देवीची ओटी कशी भरावी ?
खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !

अ. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?
‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.’
आ. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
१. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
२. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
३. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.
४. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.
५. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.
इ. ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र
ई. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ?
‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत.
| ‘देवीचे तत्त्व | तत्त्वाशी संबंधित रंग | रंगांचे प्रमाण (टक्के) |
| १. श्री दुर्गादेवी | तांबडा (लाल) | – |
| २. श्री महालक्ष्मी | तांबडा + केशरी | ६० + ४० |
| ३. श्री लक्ष्मी | तांबडा + पिवळा | ४० + ६० |
| ४. श्री सरस्वती | पांढरा | – |
| ५. श्री महासरस्वती | पांढरा + तांबडा | ६० + ४० |
| ६. श्री काली | जांभळा | – |
| ७. श्री महाकाली | जांभळा + तांबडा |
८० + २० |
उ. देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?
नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १८.१.२००५, रात्री ९.२७)
ऊ. देवीच्या चरणांवरील वस्त्र परिधान करण्यामागील लाभ कोणते ?
ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.


श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र
श्री दुर्गादेवी